कॅमेरा निष्ठूर आहे...

Update: 2019-08-10 05:35 GMT

बोटीत रिपोर्टर आणि कॅमेरामन नसता तर दोन लोकांना जास्तीचं वाचवता आलं असतं, किंवा अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेस जवळ आठ फूट पाणी जमल्याची खोटी बातमी मिडीयाने दिली ज्यामुळे आमच्या घरचे लोक घाबरले, प्रत्यक्षात तिथे पाणी कमी होतं. त्यात डब्यात साप घुसल्याची बातमी आली आणि आमच्या घरचे लोक काळजीत पडले, प्रत्यक्षात जाऊन पाहिलं तर एक भेदरलेलं सापाचं पिल्लू होतं जे पाण्याच्या प्रवाहासोबत बाहेर निघून गेलं.

१ तारखेपासून बिघडत चाललेली पूरस्थिती हाताळायला सरकार ७ तारखेला जागं झालं की किंवा रेल्वेत दीड हजार प्रवासी मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर सोळा तास अडकून पडल्यानंतर त्या-त्या घटनेमधले पिडीत लिहू शकत असतील यावर तुमचा विश्वास बसतो का. बसत असेल तर तुम्ही अंधभक्त आहात. अंधभक्तीची ही एक छोटीशी लिटमस टेस्ट होती.

सोशल मिडीयावर सध्या पूरपरिस्थितीचं भान राखून माध्यमांनी जबाबदार कव्हरेज केलं पाहिजे अशा आशयाच्या काही पोस्ट भाजपाच्या आयटी सेलने जारी केल्या आहेत. एक संतप्त सांगलीकर, त्रस्त कोल्हापूरकर, एक भारतीय, एक सच्चा भारतीय, एक मुंबईकर अशा विविध अस्मिता लेऊन हे आयटी सेलवाले अशा पोस्ट लिहीत आहेत. इतक्या सगळ्या आपत्तीमध्ये माध्यमांचा जीव तो काय. चॅनेल्सचे मालक ज्यांच्या सोबत चहापानाला बसतात त्यांच्या विरोधात एखादा रिपोर्टर काय बातमी लावणार. इथे प्रश्न जनभावनेचा आहे. जर माध्यमांचा अजेंडा तुम्ही विकत घेऊ शकता, पण जनभावना कशी विकत घेणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

राग खासकरून टीव्ही माध्यमांवर आहे. टीव्हीचे रिपोर्टर्स ग्राऊंड झीरो वर असतात. त्यांच्या कॅमेरात दिसतं तुम्हाला पूरातल्या लोकांना बाहेर काढायला बोटी पोहोचवता आलेल्या नाहीत, त्यांच्या कॅमेरात लोकांची दुःख दिसतात, तुमचा मंत्री हसताना दिसतो तसं पुरात चालतानाही दिसतो. तुम्ही प्रचाराच्या यात्रांमध्ये होता, पक्षप्रवेशांमध्ये बिझी होता हे ही त्या कॅमेराला दिसतं. त्याने तुमची भाटगिरी जरी करायची ठरवली तरी सर्व कव्हरेजची संगत लावली तरी तुम्ही उघडे पडता. टीव्हीच्या कॅमेरांनी रामगोपाल वर्मा सोबत ताज ला भेट देणाऱ्या विलासराव देशमुखांनाही नाही सोडलं, बोलण्यात माहीर असलेल्या आर. आऱ. पाटलांनाही बोलल्यामुळे जावं लागलं. हा कॅमेरा निष्ठूर आहे.

तर आयटी सेल मधल्या लोकांनी सध्या पूरग्रस्तांच्या नावाने पोस्ट टाकायला सुरूवात केलीय की संवेदनशीलता बाळगा वगैरे वगैरे. खरंतर हा खोटं नॅरेटीव्ह बनवण्याचा प्रकार आहे. यापुढे पोस्ट लिहायचं काम सुरू आहे की कसं आघाडीचे नेते या पुराला जबाबदार आहेत, कशा पद्धतीने पूररेषेत बांधकामं झाली, कसं धरणांचे करार झाले वगैरे वगैरे. या पोस्ट आल्यानंतर विरोधी पक्षाला गुंडाळलं जाईल, चौकशीच्या धमक्या दिल्या जातील. लिहून ठेवा येत्या दोन दिवसांत हे होणार आहे. अशा पोस्ट आल्यानंतर पोस्ट पाठवणाऱ्याला काही प्रश्न विचारायचे.

1) ही पोस्ट तुम्ही लिहीलीय का, लिहिली असेल तर खाली नाव आणि नंबर टाकून फॉरवर्ड करा.

2) परिस्थिती 1-2 ऑगस्ट पासून बिघडली, हवामान खात्याने इशारा ही दिला होता. कारवाई 7-8 तारखेला का सुरू झाली

3) अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे कधी विनंती करण्यात आली.

चार नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असताना 370 साठी नाचणाऱ्या राजकीय नेत्यांना जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे नसतील, राजकीय प्रचार दौऱ्यामध्ये असणाऱ्यांना जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे नसतील तर प्रश्न विचारायचे कुणाला.

पूरग्रस्त भागात अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडलेल्या लोकांना तात्काळ मदत तुम्ही बँकेच्या खात्यात देण्याचा अट्टाहास चालवला, उद्या त्यांच्याकडे आधारकार्ड-राशनकार्ड मागाल.

नियोजनाचा अभाव आहे, तो दूर करण्यासाठी लोकांच्या सूचना, स्थानिक प्रशासन-लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करणे असे अनेक उपाय आहेत. हम करे सो कायदा असं सरकार बोलू शकते. कश्मिरात कर्फ्यू असताना बिर्याणीचा ठेला लावणाऱ्या एकमेव मुस्लीमाकडची बिर्याणी तुम्ही रस्त्यावर बसून खाऊ शकता. तुम्हाला कोण प्रश्न विचारणार.

मुद्दा असा आहे, की बुडणारा माणूस त्रस्त सांगलीकर, संतापलेला कोल्हापूरकर अशा नावाने पोस्ट लिहित नाही. महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली तिथपर्यंत पोहोचायला १६ तास लागले ही शोकांतिका आहे. या शोकांतिकांवर लिहा. संतापलेले त्रस्त पूरग्रस्त तुम्हाला दुवा देतील.

Similar News