ऊस पट्यात अंजीर शेतीची लागवडीचे यशस्वी धाडस
उजनी धरण असूनही दुष्काळ पाचवीला पुजलेल्या माढा तालुक्यात सीनेच्या पाण्यानं उस बहरला असला तरी आतबट्ट्याचा ऊस पीक ठरत असताना अंजनगाव येथील शेतकरी नागेश शेळके यांनी केला असून त्यांचा अंजीर शेतीचा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग करुन यशस्वी केला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;
सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात सुमारे 35 च्या आसपास साखर कारखाने असून जिल्ह्यातून भीमा आणि सीना नद्या वाहतात. या नद्यांना उजनी धरणातून बारमाही पाणी सोडले जाते. त्यामुळे या नद्या काठची शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली आली असून जिल्ह्याच्या बऱ्याच भागातून कॅनॉल गेले आहेत. यामुळे सुद्धा शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली आले आहे. उसाच्या शेतीला पाणी आवश्यक असते. ते पाणी उजनी धरणातून मिळत असल्याने शेतकरी उसाच्या शेतीकडे वळले आहेत. पण अलीकडच्या काळात उसाच्या शेतीमुळे शेतकरी अडचणीत आला असल्याचे दिसून येते.
शेतातील ऊस साखर कारखान्याला जाण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागत असल्याने शेतकऱ्यातून चिंता व्यक्त केली जात आहे. ऊस कारखान्याला जावून ही शेतकऱ्यांना उसाचे पैरे वेळेवर मिळत नाहीत. त्यासाठी त्यांना आंदोलने,मोर्चे काढवे लागतात. चालू वर्षी अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ऊस कारखान्याला जात नसल्याने काही शेतकऱ्यांनी ऊस जाळून कारखान्याला पाठवला होता. त्यामुळे यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. उसाच्या शेतीने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण केल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करू लागला आहे.
असाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव (खेलोबा) येथील शेतकरी नागेश शेळके यांनी केला आहे. त्यांनी आपल्या शेतात अंजिराची लागवड करून जिल्ह्यात नवीन पीक पद्धतीस सुरुवात केली आहे. अंजीराची लागवड त्यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी केली असून त्यांना बाग लावण्याची माहिती वर्तमान पत्रातून समजल्याचे ते सांगतात. या अंजिराच्या बागेवर द्राक्ष बागेवर जे रोग पडतात. तेच रोग या बागेवर पडत असल्याने योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अंजीर शेतीचा पहिलाच प्रयोग
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात उजनी धरण असूनही दुष्काळी तालुका समजला जातो. या तालुक्यातील शेती क्षेत्र सीना नदीमुळे बऱ्याच प्रमाणात ओलिताखाली आले आहे. त्यामुळे येथील शेतकरी उसाच्या शेतीत रमला असल्याचे दिसून येते. परंतु ऊस शेतीमुळे दिवसेंदिवस समस्या निर्माण होवू लागल्याने आता शेतकरी विविध पिकांकडे वळला आहे. तो शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. असाच प्रयोग तालुक्यातील अंजनगाव येथील शेतकरी नागेश शेळके यांनी केला असून त्यांचा अंजीर शेतीचा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे.
अंजनगाव (खेलोबा) हे गाव मोहोळ - कुर्डुवाडी रोडवर वसलेले गाव असून तीन ते चार हजार लोक वस्तीचे गाव आहे. या गावात बहुसंख्यांक लोक शेतकरी आणि शेतमुजर आहेत. या गावातील लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून असून यापूर्वी या गावात सेंद्रिय शेतीचा प्रयोग देखील येथील शेतकऱ्याने केला होता. अंजीर शेती करणारे शेतकरी नागेश शेळके यांची शेती अंजनगाव पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असून ती मोहोळ - कुर्डुवाडी रस्त्याला लागून आहे. या शेतकऱ्याला दहा एकर शेती असून यामध्ये विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये केळी,ऊस याचा समावेश आहे. त्याच बरोबर त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध पालनाचा व्यवसाय ही केला आहे. त्यासाठी त्यांनी जर्सी गाई चे संगोपन देखील केले आहे. त्यातूनही त्यांना आर्थिक लाभ मिळत आहे.
अंजीर शेतीच्या लागवडीसाठी एक लाख रुपयाच्या आसपास आला खर्च
अंजीर शेती करत असताना शेतकरी नागेश शेळके यांनी शेती क्षेत्रातील तज्ञाचे मार्गदर्शन घेतले नाही. या शेतकऱ्याला पेपर वाचण्याची आवड असून एके दिवशी पेपर वाचत असताना त्यांना अंजीर शेतीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या शेतात अंजीराची लागवड करण्याचे ठरवून पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथून अंजिराची रोपे मागवली. पेपर मध्येच वाचून रोपे लावण्यासाठी खड्डे करण्यात आले. या खड्ड्यात अंजीर रोपांची लागवड करण्यात आली. या रोपांची लागवड करत असताना दोन्ही झाडात दहा बाय दहा चे अंतर ठेवण्यात आले. अंजीराच्या झाडाची वाढ होत असताना पसरले जाते. त्यामुळे भविष्याचा विचार करून या रोपांची लागवड करण्यात आल्याचे शेतकरी नागेश शेळके यांनी सांगितले. अंजीर शेतीची लागवड एक एकरात करण्यात आली असून या शेतीला ड्रीपने पाणी दिले जात आहे. या झाडांची वाढ होत असताना वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्या करण्यात आल्या आहेत. तसेच झाडांना खतांचाही योग्य मारा करण्यात आल्याने बाग चांगल्या स्थितीत असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
डवण्या,बुरशी, मर रोगाचा या बागेवर होतो प्रादुर्भाव
द्राक्ष,डाळींब बागावर पडणारे रोग या अंजिराच्या बागेवर पडत असून त्यासाठी योग्यवेळी योग्य कीटकनाशके फवारणे आवश्यक असल्याचे शेतकरी नागेश शेळके सांगतात. या झाडांना जास्त प्रमाणात पाणी ही चालत नाही. बागेत जास्त पाणी साचल्यास अंजिरची झाडे मर रोगाला बळी पडू शकतात. त्यामुळे बागेतील पावसाचे पाणी तातडीने हटविणे गरजेचे असते. सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी जास्त पाऊस झाल्याने सांगोला तालुक्यात डाळींब बागा मर रोगास बळी पडून त्या उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंजीर शेती करत असताना योग्य प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या शेतीवर द्राक्ष बागांवर पडणारा डवण्या रोग पडतो. याचा प्रादुर्भाव वाढू लागल्यास तो कमी करण्यास औषधांची फवारणी वेळेत करणे आवश्यक आहे. तरच हा रोग आटोक्यात येवून बाग चांगल्या प्रकारे फुलेल. अंजीराची झाडे चांगल्या स्थितीत राहिल्याने फळे ही चांगली येवून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होवू शकतो.
अंजीर विकले जातेय लोकल मार्केटला
अंजीर आरोग्यास चांगल्या प्रकारचे असल्याने याची मागणी मार्केट मध्ये आहे. साधारण अंजिराच्या झाडांना उन्हाळ्यात फळे येतात. या काळात अवकाळी पावसाचा जोर असतो. त्यामुळे अवकाळी पावसापासून देखील त्याचे संरक्षण होणे गरजेचे असते. नाहीतर वर्षभर केलेली मेहनत वाया जाण्याची भीती असते. शेतकरी नागेश शेळके आपल्या शेतातील अंजीर सोलापूर जिल्ह्यातील लोकल मार्केटला विकतात. यामध्ये सोलापूर शहर,मोहोळ,कुर्डुवाडी,माढा याचा समावेश होतो. मार्केटमध्ये अंजीर 80 ते 90 रुपये किलोने विकले जाते. पहिल्या वर्षी फळ धरण्यात आले नव्हते. पण दुसऱ्या वर्षी फळ धरून ते मार्केट मध्ये विकण्यात आले. बाग लावण्यासाठी आलेला खर्च निघाला असल्याचे शेतकरी सांगतो. याही वर्षी चांगल्या प्रकारे पीक निघेल,असे शेतकरी नागेश शेळके यांना वाटते.