मोफत! मोफत! मोफत ! ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्याची अनोखी शक्कल..!

घरपट्टी वसूल करण्यासाठी सोलापूरच्या तरुण सरपंचाने अनोखा फंडा वापरला असून चार हजार रुपये घरपट्टी भरल्यास 50 किलो मोफत साखर ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. काय आहे हा नेमका फंडा या रिपोर्ट मधून पाहूया...;

Update: 2022-10-21 15:18 GMT

 देशाचा आणि राज्याचा विकास नागरिकांच्या विविध करातून केला जातो. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध कर आकारते. त्यामध्ये अधिकारांची विभागणी देखील करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत तर नगर परिषद,नगर पालिका,महानगर पालिका,राज्य सरकार,केंद्र सरकार यांच्यात करां च्या वसुली संदर्भात विभागणी झाल्याचे दिसून येते. शासनाला मिळणाऱ्या या करातून जनतेला सोयी - सुविधा देण्याचे काम केले जाते.

यामध्ये गाव स्तरावर देखील विविध कर आकारले जातात. तसे गावच्या ग्रामपंचायतीला अधिकार देखील देण्यात आले आहेत. त्यामध्ये पाणी,घर,वीज यावर कर आकारला जातो. त्याचबरोबर महसूल प्रशासनाकडून देखील गावात शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्याचे काम केले जाते. एखाद्या गावात आठवडी बाजार भरत असल्यास तेथे येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कर आकारला जातो. याची रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा केली जाते. या जमा झालेल्या रक्कमेचा उपयोग गावात विविध योजना राबवण्यासाठी केला जातो.

घरपट्टी,पाणी पट्टी आणि वीज कर ग्रामस्थांकडे वर्षानुवर्षे थकलेला असतो. रक्कम थकल्याने ती वाढत जावून भरण्यास ग्रामस्थांना अडचणी येतात. यावर उपाय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावच्या तरुण सरपंचाने अनोखी शक्कल लढवत 4 हजार रुपये घरपट्टी भरा आणि 50 किलो मोफत साखर मिळावा. अशी दिवाळीच्या निमित्ताने स्कीम सुरू केली आहे. या योजनेला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सरपंचाने सांगितले. घरपट्टी वसूल करण्यासाठी हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जात आहे.

शेतीवर चालते गावची उपजीविका

घाटणे गाव तालुक्यापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असून या गावची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. या गावाला तालुका आणि जिल्हा जवळ आहे. प्रामुख्याने हे गाव सिना नदीच्या काठी वसलेले असून येथील लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. या गावात शेतमजुरांची जास्त संख्या दिसून येते. या गावच्या जवळून रेल्वे जाते,पण येथे रेल्वे थांबण्यासाठी स्टेशन नाही. घाटणे गावच्या जवळ शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याचा उपयोग व्हावा,या हेतूने पाणी अडवण्यासाठी बॅरेज बंधारा बांधण्यात आलेला आहे. त्यामुळेच येथील शेती हिरवीगार असल्याचे दिसून येते. या गावची खासियत म्हणजे गावात घर बांधणीसाठी खोदण्यात येणाऱ्या पायासाठी मुरूम लागत नाही. त्यामुळे येथील बरेच गावकरी शेतात राहायला गेले असल्याचे दिसून येतात.

अवघ्या 23 वर्षाचा तरुण सरपंच पाहतोय ग्रामपंचायतीचा कारभार

एकीकडे तरुण पिढी राजकारणापासून दूर जात असताना या गावच्या तरुण मुलाने वडिलांच्या इच्छेनुसार राजकारणात उतरून ग्रामपंचायती च्या निवडणुकीत पॅनल निवडून आणला. त्यामुळे या गावाकडे माध्यमांच्या नजरा वळल्या. या तरुण सरपंचाची पहिली मुलाखत बीबीसी मराठी वर प्रसिद्ध झाली. त्यानंतर मात्र या गावाकडे पत्रकारांची रिघच लागली. अनेकांनी या गावात येवून लाईव्ह कार्यक्रम केले. या गावच्या तरुण सरपंच अवघ्या 23 वर्षाचा असून कोरीनाच्या काळात या गावाने दमदार कामगिरी केली होती,असे सांगितले जात आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती दखल

कोरोना च्या काळात कोरोना उग्र रूप धारण करत असताना या गावाने चांगली कामगिरी केली असल्याचे सांगितले गेल्याने या तरुण सरपंचाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेवून स्तुती केली होती. कोरोना च्या काळात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण या गावाने कोरोना चा सामना मोठ्या धैर्याने केला असल्याचे येथील नागरिक सांगतात. मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल्यानंतर या गावाकडे माध्यमांचा पुन्हा जास्त प्रमाणात ओढा वाढला होता. यानंतर या तरुण सरपंचावर माध्यमांना चुकीच्या बातम्या दिल्याचा आरोप देखील येथील ग्रामस्थांनी केला होता. त्यांनी त्या संदर्भाने अनेकदा आंदोलने देखील केली. त्यामुळे हे गाव सातत्याने जिल्ह्यात चर्चेच्या केंद्रस्थानी असते.

घाटणे गाव पुन्हा एकदा चर्चेत

चार हजार रुपये घरपट्टी भरा आणि मोफत पन्नास किलो साखर मिळावा,ही दिवाळीच्या निमित्ताने चालू केलेल्या स्कीम मुळे हे गाव पुन्हा एका चर्चेत आले आहे. याठिकाणी घरपट्टी भरून साखर वाटण्याचा कार्यक्रम केला जात आहे. त्यामुळे या गावातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. येत्या काळात या गावात आणखीन राजकीय घडामोडी पहायला मिळतील,असे वाटते.

गावकऱ्यांकडे वर्षानुवर्षे रखडलेली असते घरपट्टी

गावकऱ्यांकडे वर्षानुवर्षे घरपट्टी रखडलेली असते. ती कुठे तरी कमी व्हावी आणि गावकऱ्यांना पण त्याचा फायदा व्हावा,या हेतूने मोहोळ तालुक्यातील घाटणे गावचा सरपंच ऋतुराज देशमुख याने 4 हजार रुपये घरपट्टीवर 50 किलो मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची दिवाळी गोड होणार,असे मानले जात आहे. यासाठी विविध अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. शून्य ते 700 रुपये घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रती किलो 30 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे तर सातशे ते 2 हजार घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना 23 रुपये किलोने साखर देण्यात येणार आहे. 2 हजार ते 3 हजार 300 रुपये घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना 15 रुपये किलोने साखर देण्यात येणार असून 4 हजार 100 रुपयांच्या पुढे घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना 50 किलो साखरेचे पोते मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूमिहीन कुटुंबांना देखील प्रत्येकी 5 किलो मोफत साखर देण्यात येणार आहे.

जमा झालेल्या घरपट्टी च्या रक्कमेतून गावचा करणार विकास

या स्कीम ला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांची या निमित्ताने दिवाळी ही गोड होणार आहे. घरपट्टी ची रक्कम गावातील वीज,पाणी आणि इतर सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी या स्कीम चा फायदा घेवून गावच्या विकासाला मदत करावी,असे सरपंच ऋतुराज देशमुख याला वाटते.

Tags:    

Similar News