Ground Report : लालफितीत अडकलेल्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चातून काढला 'मार्ग'
प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांच्या अडचणींना दाद मिळत नाही हा अनुभव कायम येत असतो. पण या लालफितीच्या कारभाराला कंटाळून शेतकऱ्यांनीच अडचणीवर मार्ग काढल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यात घडला आहे. पाहा आमचे प्रतिनिधी प्रणय ढोले यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;
शेतकऱ्यांचा संघर्ष गल्ली ते दिल्ली असाच सुरूच आहे. सरकारी कारभाराचा फटका सामान्य शेतकऱ्यांना सतत बसत असतो. अशीच कहाणी आहे वर्धा जिल्ह्यातील वायगाव निपाणी या गावातील शेतकऱ्यांची.....या शेतकऱ्यांनी तब्बल ३ वर्षांपासून सतत शासकीय दरबारी पांदन रस्त्यासाठी मागणी लालून धरली होती. पण त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेतकऱ्यांनी स्वखर्चातून तब्बल ३०० मीटरचा पांदन रस्ता आणि १५ मीटरचा पूल नाल्यावर बांधण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणलाय.
या शेतकऱ्यांची शेतं नाल्याच्या दुसऱ्या बाजूला आहेत. पण तिथे जाण्यासाठी पावसाळ्यात पाण्यातून जाण्याशिवाय शेतकऱ्यांकडे कोणताची पर्याय नसतो. यामुळे जीवाला धोका असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळेच मग सरकार दरबारी पुल बांधावा यासाठी वारंवार चकरा मारल्या पण मागणी काही मान्य झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करुन पुलाचे काम करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना ३ लाख रुपये जमवले त्यात पुलाचे काम अर्धे झाले आहे. पण पुढील कामासाठी आणखी २ लाख रुपये किमान लागणार आहेत. पण त्यासाठी तरी सरकारने मदत करावी अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. सध्या पैसे नसल्याने काम बंद पडले आहे.
या भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नाल्याचे खोलीकरण करण्याचे काम बजाज फाऊंडेशनतर्फे केले जाते. पण जिथे शेतकऱ्यांचा रस्ता आहे तिथे आम्ही खोलीकरणाचे काम करत नाही अशी प्रतिक्रिया फाऊंडेशनच्या महेंद्र फाटे यांनी दिली आहे. तसंच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रस्त्यासाठी त्रास होत असेल तर प्रशासकीय यंत्रणेकडे त्याबाबत पाठपुरावा कऱण्यासाठी मदत करता येईल असे त्यांनी सांगितले. पण यासंदर्भात जेव्हा आमच्या प्रतिनिधीने तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्यास ती या बातमीमध्ये अपडेट केली जाईल.