Ground Report : शेतात जाण्यासाठी जीवघेणा जलप्रवास, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
जिल्हा परिषद, विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक असो...नेत्यांची आश्वासने हमखास ठरलेली असतात. निवडून आल्यास लोकांच्या समस्या सोडवणार असे आश्वासन दिले जाते....पण एकदा निवडणूक झाली की या आश्वासनांचे काय होते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. बीड जिल्ह्यातील लक्ष्मीपूरमधील गावकऱ्यांनाही नेत्यांच्या या आश्वासनांचा असाच फटका बसतो आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी शहरापासून अगदी चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मीपुरी या गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी गेल्या 25 ते 30 वर्षापासून जलप्रवास करावा लागतो आहे. पावसाळ्यात तर या लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी महिला वंदना सवाशे सांगतात की, " तलावाच्या त्या बाजूला आमची शेती आहे. आम्हाला त्या ठिकाणी शेती करण्यासाठी जावंच लागते, दुसरा पर्याय नाही. गेल्या 25-30 वर्षांपासून आम्ही हा जलप्रवास करत आहोत, तिकडे वस्ती आहे. त्यासाठी जावंच लागतं. 20 वर्षांपूर्वी 3 मुलं पाण्यात बुडून मरण पावली. आम्हाला जाण्या येण्यासाठी पूल व्हावा अशी आमची मागणी आहे."
तर अंकुश सवाशे सांगतात, की, " या चप्पूवर बसून आम्हाला रोज जावे लागते. सकाळी आणि संध्याकाळी पण यावे लागते. आमची रोजची जीवघेणी कसरत आहे. याच्यात महिला सुद्धा पडतात. पण इतर लोक असल्यामुळे त्यांना वाचवले गेले आहे. या अगोदर 2008/9 मध्ये एक मुलगा व दोन मुली असेच अपघाती गेले. पण आमच्या अडचणींची प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. आमची लोकप्रतिनिधींना एकच मागणी आहे ती म्हणजे आम्हाला पूल बांधून द्यावा...दर पाच वर्षांनी आमदार, खासदार, जिल्हापरिषदेच्या निवडणुकीला येतात, आश्वासने देतात पण ती पूर्ण होत नाहीत."
15 ते 20 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी तलावाच्या पलीकडे आहेत, तसेच काही लोक तिकडे राहतात देखील, पण वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही, त्यांना सुद्धा असे जीव धोक्यात घालून जाव लागते आहे. याबाबत गावचे सरपंच रमेश सवाशे यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "1979/80 मध्ये तलाव झालेला आहे. तेव्हापासून आमच्या लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. रस्त्याची तक्रार दादांकडे केली आहे त्यावेळी ते जलसंपदा खात्याचे मंत्री होते. जयंत पाटील यांच्याकडे, धनंजय मुंडे साहेबांकडे तक्रार केली, पण ते फक्त आमचे निवेदन घेतात आणि करतो म्हणतात. पण पुन्हा त्यापुढं काहीच प्रक्रिया केली जात नाही.