शेतकऱ्याने शेतातच उभारले हवामानकेंद्र !

गेल्या काही वर्षात राज्यात अवकाळी पाऊस, वादळ यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामानातील बदलांचा अंदाज अजून शेतकऱ्यांना येत नाहीये. पण आता या अडचणीवर एका शेतकऱ्याने उपाय शोधून काढला आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतातच हवामान केंद्र उभे केले आहे. पाहा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा स्पेशल रिपोर्ट;

Update: 2021-10-15 10:20 GMT

सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला जत हा दुष्काळी तालुका आहे. दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत या भागातील शेतकरी आपली शेती करत असतात. आपल्या कष्टातून येथील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्षाची शेतीदेखील फुलवली आहे. परंतु ज्यावेळी पिकाचे उत्पादन बाजारात जाण्याची वेळ येते तेंव्हा मात्र हवामानाच्या लहरीपणामुळे हातातोंडाला आलेले पीक नष्ट होते. हवामानाच्या प्रतिकुलतेमुळे उत्पादन घटते. सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पडणारा पाऊस, वादळी वारे निसर्गाच्या या लहरीपणाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसत असतो. या समस्येने येथील शेतकरी नेहमीच त्रासलेले असतात. सततच्या नुकसानीमुळे अनेक तरुण शेती सोडून शहरात स्थलांतरित देखील होत असतात.

पण या प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे जत येथील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने. आपल्या संगणक क्षेत्रातील पदवीचा उपयोग करत त्यांनी चक्क आपल्या शेतातच स्वतःचे अत्याधुनिक हवामान केंद्र उभारले आहे. याचा त्यांना फायदा तर होतच आहे शिवाय परिसरातील शेतकऱ्यानादेखील याचा उपयोग होत आहे.



 


सचिन संख हे संगणक अभियंता पदवी घेतलेले शेतकरी आहेत. ते या परिस्थितीला कंटाळले होते. या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर हवामान अंदाजानुसार शेती करण्याची गरज होती. हवामानाचा अचूक अंदाज आला तर उत्पादनात होणारी घट कमी करता येईल. पिके वाचवता येतील. पण यासाठी हवामानाचा अंदाज वेळेत आणि अचूक कळायला हवा. याच गरजेतून सचिन संख यांनी आपल्या शेतात हवामान केंद्र उभा करण्याचा संकल्प केला. असे हवामान केंद्र निर्माण झाल्यास हवामानाचा अंदाज घेत होणारे नुकसान टाळता येईल असा त्यांना विश्वास होता. या प्रयोगाचा फायदा परिसरातील इतर शेतकऱ्यांना देखील होईल या उद्देशातून त्यांनी या दृष्टीने कामाला सुरुवात केली.

जत शहरालगत सचिन संखं यांची ४५ एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते द्राक्षे तसेच डाळिंबाचे उत्पादन घेतात. निर्यातक्षम उत्पादन निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांना हवामानाचा अचूक अंदाज घेण्याची आवश्यकता भासली. त्यासाठी ते अनेक प्रयत्न करत होते. त्यांनी बंगळुरू येथील हवामान विभागाशी सलग्न असलेल्या कंपनीला संपर्क करून स्वतःसाठी अत्याधुनिक हवामानकेंद्र आपल्या शेतातच उभे केले. या हवामान केंद्राच्या उभारणीनंतर सचिन संख यांना मोबाईलच्या माध्यमातून कोणत्या वेळी पाऊस, वारा आद्रता असेल याची माहिती मिळते. याशिवाय पिकांना पाण्याची आवश्यकता किती आहे? तसेच रात्री पिकांवर किती दव पडले याचीही इत्यंभूत माहिती मिळते. यावर संख यांना त्यांच्या पिकाचे नियोजन करता येते. या अंदाजानुसार खत तसेच पाणी देता येते. फळपिकांची काळजी घेता येते. यानुसार नियोजन केल्यामुळे कीडनियंत्रण करण्यासाठी याचा फायदा होतो. या त्यांच्या प्रयोगामुळे त्यांना चांगला फायदा होत आहे.



 


सततची पाणीटंचाई, गारपीट, अवकाळी पाऊस मध्येच येणारा वादळीवारा या समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता या हवामान केंद्रामुळे दिलासा मिळाला आहे. हवामानाच्या अंदाजासाठी त्यांना आता इतर कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. आणि मिळालेला अंदाज यातील अचूकता देखील वाढलेली असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

याबाबत सचिन संख म्हणाले, संगणक अभियंता पदवी घेतल्यानंतर आपण शेतीकडे वळलो. खरंतर घरची शेती असली तरी आपणाला शेती मधील काहीच माहिती नव्हती. वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी म्हणून आपण शेतीकडे वळलो. शेती करताना गेल्या 19 वर्षात अनेक गोष्टी समोर येत गेल्या. ज्यामध्ये पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपण आपल्या शेतीमध्ये बदल करत गेलो. अगदी शेतात पाणी आणि खत देण्यासाठी ठिबक सिंचन या गोष्टी केल्या. यात प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपली शेती हवामानावर अवलंबून आहे. बदलते हवामान हे आपल्या शेतीला आणि उत्पादनाला घातक ठरू लागलेले आहेत. आज शासनाकडून किंवा अन्य कंपन्यांकडून हवामानाचा अंदाज जरी प्राप्त होत असला तरी त्याची इत्यंभूत आणि अचूक माहिती मिळणे अवघड आहे.

या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याकडे असणाऱ्या संगणक ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग झाला. असे ते सांगतात. हवामानाची अचूक माहिती कशी मिळवता येईल. यादृष्टीने विचार करत असताना आपले स्वतःचे हवामान केंद्र उभारता येणे शक्य असल्याचे लक्षात आले. त्यांनतर बंगळुरू येथील हवामान केंद्र विकसित करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून आपल्याला लागणारे एक अत्याधुनिक, विकसित हवामान केंद्र आपल्या शेतामध्ये उभारले आहे, असे त्यांनी सांगितले.

सचिन संखं यांच्या शेतात स्वतःच्याच मालकीचे हवामान केंद्र उभे राहिले आहे. स्वतःच्या शिक्षणाचा वापर करत आपल्या शेतीला आधुनिक जोड देण्याची किमया त्यांनी केलेली आहे. त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक केले जात आहे.



 

याबाबत सांगलीचे कृषी अधीक्षक मनोज वेताळ म्हणाले, तंतोतंत शेती ही आज काळाची गरज बनली आहे. त्यातून आज शेतकरी हवामान केंद्र उभारत आहेत. ही खूप चांगली बाब आहे. कारण हवामानावर आधारित आपली शेती आहे. हवामान केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट त्या शेतकऱ्याला अचूक कळू शकते. यातून पाण्याचा, औषधांचा किंवा अन्य गोष्टींचे नियोजन त्या शेतकऱ्याला त्या-त्या वेळी करणे शक्य होणार आहे. सचिन संख यांनीही ही गरज ओळखून आपल्या शेतात हवामानाचे केंद्र उभारले आहे. इतर शेतकर्‍यांनीही अशाच पद्धतीने आपल्या शेतामध्ये हवामान केंद्र उभारली तर त्यांना आपल्या शेतीमालाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याबरोबर नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिकचा फायदा होणार आहे, असे मत वेताळ यांनी व्यक्त केले आहे.

सचिन संख हे जत सारख्या दुष्काळी तालुक्यात निर्यातक्षम डाळिंब तसेच द्राक्षाचे उत्पादन घेत आहेत. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीवर त्यांनी शिक्षण अनुभव आणि विज्ञान या गोष्टींचा मेळ साधत मात केली आहे. त्यांचा हा प्रयोग त्यांच्यासोबतच परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहे. सरकारने अशा प्रयोगांसाठी राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यातून शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न तर वाढवता येईलच पण हवामानामुळे उत्पन्नाची होणारी घट देखील रोखता येईल.

Tags:    

Similar News