शेतकरी गेले पुरात वाहून, प्रशासन मात्र ढिम्म, श्रीपत-पिंपरी ग्रामस्थांचे बेमुदत धरणे आंदोलन
गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. गावातील नदीचा पुल कोसळल्याने सहा शेतकरी वाहून गेले होते. यासह शासनाने दिलेली नुकसान भरपाई वाटपाआधीच संपल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. याचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी वेध घेतला आहे.
रस्ते,पाणी, गटार, वीज या मुलभूत सुविधाही बार्शी तालुक्यातील श्रीपत-पिंपरी या गावी पोहचल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना आंदोलने करावी लागत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन शेतीवर अवलंबून असून या शेतीला निसर्ग कधी साथ देतो तर कधी देत नाही. काही वेळेस पावसामुळे हातातोंडाला आलेले पिकाचे नुकसान होते. त्यासाठी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. पण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी गावातील शेतकऱ्यांना गेल्या दोन ते तीन वर्षापासून नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाकडून नुकसानभरपाईची आलेली रक्कम वाटपाआधीच संपल्याचे अधिकारी सांगतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गावात रस्त्याचा ही प्रश्न ऐरणीवर आला असून त्यामुळे गावात एसटी येत नाही. एस टी गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याच बरोबर या गावच्या बाजूने ओढा वाहत असून या ओढ्याला दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येते. या पाण्यात प्रत्येक वर्षी दुर्घटना होते. या वर्षी अचानक ओढ्याला पाणी आल्याने सहा शेतकरी पाण्यातून येत असताना वाहून गेले होते. त्यांना गावकऱ्यांनी वाचवण्यात यश मिळवले. मात्र ही समस्या कायमचीच असून या ओढ्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. ती पूर्ण केली जात नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या गावात पावसाच्या पाण्यामुळे शेतीचे ही नुकसान झाले असून त्यांचे पैसे गेल्या दोन वर्षापासून मिळाले नाहीत. त्यामुळे विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी गावच्या मंदिरातच बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उठणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ओढ्याला आलेल्या पावसाच्या पाण्यात शेतकरी गेले वाहून
या गावात बहुसंख्यांक शेतकरी वर्ग असून या गावच्या कडेने ओढा वाहत आहे. गावकरी सांगतात की, हा ओढा नसून लुप्त झालेली पुष्पा नदी आहे. या ओढ्याला पावसाळ्यात 24 गावांचे पाणी येते. त्यामुळे या गावाजवळून वाहत असलेल्या ओढ्याला नदीचे स्वरूप येवून शेतीचे प्रचंड प्रमाणत नुकसान होते. या ओढ्याच्या पलीकडे श्रीपत-पिंपरी गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन असून ती कसण्यासाठी शेतकरी शेतात जातात. गेल्या पाच दिवसापूर्वी ओढ्याच्या पलीकडे असणाऱ्या शेतात या गावातील शेतकरी शेतीत काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस अचानक पाऊस सुरू झाला. पावसामुळे ओढ्याला पूर्वीच थोडेफार पाणी आलेले होते. त्यात पाऊस जास्त झाल्याने अचानक पाणी पातळीत वाढ झाली. या ओढ्यावरून घराच्या ओढीने शेतकरी आणि महिला गावात येण्यासाठी गडबडीने निघाले होते. ओढ्यावरुन वाहत असलेल्या पाण्याचा प्रवाह वेगाने होता. त्यामुळे ओढ्याच्या पुलावरून पाण्यातून येत असताना त्यांनी आधारासाठी एकमेकांचे हात धरले होते. यातील एक जण अचानक तोल जावून पडतो. तो पाण्याच्या वेगामुळे वाहून जावू लागतो. त्याचवेळेस एकमेकांचे आधारासाठी धरलेले हात सुटले जातात. यातील पुरुष आणि महिला शेतकरी पाण्याबरोबर वाहून जावू लागतात,याचवेळी या गावातील नागरिकांनी तत्परता दाखवत वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांना वाचवले होते. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या ओढ्यावर असणाऱ्या पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांकडून करण्यात येत असून त्याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या ओढ्याला आलेल्या पाण्यात प्रत्येक वर्षी दुर्घटना होत असून अनेकांच्या दोन चाकी गाड्या या पाण्यात पडल्या आहेत. या पाण्यामुळे काही नागरिकांना जीवाला देखील मुखावे लागले आहे.
नुकसान झालेल्या शेती पिकांची नुकसानभरपाई गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांना मिळेना
या गावात गेल्या अनेक वर्षापासून शेती पिकांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर ओढ्याला नदीचे स्वरूप येत असून मोठ्या प्रमाणावर पाणी पसरले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र पाण्याखाली जाते. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होते. यामध्ये प्रशासन पिकांचे पंचनामे करते. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षापासून येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता वरूनच निधी कमी आला असल्याचे सांगण्यात येते. आमच्या गावाला नुकसानभरपाईचा निधी आला होता. परंतु प्रशासनाने दुसऱ्याच गावाला वाटप केला. त्यामुळे आमचे नुकसान झाले असून याला प्रशासन जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ओढ्याला येणाऱ्या पाण्यामुळे शेती पिका बरोबरच शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर शासनाने तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.
रस्ता चांगला नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले
या गावापासून बार्शी शहर 15 किलोमीटर च्या आसपास आहे. उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थांना बार्शी शहरात जावे लागते. बार्शी शहर आणि श्रीपत पिंपरी या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून गेल्या अनेक दिवसापासून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी करण्यात येत आहे,परंतु रस्ता दुरुस्त करण्यात येत नाही. रस्ता खराब असल्याने या गावातील एसटी वाहतूक ठप्प झाली असल्याचे नागरिक सांगतात. एसटी वाहतूक ठप्प असल्याने येथील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले आहे. ज्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी पैसे आहेत,ते विद्यार्थी बार्शी शहरात खोली भाड्याने करून राहू शकतात,पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जायचे कोठे ? असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करूनही दुरुस्त केला जात नाही. त्यामुळे देवळातच ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रीयानंतर मॅक्स महाराष्ट्रने तहसिलदारांशी संपर्क साधला. यावेळी बार्शीचे तहसिलदार शेरखाने यांनी सांगितले की, पीक नुकसान भरपाई निधीची मागणी सरकारकडे केली आहे. त्याबरोबरच रस्ता आणि पुलाचीची संबंधित विभागाचे अधिकारी पाहणी करतील, असे तहसिलदार शेरखाने यांनी सांगितले.