खडसे, महाजन, गुलाबराव पाटील एकत्र आल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

राजकीय हाडवैर असलेले एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील एकत्र आल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल. वाचा मॅक्समहाराष्ट्राचा विशेष रिपोर्ट

Update: 2021-09-01 06:18 GMT

ED च्या कारवाहीनंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन पहिल्यांदाच एकत्र आले. भाजप ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप च्या नेत्यांवर थेट हल्ला चढवला होता. भाजप वर टीका करण्याची एकही संधी खडसे यांनी सोडली नाही. एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश सोहळ्यावेळी आपल्या मागे 'ईडी लावली तर मी सीडी काढेन' असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोर खडसे यांनी भाजप ला दिला होता.

काही दिवसानंतर भोसरी MIDC भूखंडाप्रकरणी खडसे यांच्या मागे ED चा ससेमिरा लागला. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावलं. त्यात जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली. ईडीची चौकशी अजूनही बाकीच आहे. खडसे परिवारावर ईडीची टांगती तालवार आहेच. मात्र, जळगाव जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेऊन खडसे-महाजन यांना एकत्र आणलं.

खडसे-महाजन-पाटील वाद...

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघात राजकीय हाडवैर आहे. दोघेही नेते भाजप मध्ये एकत्र काम करत होते. सुरवातीला खडसें-महाजन गोड-जोळी म्हणून प्रसिद्ध होती. भाजपची सत्ता आल्यानंतर मात्र, दोघात कटुता आली, आणि एकमेकांचे पक्के राजकीय वैरी बनले. हे काही लपून राहील नाही. एकमेकांमध्ये कट शहाच राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. खडसेंमागे ईडी लागली आहे, 'ईडी आणि सीडी' मुळे खडसे आणि महाजन वाद विकोपाला गेला आहे. हे कोणीही नाकारणार नाही. तर महाजन यांचे निकटवर्तीय BHR गैरव्यवहारात अडकल्याने खडसे हे महाजनांचं नाव न घेता त्याच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही.

विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांच आणि एकनाथ खडसे यांच राजकीय हाडवैर आहे. भाजप-शिवसेना युतीची सत्ता असतांना गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर आरोप केल्याप्रकरणी 25 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा खडसे यांनी दाखल केला होता. ज्या दिवशी खडसे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. त्या दिवशी गुलाबराव पाटील यांच्या मोठ्या मुलाचं लग्न होतं. त्यामुळं खडसे-पाटील या दोघात ही राजकीय वैर लपून राहील नाही.

मात्र जिल्हा बँक निवडणुकीत काही तरी शिजत असल्याने 'सहकारात राजकारण नको' असं गोंडस पणे म्हणत सर्वच राजकीय पक्षांना एकत्र येण्याची गरज वाटू लागली आहे आणि त्यातून सर्वपक्षीय नेते एकत्र येताहेत.

खडसे महाजन एकत्र येण्याचं काय आहे कारण?

खडसे-महाजन यांचं टोकाचं राजकारण चालू असतांना अश्यातच जिल्हा सहकारी बँक निवडणूक आल्याने दोघे नेते प्रथमच एकत्र आले. सहकारात राजकारण नको म्हणून जिल्हा सहकारी बँकेत सर्वपक्षीय पॅनल च्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन एकत्र आले. यासाठी शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी सर्वानुमते बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत.

यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ह्या चारही राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यावर सर्व नेत्यांची संमती घेण्यात आली. यावेळी प्रमुख नेत्यांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, भाजपचे गिरीष महाजन काँग्रेस चे आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. तसेच सर्वच पक्षांचे संचालक उपस्थित होते.

आठ सदस्यांची कमिटी घेणार निर्णय

ह्या बैठकीत सर्वानुमते सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निश्चित करण्यासाठी आठ सदस्यांची कमिटी नेमण्यात आली आहे. ही कमिटी आठ दिवसात जिल्हा बँकांच्या 21 संचालकांच्या जागा वाटपाबाबत चर्चा करून अहवाल तयार करेल. कोणत्या पक्षाला किती जागा? कोणता उमेदवार द्यायचा ह्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ह्या बाबत सर्व नेत्यांचं एकमत झाले आहे.

नाहीतर निवडणूक अटळ?

जिल्हा सहकारी बँकेच्या 21 संचालकांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला तर सर्वपक्षीय पॅनल वर शिक्कामोर्तब होईल. अन्यथा जागा वाटप फिस्कटलं तर निवडणूक अटळ असेल. 21 जागांमध्ये 6 राखीव जागा सर्वात महत्वाच्या आहेत. ह्याच राखीव जागा बिनविरोध व्हाव्यात असा आग्रह आहे. ह्या 6 जागांचा तिढा सुटला तरच सर्वपक्षीय पॅनल उभं राहिलं. अन्यथा निवडणूक अटळ आहे. इतर पुढच्या जागांचा निवडणूक झालीच तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे स्वबळावर लढू शकतात. यासाठी या दोनही पक्षांची तयारीही झाली आहे. यासाठी दिगग्ज उमेदवार राजकारण बाजूला करून स्वपक्षाचा झेंडा ऐवजी सहकारासाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात घेऊ शकतात. अशीही चर्चा रंगली आहे.

अनेक राजकीय दिगग्ज संचालक सध्या नाराज आहेत. अनेक जण 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. हेच नाराज संचालक सर्वपक्षीय पॅनल ला ऐनवेळी 'खो' ही देतील अशी चर्चा आहे.

सर्वपक्षीय पॅनलसाठी आग्रह - गुलाबराब पाटील

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्वपक्षीय पॅनल करून निवडणूक व्हावी. ही आपली इच्छा आहे. यासाठी आपण एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांना एकत्र आणलं आहे आणि या दोघा नेत्यांचीही सर्वपक्षीय पॅनल ला संमती आहे.

जागा वाटप अजून बाकी आहे. त्यानंतरच ठरवता येईल- गिरीश महाजन

आपण विकासाचं राजकारण करतो, अजून जागा वाटप बाकी आहे. जागा वाटप सर्वानुमते होणार आहे. जर तिघे (राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस) एकत्र झाले आणि भाजप ला एकही जागा देणार नसतील तर कसं चालेल? जागा वाटपाची कमिटी नेमली आहे. सर्वानुमते निर्णय होत असेल तर सर्वपक्षीय पॅनल ला आपलं समर्थनच आहे. असं मत गिरिश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.

सहकारामध्ये राजकारण नको- एकनाथ खडसे

सहकारामध्ये राजकारण नको ही आपली भूमिका आहे. गेल्या पाच वर्षात सर्वपक्षीय पॅनलच्या संचालकांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळं बँक चांगल्या स्थितीत आली. विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढवता येतात. पण सहकारी बँक सर्वपक्षीय पॅनल झालं तर अधिक फायदा होतो.

सर्वपक्षीय पॅनल साठी आठ सदस्यांची कमिटी -

सर्वपक्षीय पॅनल साठी आठ सदस्यांची कमिटी नेमण्यात आली आहे. यात भाजप सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य नेमण्यात आली आहेत.

1) एकनाथ खडसे ( राष्ट्रवादी )

2) गुलाबराव देवकर( राष्ट्रवादी)

3) गिरीश महाजन( भाजप)

4) सुरेश भोळे ( भाजप)

5) चिमणराव पाटील ( शिवसेना)

6) किशोर पाटील- (शिवसेना)

7) शिरीष चौधरी( काँग्रेस)

8) संदीप पाटील (कॉंग्रेस)

एकंदरीत या पॅनलच्या निमित्ताने हे नेते एकत्र आल्यानं ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आपल्या हातात असावी. असा विचार या चारही पक्षांच्या नेत्यांचा असल्याचं दिसून येतंय.

Tags:    

Similar News