भंडारा: घोड्यांमध्ये आढळला 'ग्लॅडर्स' आजार, नवरदेवांच्या वरातीवर बंदी...
काय आहे 'ग्लॅडर्स' आजार? काय आहेत या आजाराची लक्षणं? हा आजार मनुष्याला होऊ शकतो का? अद्यापपर्यंत या आजारावर कोणताही इलाज का नाही? इंग्रजांच्या काळातील कायद्यानुसार दिलं जातं दयामरण? वाचा काय आहे घोडा व्यावसायिकांच्या व्यथा?
राज्यातील औरंगाबादनंतर आता भंडारा जिल्ह्यात एका दुर्मिळ आजारामुळे घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आजाराचं नावं 'ग्लॅडर्स' असं असून हा आजार संसर्गजन्य आहे.
भंडारा शहरातील शीतला माता मंदिर परिसरात 6 वर्षाची घोडी तसेच शास्त्री चौकातील 20 वर्षाच्या घोड्याचा समावेश आहे. या घोड्यांची नियमित तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 5 जानेवारीला या घोड्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल 4 फेब्रुवारीला प्राप्त झाला आहे. त्यातील दोन घोड्यांचे नमुने पॉझिटीव्ह आल्यानं या घोड्यांना दयामरण देण्यात येणार आहे.
याविषयी आम्ही येशुदेव वंजारी सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन विभाग भंडारा यांच्याशी बातचित केली. ते म्हणाले ग्लॅडर्स हा रोग सध्या घोड्यांना होताना दिसून येत आहे. सध्या दोन घोड्यांना हा रोग झाला असून सध्या त्यांच्यावर उपचार पद्धती आहेत. आणि त्यांचा सांभाळ करणारे गृहास्थ यांचा वर देखील जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्याला प्रशासनाने घोड्यांचे प्रदर्शन देखील बंद केली आहेत. हा रोग घोड्यांतून माणसात येण्याच्या प्रकार अजुन भारतात झालेला नाही. प्राणीजन्य आजार पासून सावध राहण्यासाठी घोड्यांचे प्रदर्शन आणि यात्रेमध्ये आणणे बंद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 5 किलोमीटर अंतरावरील घोड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात 26 घोडे असून 17 घोड्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले आहेत. आणि जे बाधित घोडे आहे. त्यांचे प्रशासनाच्या आदेशानंतर दयामरण करण्यात येईल.
काय आहे ग्लॅडर्स आजार?
अश्व वर्गातील घोडे, गाढव, खेचर या प्राण्यांना हा आजार होतो. 'ग्लॅडर्स' या प्राणघातक आजारावर आत्तापर्यंत जागतिक पातळीवर देखील लस उपलब्ध नाही. हा प्राणघातक आजार संसर्गजन्य आहे. हा आजार झाल्यानंतर घोड्याला ब्रिटिशांच्या काळात असलेल्या कायद्याने दयामरण देण्यात येते. 'ग्लॅडर्स फार्सी कायदा १८९९' नुसार घोड्यांना दयामरण दिलं जातं.
इंग्रजांच्या काळात घोड्यांना गोळी मारून ठार करण्यात येत असे. मात्र, आता या कायद्यात बदल केला गेला आहे. या संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या घोड्याला दयामरण देताना वेदना होऊ नये म्हणून भुलीचे इंजेक्शन देतात.
दयामरण देण्यापुर्वी पशुसंवर्धन विभाग या संदर्भात एक समिती गठित करतो. ही समिती घोड्याच्या रक्ताचे नमुने तपासते. आणि अहवाल देत. हा अहवाल पॉझिटिव्ह आला तर समिती पुढील निर्देशानुसार सदर घोड्याला भूल देऊन दयामरण दिले जाते. त्यानंतर या घोड्याच्या मृतदेहाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.
कशी होते तपासणी?
लक्षणं आढळलेल्या घोड्याचे रक्तजल नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. त्यानंतर हे नमुने हरियाणातील हिस्सार येथे पाठवण्यात येतात. या नमुन्यांचा अहवाल येण्यास कमीत कमी 15 दिवस लागतात. तोपर्यंत या घोड्यांची नियमित तपासणी केली जाते.
मनुष्यांना 'हा' आजार होऊ शकतो का?
मनुष्यांना हा आजार होऊ शकतो. म्हणून या घोड्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांची नियमित तपासणी करण्यात आली आहे. अद्यापर्यंत मनुष्याला हा आजार झाल्याचं समोर आलेलं नाही.
याकाळात या आजाराची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून भंडारा जिल्हा शल्यचिकित्सकांना संबंधित घोडेमालकाच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असं पत्र देण्यात आलं आहे. तसंच ग्लॅडर्स या आजारावर कुठलाही औषधोपचार आतातरी उपलब्ध नसल्यामुळे हा आजार झालेल्या घोड्यांना ठार मारणे हाच शेवटचा उपाय असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
ग्लॅडर्स आजार मनुष्याला होऊ नये म्हणून घोड्याला दयामरण देणं हा एकच पर्याय असल्यानं घोड्याला दयामरण देण्यात येते. 2017 ला महाबळेश्वर भागात हा आजार पसरला होता. त्यावेळी साधारण १२५ घोडय़ांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून सर्व घोडय़ांना धनुर्वात आणि इतर रोगांना प्रतिकार करण्यासाठी शक्ती वाढावी म्हणून प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या होत्या. यावेळी घोडे खरेदीवर तीन महिने बंधनं घालण्यात आली होती.
तसंच 2020 मध्ये औरंगाबाद कोकणवाडी परिसरात देखील दोन घोड्यांना दयामरण देण्यात आले होते. घोडे पाळून त्यांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची या ठिकाणी वस्ती आहे. या वस्तीत दोन घोड्यांना हा आजार झाला होता.
कशावर बंदी येणार?
भंडारा शहरात आता...
घोड्याच्या खरेदी विक्रीवर बंदी...
घोड्याचा कामास वापर करण्यावर बंदी...
रस्त्यावरील घोडा गाडीवरही बंदी घालण्यात येण्याची शक्यता...
लग्नसमारंभात घोड्याचा वरातीसाठी वापर करण्यावर बंदी...
बाधीत क्षेत्रामध्ये घोडे वापरण्यावर बंदी घालण्यात येते. त्यामुळं पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम होतो.
घोड्यांच्या यात्रेवर बंदी घालण्यात आली आहे.
ग्लॅंडर्स आजारीची लक्षणं कोणती?
ज्या घोड्यांना या रोगाची लागण झाली आहे. असे घोडे कसे ओळखायचे? याबाबत साधारण पुढील लक्षणं दिसून येतात.
घोड्यांच्या अंगावर जखमा होतात.
घोड्यांच्या नाकांमध्ये फुटकुळ्या येतात.
घोड्यांना ल्गज इन्फेक्शन होते.
घोड्यांच्या अंगावर शरिरावर गाठी आणि जखमा होतात
कधी कधी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र, आजार होतो.
ग्लॅडर्स रोगाने घोडा व्यावसायिक अडचणीत...
कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून मोठ्या लग्न समारंभांना सरकारने परवानगी बंद केली आहे. त्यामुळे बॅंड वाल्यांपासून मेहंदी काढणारे लोक संकटात आले आहेत. त्याच बरोबर नवऱ्या मुलाच्या वराती देखील बंद झाल्यानं घोडा व्यवसायीकांचं मोठं नुकसान झालं आहे.
त्यातच थोड्या बहुत प्रमाणात ग्रामीण भागात आता लग्नसमारंभात मागणी सुरु झाली असताना अचानक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभात घोड्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं घोडा व्यावसायिक अडचणीत आले आहेत. असं आमचे प्रतिनिधी अभिजित घोरमारे यांनी सांगितलं.
दरम्यान ज्या घोड्यांना दयामरण देण्यात य़ेणार आहे. त्या घोडा मालकांना 25 हजार रुपये सरकारी मदत देण्यात येणार आहे. सध्या घोड्याची किंमत 50 ते 60 हजारांपर्यंत असते. काही घोड्यांची किंमत लाखांपेक्षा देखील अधिक असते. अशा परिस्थितीत सरकारी मदत तोकडी पडते. त्यातच ही मदत ताबडतोब दिली जात नाही. या पैश्यात दुसरा घोडा घेता येत नाही. त्यातच व्यवसाय बंद केल्यानं आम्ही काय खायचं असा सवाल या व्यावसायिकांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केला आहे.