लोकांना समान संधी देण्यात भांडवलशाही कमी पडत असल्यानं समाजातील सध्याची स्थिती पाहता भांडवलशाहीला गंभीर धोका असल्याचे मत भारताच्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. भांडवलशाहीकडे आकर्षित झालेल्या लोकांची आणि देशांची अवस्था बिकट होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये ‘बीबीसी रेडिओ-4 एस टुडे’ कार्यक्रमात बोलत होते.
जगात आर्थिक मंदी येणार हे रघुराम राजन यांनी जगाला सांगितलं होत. त्यानंतर जगात आर्थिक मंदी आली. मात्र, भारतात त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे भारतीय अर्थ व्यवस्थेला याचा मोठा फटका बसला नाही. त्यामुळे आता रघुराम राजन यांनी व्यक्त केलेल्या या विचारांना मोठं महत्व प्राप्त होतं.
तेव्हा समाजात बंड निर्माण होते...
जगातील एकूण भांडवलशाही बाबत आपले विचार मांडताना रघुराम राजन यांनी जगातील भांडवलशाही धोक्यात असल्याचे मत मांडले. सध्याच्या स्थितीत भांडवलशाहीत अनेकांना संधीच मिळत नाही. योग्य लोकांना संधी नाकारली जाते, तेव्हा समाजात बंड निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेचा विचार करताना जगभरातील सरकारांना सामाजिक असमानता नजरेआड करून चालणार नाही, असे ते म्हणाले.
2008 नंतर भांडवलशाही धोक्यात...
2008 नंतर आलेल्या जागतिक आर्थिक मंदीनंतर आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेकडून जनतेला समान संधी मिळत नाहीत. संधीच नसल्यामुळे भांडवलशाहीला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नोकऱ्यांचे प्रमाण घटले...
पूर्वी साधारण शिक्षण घेतल्यानंतर मध्यम वर्गाला नोकरी मिळायची. मात्र, 2008 च्या जागतिक मंदीनंतर परिस्थितीत बदल झाला. नोकऱ्या मिळवण्यासाठी आता उच्च शिक्षण घेणे बंधनकारक होऊ लागल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्याच्या परिस्थितीवर बोलताना रघुराम राजन यांनी तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही गोष्टीची निवड करू शकत नाही. त्यामुळे सर्वांना समान संधी देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे असल्याचं देखील यावेळी रघुराम राजन यांनी सांगितलं.