राज्यपालांनी केले अपूर्ण वसतीगृहाचे उद्घाटन
मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाची चार वसतीगृह उभारण्यात आली होती. राज्यपालांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होऊन तब्बल दीड महिना झाला, तरीदेखील विद्यार्थ्यांसाठी ही वसतीगृह अद्यापही सुरू करण्यात आली नाहीत. ही वसतीगृह अद्यापही सुरू का झाली नाहीत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांच्या विशेष रिपोर्टमधून...;
मुंबई विद्यापिठात ८ जुलै रोजी चार आंतरराष्ट्रीय वसतीगृहाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. विद्यापिठाच्या नामांतरावरून वादही चांगलाच रंगला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वसतीगृहाचे राजकारण होताना अनेकांनी पाहिलं होतं. राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होऊनही विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश का मिळतं नाही याचे नेमके कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. बाहेरून हे वसतीगृह चांगल्या प्रकारे बांधले पण वसतीगृहाच्या आत मात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अत्याधुनिक वस्तूंची सेवा आत मध्ये करण्यात आली नाही. तसेच विद्युत प्रवाहाची कोणतीही साधने आत वापरण्यात आलेली नाहीत.
चारशे विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ही वसतीगृह आहेत. त्या वसतीगृहात ग्रंथालयाचा देखील समावेश आहे. पण या वसतीगृहात कुठेही पुस्तक दिसत नाहीत. कोणत्याही सुख सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नाहीत.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोणत्याही गोष्टीचा पुरवठा या आंतरराष्ट्रीय वसतीगृहात अद्यापही केला गेला नाही. मग राज्यपालांच्या हस्ते या वस्तीगृहाचे उद्घाटन का करण्यात आले असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मुंबई विद्यापीठाने आता राजकीय खेळी खेळायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावू लागला आहे.
मुंबई विद्यापिठाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क केल्यानंतर वसतीगृहाचे अंतर्गत काम सुरु असल्याने वसतीगृह सुरू केली नाहीत त्यासाठी आताच टेंडर काढण्यात आले आहे. या त्यांच्या उत्तरावर मग राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन करण्याची घाई का केली असा प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर बोलण्यास नकार दिला. एकूणच काय विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि प्रशासनाला जाब विचारला असता ते मुग गिळून गप्प बसलं आहे.