शब्दांनीच पेटतात घरे,दारे देश आणि माणसे सुद्धा; जागतिक काव्य दिनानिमित्त कवींनी मांडली सामाजिक व्यथा

शब्दांनीच पेटतात घरे,दारे,देश आणि माणसे सुद्धा म्हणूनच म्हटले जाते,की बोलण्यापूर्वी विचार करूनच शब्द वापरावेत. शब्द जणू धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे सुसाट सुटतात. एकदा तोंडातून गेलेला शब्द परत माघारी घेता येत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचारपूर्वक करावी असे म्हटले जाते. याच शब्दांनी अनेकांना घायाळ केले आहे. आज 21 मार्च जागतिक काव्य दिन असून त्यानिमित्ताने कवींच्या मनात समाजाविषयी काय सुरू आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट..

Update: 2022-03-21 12:34 GMT

या कवींनी आपल्या मार्मिक शब्दात चालू असलेल्या कोरोना व युद्धजन्य परिस्थितीवर हल्ला चढवला आहे. हेच शब्द काळजात बाण घुसावा,त्याप्रमाणे नागरीकांच्या ह्रदयात घर करून राहतात व लोक सामाजिक क्रांतीसाठी सज्ज होता.

21 मार्च 1999 रोजी पॅरिस परिषदेत काव्य दिनाची घोषणा

युनेस्कोने जागतिक काव्य दिनाची घोषणा 21 मार्च 1999 रोजी पॅरिस परिषदेत केली. तेव्हांपासून प्रत्येक वर्ष एका महान कवीला समर्पित केले जाते. जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस आहे. युनेस्कोच्या महासचिवांनी म्हटलेच आहे की, कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते. एकोणिसाव्या शतकातील फ्रेन्च कलावंत जोसेफ राँऊ यांनी म्हटले होते की "Science Is For Them Who Learn, Poetry Is For Those Who Know." हे खरच आहे की बुद्धीची कसोटी लावून विज्ञान शिकता येते,पण पद्य मनाला भावणे गरजेचे असते. सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे ह्यांनी कवितेच्या उगमाची प्रक्रियाच ह्या कवितेतून समोर आणली आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. म्हणूनच आपल्या कवितेत त्या म्हणतात -कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी , त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी ! William Wordsworth यांनी म्हटल्याप्रमाणे - Poetry is the Spontaneous Overflow of Powerful Feeings. शब्दांच्या माध्यमातून होणारा रसरशीत भावनांचा उस्फुर्त उद्रेक म्हणजे कविता होय.





 


सामाजिक भेदभावावर महापुरुषांनी शब्दांनी चढवला हल्ला

महाराष्ट्राला समृद्ध अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली आहे. यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. संत तुकारामांनी समाजातील दांभिकतेवर हल्ला चढवून समाज जागृतीचे काम केले. त्यांची सामाजिक जागृतीची चळवळ पुढे संत गाडगेबाबा यांनी चालू ठेऊन समाजातील वाईट चालीरीती यांच्यावर हल्ला करून कीर्तने,भारुडे यांच्या माध्यमातून समाज जागृत करण्याचे काम केले. राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांनी शब्दांच्याच माध्यमातून समाजातील जातिभेदावर हल्ला चढवला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'शेतकऱ्यांचा आसूड' हे पुस्तक लिहले तर 'गुलामगिरी' या पुस्तकातून सामाजिक भेदभावावर शाब्दिक हल्ला चढवला. त्यांच्यामुळेच सामाजिक भेदभाव नष्ट करण्याची चळवळ अधिक गतिमान झाली. महात्मा फुले यांच्यानंतर सामाजिक सुधारणेची चळवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक गतिमान करून तिला मूर्त स्वरूप दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागृतीसाठी मूकनायक,जनता,प्रबुद्ध भारत सारखी वृत्तपत्रे काढली. 'अस्पृश्य पूर्वी कोण होते','थोट्स ऑन पाकिस्तान' सारखी पुस्तके लिहिली. भारतीय समाजातील काही वर्ग स्वतःला सवर्ण समजत होता आणि बऱ्याच भारतीय समाजाला अस्पृश्य समजत होता.

या अस्पृश्य समजाला सार्वजनिक पाणवठ्यावरील पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. त्यांना तो मिळावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह केला. अस्पृश्याना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केला. अस्पृश्य समाज हजारो वर्षे अज्ञानाच्या खाईत लोटलेला होता. त्यांच्यात क्रांतीची ज्वाला फुकण्याचे काम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षे मुक्याचे जीवन जगत असलेल्या अस्पृश्य समजाला जागृत करण्यासाठी 'मूकनायक नावाचे' वृत्तपत्र काढून त्यामाध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्यास सुरुवात केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शाब्दिक माऱ्याने अस्पृश्य समाजात जीव आणण्याचे काम केले. शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहून अस्पृश्याना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे खंडाच्या माध्यमातून वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द अनेकांना जगण्याची संघर्ष करण्याची प्रेरणा देतात. 'शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा' शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, शिका,संघटित व्हा,संघर्ष करा हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आजही अनेकांना जगण्यासाठी प्रेरणा देत आहेत.




 


सामाजिक परिस्थितीची कवितेतून जाणीव

आंबेडकरी कवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या काव्यातून समाज जागृतीचे काम केले. त्यांनी वाड्या-वस्त्या गावागावात जाऊन लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगितली. अलीकडे जलसाकार संभाजी भगत आपल्या जलशाच्या माध्यमातून सामाजिक विषमतेवर शाब्दिक प्रहार करतात. समाजात अनेक कवी आपल्या कवितेतून सामाजिक,आर्थिक,राजकीय,शैक्षणिक परिस्थितीवर मांडणी करून समाजाला जागृत करण्याचे काम करतात. त्यांच्या शब्दा-शब्दात सामाजिक जाणिव असते. त्यांची झालेले पिळवणूक त्यात असते. त्यातून अनेक जण प्रेरणा घेऊन समाजात घडत असलेल्या वाईट गोष्टीचा विरोध करत असतात. कविता हे माध्यम सामाजिक सुधारणेचे माध्यम तर आहेच त्याचबरोबर नैसर्गिक सोंदर्य याचीही महती सांगते. शेतकऱ्यांचे दुःख ही कवितेतून सांगितले जाते. आई-वडीलांच्या मायेची महती ही याच कवितेतून अगदी सहजपणे सांगितली जाते. एखाद्याचे वर्णनही यातून सांगितले जाते. कविता ह्या निव्वळ कविता ना होता त्या सामाजिक सुधारणेच्या कविता असाव्यात असे अनेकांना वाटते. आता अलीकडे यात चारोळ्याचा प्रकारही आला आहे.




 


सर्व समाजाने बंधुभावाने राहावे शाहीर व कवियत्रीचा संदेश

कलाकाराला जात धर्म नसतो असे म्हटले जाते. त्याप्रमाणे शाहीर राजू वाघमारे यांनी शाहिरीच्या माध्यमातून सर्व समाजाने बंधुभावाने राहण्याचा संदेश दिला आहे. तर कवियत्री विमलताई माळी यांनी जीवन जगत असताना आलेल्या अडचणीचा गोषवारा घेऊन कपिला गाईच्या कवितेच्या माध्यमातून अडचणीची मांडणी केली आहे. तर त्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासठी आजपर्यंत ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले आहे,त्यांची मांडणी कवितेच्या माध्यमातून केली आहे. विमलताई माळी यांचे शिक्षण दुसरी पर्यंत झाले असून त्यांनी आतापर्यंत 600 च्या आसपास कविता रचल्या आहेत. त्यांचा एक कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांना अनेक संस्थाकडून पुरस्कार देखील मिळाले आहेत.

Similar News