शेतकरी पुत्राचा देशी जुगाड
इंधनाच्या वाढत्या दरवाढीने सर्वसामान्य हैराण झाला असताना शेतकरी पुत्र दीपक नाईकनवरे याची टू-व्हीलर गाडी थांबली तरीही होते चार्जिंग आणि धावली तर होते चार्जिंग कितीही पळवा ना पेट्रोल,ना प्रदूषण सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक बाईकला आव्हान मिळाले आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट..;
युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे पेट्रोल,डिझेलच्या किंमती वाढल्या जातील असे सांगितले जात आहे.याबाबतच्या सातत्याने बातम्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेत विविध चर्चांना उधाण आले आहे.त्यातच खाद्य तेलाच्या किंमतीत 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे.वाढत्या महागाईने जनता सध्या हैराण झाली झाली आहे.त्यात वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या किंमतीमुळे जनतेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे जनता पर्यायी व्यवस्थेच्या शोधार्थ आहे.सर्वसामान्य जनतेला दोन चाकी गाड्या,चारचाकी गाड्या चालवणे परवडेना गेले आहे.
वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या किंमतीचा सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर थेट परिणाम जाणवत आहे.वाढत्या पेट्रोलच्या किंमतीला पर्याय म्हणून दोन चाकी गाड्याच्या कंपन्यांनी चार्जिंगवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणल्या आहेत.त्यांची ग्राहकांनी खरेदीही मोठ्या प्रमाणात गेली आहे.पण या चार्जिंगवर चालणाऱ्या दोन चाकी गाड्यांची चार्जिंग संपल्यानंतर त्यांना लाईटवर चार्जिंग करावे लागते.त्यानंतरच त्या गाड्या चालवता येतात.लांबच्या पल्यासाठी या गाड्या घेऊन जाताना अडचणी येत आहेत. त्यांना चार्जिंग करण्यासाठी हायवेवर अथवा इतर राज्य मार्गांवर चार्जिंग पॉइंट नसल्याने या गाड्या शहरात अथवा गावात चालवण्या पुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत.यामध्ये काही चारचाकी कंपन्यांनी इलेक्ट्रिक चार चाकी वाहने बाजारात आणली आहेत.त्यांचीही विक्री जास्त प्रमाणात झाली आहे.पण राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गांवर चार्जिंग पॉइंट नसल्याने त्यांची ही अडचण झाली आहे.काही दिवसांपूर्वी शासनाने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर चार्जिंग पॉइंट काढण्याची घोषणा केली आहे.यासाठी आणखीन काही कालावधी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या इलेक्ट्रिक बाईक व चारचाकी वाहनांमुळे प्रदूषण होत नाही.त्यामुळे या गाड्याना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
वरील सर्व गोष्टींना फाटा देत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सोहाळे गावच्या शेतकरी पुत्राने देशी जुगाड करत एक अनोखी इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे.या बाईकला ना पेट्रोल, ना काही तास चार्जिंगला लावण्याची गरज लागते.ही दोन चाकी गाडी थांबली तरीही चार्जिंग होते आणि धावली तरीही चार्जिंग होते.या गाडीमुळे प्रदूषण होत नाही.अशी ही अनोखी दोन चाकी गाडी बनवणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव दीपक नाईकनवरे असून त्याने लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने इलेक्ट्रिक साहित्याची जुळवाजुळव करत इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे.ही गाडी आपोआप चार्जिंग होते.त्यामुळे बिगर खर्चिक असणाऱ्या गाडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.त्याला अशीच बाईक बनवून देण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.पेटंट मिळाल्याशिवाय अशी दुसरी बाईक बनवणार नसल्याची भूमिका दिपकने घेतली आहे.अकलूज येथील कंपनीने ही काम करण्याची ऑफर दिली असल्याचे दीपक सांगतो.त्याची ही अनोखी गाडी पाहण्यासाठी विविध भागांतील नागरिक त्याच्या वस्तीवर येऊ लागले आहेत.बनवलेल्या गाडीची एखादी राईड मारून जातात.सध्या या बाईकची सोहाळे गावच्या आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा असून दीपक नाईकनवरे याचे कौतुक होत आहे.
लॉकडाऊन मध्ये हाताला काम नसल्याने सुचली कल्पना
दीपक नाईकनवरे यांचा इलेक्ट्रिक आयटीआय पंढरपूर येथे झाला आहे.तो विद्युत मोटारी भरण्याचे व वायरिंगचे काम करतो.कोरोनांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने दिपकच्या हाताला काम नव्हते. तो घरीच बसून होता.घरीच बसल्या-बसल्या त्याने विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.त्याने सर्वप्रथम घरातील लाइटची अडचण दूर करण्यासाठी घरातील जुनी असणारी हिरो-होंडाची दोन चाकी गाडी बाहेर काढली व तिला चार्जिंगवर चालणाऱ्या बॅटऱ्या बसवल्या.त्यामुळेच घरातील लाइटचा प्रश्न दूर झाला.या बॅटऱ्यावर घरातील दोन ते चार बल्ब चालू झाले.त्यानंतर त्याने आपला मोर्चा बाजारात उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रिक बाईककडे वळवला व त्याने त्यासाठी दुकानातून आणि ऑनलाइन इलेक्ट्रिक वस्तू खरेदी केल्या.त्या वस्तूपासून इलेक्ट्रिक बाईक बनवायला सुरुवात केली.त्यानंतर काही दिवसात इलेक्ट्रिक बाईकचा प्रयोग यशस्वी झाला.
बाईक बनवण्यासाठी 50 हजार रुपये आला खर्च
इलेक्ट्रिक बाईक बनवण्यासाठी 12-12 व्होल्टेजच्या 4 बॅटऱ्या गाडीच्या दोन्ही बाजूस लोखंडी पेटीत बसवण्यात आल्या आहेत.गाडीच्या इंजिनच्या जागी 750 वँटची विद्युत मोटार बसवण्यात आली आहे.येथेच एक 12 व्होल्टेजची बॅटरी बसवण्यात आली आहे. बॅटरी व विद्युत मोटारीचे वायरींग केले आहे.त्यावरच आतील सर्व उपकरणे चालत आहेत.यावरच गाडीत असणाऱ्या इतर 48 व्होल्टेज 4 बॅटऱ्या आपोआप चार्जिंग होत आहेत.हे सर्व मटेरियल खरेदी करण्यासाठी 40 ते 50 हजार रुपये खर्च आला असल्याचे दीपक नाईकनवरे सांगतो.
बाईक जाग्यावर थांबली तरीही होते चार्जिंग,धावली तरीही होते चार्जिंग
या बाईकचे आगळेवेगळे वैशिष्ट्ये म्हणजे ही बाईक जाग्यावर थांबली असली तरीही चार्जिंग होते व धावत असली तरीही चार्जिंग होते.कितीही लांब जावा चार्जिंग संपण्याचा विषयच येत नाही.सध्या या गाडीची रनिंग 250 ते 300 किलोमीटर झाली आहे. पंढरपूर-वाखरी व गावात फिरवली असल्याचे दीपक नाईकनवरे याने सांगितले. या गाडीच्या दोन्ही बाजूस स्विच बसवली आहेत.एका बाजूच्या स्विचने घरातील लाईट सुरू करता येते.तर दुसऱ्या बाजूच्या स्विचने चार्जिंग बंद चालू करता येते.गाडी 100 किलोमीटर जाणार आहे,असे मीटर वरून समजल्यानंतर चार्जिंगचे स्विच बंद ठेवता येते.त्यामुळे बॅटऱ्या फुगण्याचा धोका संभवत नाही.बॅटऱ्यांना काही प्रमाणात आराम मिळतो.गाडी आता 50 किलोमीटर जाणार,असे समजल्यानंतर चार्जिंग होणारे स्विच चालू केले जाते व चार्जिंग आपोआप सुरू होऊन चार्जिंग संपण्याचा धोका टळला जातो.असे दीपक नाईकनवरे याचे मत आहे.
दिपकच्या इलेक्ट्रिक बाईकला इंजिनच नाही
ही बाईक बनवत असताना जुन्या गाडीचे इंजिन काढून ठेवण्यात आले आहे.त्याठिकाणी विद्युत मोटार व बॅटरी बसवण्यात आली आहे.या गाडीचा रस्त्यावर चालताना आवाज येत नाही.तसेच कल्स व गियरची गरज पडली नाही.केवळ अँक्सीलेटरवर चालते.गाडीला पिकअप जास्त असून जेवढी मूठ ओढाल तेवढी गाडी जास्त पळते.उलट गाडीचे फायदे आहेत. यामुळे पेट्रोलचा खर्च वाचतो.प्रदूषण होत नाही.चार्जिंग संपत नसल्याने कितीही लांब जाता येते.या गाडीसाठी रेग्युलर असणारी हेडलाइट वापरता येते.गाडीला बाहेरच्या घरगुती लाईटवर चार्जिंग करण्याची गरज भासत नाही.गाडीला सध्या टाकी जरी असली तरी,ती नुसती शो पुरती राहिली आहे.त्यात पेट्रोल भरले जात नाही.
पेटंटसाठी केला अर्ज
तयार केलेल्या गाडीचे पेटंट मिळावे यासाठी दीपक नाईकनवरे यांनी अर्ज केला आहे.येत्या काही दिवसात त्यांना पेटंट मिळेल असे त्यांनी सांगितले. ही अनोखी गाडी पाहून काही इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या कंपन्यांनी दिपकला कामाची ऑफर दिली आहे.कंपनीने सपोर्ट केल्यास आणखीन अत्याधुनिक बाईक बनवू असे दीपक यांनी सांगितले.तर गावकऱ्यांनी स्टार्टअप इंडिया मार्फत सरकारकडून त्याला उद्योग उभारण्यासाठी मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या विद्युत मोटारी भरण्याचे करतो काम
दीपक सध्या खराब झालेल्या विहरितील व बोरवेलच्या विद्युत मोटारी भरण्याचे काम करतो.त्यातून त्याला कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्या एवढे पैसे मिळतात.तर त्याचा मोठा भाऊ शेती सांभाळतो.त्याच्या या अनोख्या गाडीच्या प्रयोगाने त्यांच्या इच्छा ,आकांशा पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
https://www.maxmaharashtra.com/max-reports/farmer-made-deshi-jugad-of-vehicle-1117552