शेतकऱ्यांने फुलवली कोकण पॅटर्न सेंद्रिय शेती
नुकतचं केंद्रीय अर्थसंकल्पात सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सेंद्रीय शेतीच्या विविध पध्दती महाराष्ट्रात आधीपासून वापरात आहेत. देशी खिलार गाईचे संगोपण करुन कोकणी पॅटर्नची सेंद्रीय शेती करणाऱ्या शशिकांत फदेंची यशोगाथा प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट..;
शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी कुकुट पालन व दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यातील देशी खिलार गाईची जागा जर्शी गाईनी घेतली आहे. जर्शी गाई या जास्त प्रमाणात दूध देत असून शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत झाली. पण या दुधाचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. असे तज्ञांचे मत आहे.जर्शी गाईंच्या पालनाला फाटा देत मोहोळ तालुक्यातील शेजबाभळगाव येथील शेतकरी शशिकांत फुदे यांनी देशी खिलार गाईंचे संगोपन करून कोकण पॅटर्न सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. फुदे यांच्याकडे असणाऱ्या देशी गाई बाजारात तब्बल 5 लाख रुपयाला विकल्या जात असून गाईंच्या गोमूत्रापासून त्यांनी सेंद्रीय शेती फुलवली आहे. कोकणातील काजू, फणस, सुपारी,नारळ,आंबा,करवंद ही फळझाडे त्यांच्या शेतात पहायला मिळतात.
खिलार गाईंच्या गोमूत्रापासून केली जातेय सेंद्रिय शेती
शेतकरी शशिकांत फुदे यांनी बोलताना सांगितले की, खिलार गाई आणि सेंद्रिय शेती यांची सांगड घातली तर चांगल्या प्रकारची शेती होऊ शकते. कोणतीही गोष्ट जोडी असल्याशिवाय यशस्वी होत नाही. त्यामुळे खिलार गाई संगोपणाला सेंद्रिय शेतीची जोड दिली आहे. गाईंच्या नैसर्गिक रेतनासाठी व भावी पिढी, दुधाची वंशावळ तयार करण्यासाठी खिलार संगोपणामध्ये जागतिक दर्जाचे ब्रीड म्हणजे खिलार महाराष्ट्राची शान आहे. रेतनासाठी एक वळू वापरत आहे.सेंद्रीय शेती करायची असेल तर खिलार संगोपनाशिवाय पर्याय नाही.खिलार गाईंच्या शेण आणि गोमूत्रापासून सेंद्रिय शेती शक्य आहे. गोमूत्रामध्ये जे घटक असतात.त्याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे.
शेतातील रासायनिक खताच्या बेसुमार वापराचा मानवी जीवनावर परिणाम
शेतात बेसुमार रासायनिक खते वापरली जात आहेत. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास खिलार गाईच्या गोमूत्रापासून केलेली सेंद्रिय शेती मानवी जीवनाला अतिशय उपयोगी आहे.शेतातील कीटक व किडे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. ते जतन करण्यासाठी खिलार जातीच्या गाईंच्या गोमूत्राचा वापर शेतात करणे गरजेचे आहे. खिलार गाई व बैलापासून पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती.त्याचा फायदा शेतीचा कस वाढण्यास होत होता.बैलांनी नांगरणी,पेरणी केली असता,त्याचा परिणाम कीटक,किडे व गांडुळांवर होत नव्हता. पण शेतात रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्याने त्यांना खाद्य मिळाल्याने. कीटकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊन औषधामुळे त्यांची ताकद वाढून रासायनिक खतालाही ते कंट्रोलमध्ये येईना गेले आहेत. त्यामुळे रोगराई वाढू लागली आहे. शेतकऱ्यांनी शेती करताना शेतात किमान 5 वर्षे रासायनिक खतांचा वापर करू नये.सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात दसपर्णी अर्क,गोमूत्र अर्क,गांडूळ खत वापरावेत.यासाठी शेतकऱ्यांनी खिलार गाईचे संगोपन करणे काळाची गरज आहे. असे मत शेतकरी शशिकांत फुदे यांनी मांडले.
भावी पिढी सशक्त बनवण्यासाठी खिलार गाईचे दूध पौष्टिक
आपली भावी पिढी सदृढ,सशक्त करण्यासाठी खिलार गाईचे दूध त्यासाठी पौष्टिक आहे.आज एकीकडे जर्शी गाईंचा बेसुमार वापर वाढला आहे. जर्शी गाई आणि खिलार गाईच्या दुधात फरक आहे. मानवाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम खिलार गाईचे दूध आणि तूप करते.यामुळे मानवी जीवनाला उपयोगी असणाऱ्या खिलार गाईंचे संगोपन होणे गरजेचे आहे. असे शेतकरी शशिकांत फुदे यांना वाटते.
खिलार जातीच्या गाईच्या गोमूत्रापासून शेतात राबविला सेंद्रिय शेतीचा कोकण पँटर्न
शेतकरी शशिकांत फुदे यांनी आपल्या शेतात सेंद्रिय शेतीचा कोकण पँटर्न राबवला आहे. त्यांच्या शेतात कोकणात असणारी फळझाडे आहेत. सोलापूरच्या उष्ण वातावरणात तग न धरू शकणाऱ्या फळबागा त्यांनी शेतात यशस्वी केल्या आहेत. त्यांच्या शेतात हापूस आंबा, केसर आंबा, फणस, काजू, सुपारी, नारळ, दालचणी, चिकू, करवंद, काळी मिरी,अंजीर आहेत. कोकणात घेतले जाणारे काजू पीक त्यांनी आपल्या शेतात यशस्वी केले आहे. कोकणात मिळणारे काजू ग्राहकांना सहज उपलब्ध झाले आहेत. त्यांची शेती सेंद्रिय असल्याने झाडांची फळे खाण्यास चविष्ट आहेत. जर्शी गाईंच्या दुधापेक्षा खिलार गाईंच्या दुधाला भाव जास्त आहे. जर्शी गाईच्या दुधाला 20 ते 22 रुपये भाव आहे. पण खिलार गाईच्या दुधाला 80 रुपये भाव मिळत आहे. जर्शी गाई एका वेळेस 12 लिटर दुध देते.तेच दूध खिलार गाई एक दिवसाआड देते.पौष्टिक दूध मिळवण्यासाठी गाईना सेंद्रिय खतांचा वापर केलेल्या चाऱ्याचा उपयोग करावा असे शशिकांत फुदे यांनी शेवटी सांगितले.
एक बैल विकला जातो 5 लाख रुपयाच्या आसपास
शशिकांत फुदे यांच्या गोठ्यात बैल,गाईची संख्या जास्त असून एका बैलाची किंमत 5 लाख रुपयांच्या आसपास आहे. तर लहान वासरांची किंमत 2 ते अडीज लाखाच्या आसपास असल्याची माहिती फुदे यांनी दिली. या सांभाळलेल्या बैलांचा वापर बैलगाडी शर्यतीसाठी असून फुदे यांनी एक बैल जोडी पुणे जिल्ह्यात विकली आहेत. बैलगाडी शर्यतीवर असणारी बंदी उठल्याने फुदे यांच्या खिलार बैलांना बाजारात मागणी वाढली आहे. बैल,गाई पाहण्यासाठी ग्राहक त्यांच्या वस्तीला भेट देऊ लागले आहे. शशिकांत फुदे यांनी अनेक प्रदर्शनात खिलार बैल,गाई यांना सादर केले आहे. जनावरामुळे त्यांना अनेक बक्षिसे मिळाली आहे. त्यांना शेतीच्या संदर्भाने उद्यानपंडित हा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांच्या या खिलार संगोपनाची प्रसार माध्यमानी दखल घेतली असून त्यांच्या या अनोख्या छंदाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांची सेंद्रिय शेती व खिलार गाई पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेट देऊ लागले आहेत.
मागील काही दिवसात शहरात गो-उत्पादनाच्या बाजारात उत्पादने महागली आहेत. कच्चा मालाची कमतरता झाली आहे. गाईच्या शेणाची मागणी ही सेंद्रीय शेतीसाठी वाढत चालली आहे. शेतकऱ्यांची धाव सेंद्रीय शेतीकडे आहे. त्या तुलनेत गोशाळा अत्यंत कमी संख्येने आहेत. त्यामुळे गाईचे शेण मिळण्याची अडचण झाली आहे. फळबागासह आता इतर प्रकारची सेंद्रीय पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. घरगुती बागामध्येदेखील खत निर्मितीसाठी मागणी केली जात आहे.