कारखान्याच्या मनमानीमुळं लांबोटी ग्रामस्थांच्या जीव धोक्यात?
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या लोकमंगल डिस्टीलरी प्लांट कारखान्याने केमिकल मिश्रित पाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने या कारखान्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लांबोटी गावाला या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याचा फटका बसला असून त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून गावच्या पिण्याचा पाणी पुरवठा बंद असल्याने जगायची कसे असा प्रश्न लांबोटी ग्रामस्थांपुढे उभा राहिला आहे.. प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा लांबोटी वासियांच्या वेदना सांगणारा ग्राउंड रिपोर्ट..;
वाढत्या औद्योगिकीकरणाचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला असून या औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणारे विविध घटक मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू लागल्याने सर्वसामान्य जनतेतून चिंता व्यक्त केली जात आहे. विकासाच्या नावाखाली मोठ-मोठ्या एमआयडीसी उभ्या राहिल्या खर्या,पण त्यांचे नीटनेटके नियोजन नसल्याचा प्रकार समोर येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या औद्योगिक वसाहती या मानवी आरोग्याला घातक ठरू लागल्या आहेत. असा आरोप या आद्योगिक वसाहतींच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावातील नागरिकांकडून करण्यात येवू लागला आहे.
अनेक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून केमिकल मिश्रित पाणी नद्यात सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या वाढत्या औद्यगिकिकरण्याचा फटका पर्यावरणाला बसला असून अनेक नद्यांचे पाणी दूषित झाले असल्याचा आरोप ही नागरिकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ज्या औद्योगिक वसाहती आहेत,त्यांच्या रस्ते,पाणी, गटार,लाईट यांची सोय करत असताना औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याचा प्रकार अनेक औद्योगिक वसाहतीत उघडकीस आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या लोकमंगल डिस्टलरी प्लांटचा असाच प्रकार उघडकीस आला असून या कारखान्याने त्यांच्या केमिकल मिश्रित पाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने या कारखान्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लांबोटी गावाला या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याचा फटका बसला असून त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून गावच्या पिण्याचा पाणी पुरवठा बंद असल्याचे ग्रामस्थ सांगतात. लोकमंगल कारखान्याला वारंवार निवेदन देवून त्याची दखल घेतली जात नाही. प्रदूषण नियंत्रक मंडळ ही दखल घेत नाही. या कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी थेट लांबोटी गावच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याला येते. या ओढ्याच्या कडेला गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर असून या विहिरीचे पाणी देखील दूषित झाले असल्याचे लांबोटी गावचे ग्रामस्थ सांगतात.
या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शासन,प्रशासन कारखान्याच्या दूषित पाण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने लांबोटी गावच्या ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सीना नदीत जलसमाधी आंदोलन केले. पोलिसांनी मध्यस्थी करत हे आंदोलन स्थगित केले. येणाऱ्या काळात दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी नाही लागल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा लांबोटी गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे .
लांबोटीच्या ग्रामस्थांचे सीना नदीत जलसमाधी आंदोलन
शासन,प्रशासनाला वारंवार निवेदने देवून ही लांबोटी ग्रामस्थांच्या मागणीकडे शासन,प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. त्यामुळेच या गावचे माजी सरपंच पप्पू कदम आणि विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली जलसमधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बराच काळ चालल्यानंतर अखेर नागरिकांचा संयम तुटल्याने एका ग्रामस्थांनी सीना नदीच्या वाहत्या पाण्यात उडी घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे काळी काळ तणावाचे वातावरण निर्माण होवून गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी लागलीच घटना स्थळी धाव घेवून आंदोलकांची मागणी लक्षात घेवून त्यांना नदीच्या पाण्यातून बाहेर येण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी संबधित लोकमंगल डिस्लेरी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावून कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच हा प्रश्न लांबोटीच्या ग्रामस्थांशी चर्चा करून सोडवावा,असा सल्ला कंपनीच्या व्यवस्थापनाला दिला. व्यवस्थापनाशी बोलणे झाल्यानंतर लांबोटीच्या ग्रामस्थांनी आंदोलन माघे घेतले. येणाऱ्या काळात कंपनीतील दूषित पाणी बंद नाही झाल्यास आणखीन तीव्र आंदोलने करण्याचा इशारा आंदोलन स्थगित करीत असताना ग्रामस्थांनी दिला.
प्रदूषण नियंत्रण मंडळ नॉट रीचेबाल
दूषित पाण्याच्या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,त्यांचा फोन नॉट रीचेबल येत होता. जिल्ह्यात प्रदूषणाच्या संदर्भाने अनेक प्रश्न निर्माण झाले असताना प्रदूषण नियंत्रक मंडळ करते तरी काय असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी वारंवार तक्रारी करूनही दखल घेत नाहीत. त्यांना दूषित पाण्याबाबत फोन केला असता ते सातत्याने नॉट रिचेबल असतात,असे ग्रामस्थ सांगतात.
पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी मध्यस्थी करत आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडले
मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सीना नदीत लांबोटी येथे सुरू असलेल्या आंदोलकांशी चर्चा करून त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांचे म्हणणे व्यवस्थित एकूण घेवून संबधित प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि लोकमंगल डिस्टीलरीच्या कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करून या दूषित पाण्यावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला. यावेळी नागरिकांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवून तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करीत असल्याचे सांगितले.
लांबोटीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे
गेल्या कित्येक वर्षापासून लोकमंगल डिस्टीलरी हे लांबोटीच्या पंचकृषीत दररोज 10 ते 15 टँकरने स्पेंटवॉश दूषित पाणी आणून ओढ्या नाल्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व नदीमध्ये आणून टाकत आहेत. कित्येक वेळा सोलापूर जिल्ह्यामध्ये वर्तमान पत्रामधून या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तरी देखील सोलापूर जिल्ह्याचे प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येवून फक्त व्हिजीट दिली. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. सध्या एक महिना झाले लांबोटी गावचा पाणीपुरवठा बंद असून त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या गावा जवळून सीना नदी वाहत असून प्रदूषण विभागाने नदीचे पाणी दूषित असल्याचे सांगितल्याने दुसऱ्या गावामध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हे दूषित पाणी पिल्याने गावातील पाळीव जनावरे दगावली आहेत. लोकमंगल कारखान्याच्या दूषित असलेल्या पाण्याबाबत मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यानी वारंवार तक्रारी देवून देखील त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. जोपर्यंत लोकमंगल डिस्लेरी कारखान्यातील दूषित पाणी बंद होत नाही,तोपर्यंत लांबोटी गावाला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. निवेदनात डिस्लेरी कारखान्यावर बंदी घालण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
लांबोटी ग्रामपंचायतीने दूषित पाण्यामुळे गावचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा केला ठराव
गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर ओढ्याच्या जवळ असून लोकमंगल डिस्लरी कंपनीने दूषित पाणी ओढ्यात सोडले आहे. त्यामुळे विहिरीत हे दूषित पाणी जावून विहरीचे पाणी दूषित झाल्याने लांबोटी ग्रामपंचायतीने मीटिंग घेवून गावचा पाणी पुरवठा तात्पुरता बंद ठेवला आहे. तशा प्रकारचा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे.
पाण्यातून फैलावतात 80 टक्के आजार
पाणी हे जीवन समजले जाते. पाणी जर चांगल्या प्रकारचे असेल तर आरोग्य उत्तम राहते,असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पाण्या मार्फतच 80 टक्के आजार फैलावत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नेहमी पाणी स्वच्छ प्यावे,असे सांगण्यात येते. पाणी प्रदूषित असेल तर कावीळ,उलट्या जुलाब, गॅस्ट्रो सारखे आजार फैलावतात. या प्रदूषित पाण्यामुळे जनावरांना सुद्धा धोका निर्माण होत असल्याचे पर्यावरण वादी नागरिक सांगतात. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी पाण्याचा वानवा असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी मिळेल त्या पाण्यावर नागरिक दिवस काढत आहेत. महाराष्ट्रात अनेक गावापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचलेले नाही. आदिवासी भागातील तर अवस्था अत्यंत दैनिय असून दूषित पाणी पिण्याचे प्रमाण आदिवासी भागात जास्त प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच आदिवासी बांधव अनेक रोगांना बळी पडत असल्याचे सांगण्यात येते. जिथे पोट भरण्याची भ्रांत तेथे शुद्ध पाणी कोठून मिळणार असा सवाल विचारण्यात येत आहे.
दूषित पाण्याचा विषय एक महिन्यापूर्वीचा असल्याची माहिती डीस्टीलरी प्लांटच्या अधिकाऱ्यांकडून
दूषित पाण्याचा विषय एक महिण्यापूर्विचा असून काल लांबोटीच्या ग्रामपंचायत सदस्यांना भेटलो असून पाण्याची टाकी स्वच्छ करून घेतो,असे त्यांनी सांगितले,असल्याची माहिती डिस्लरी प्लांटचे अधिकारी विशाल देशमुख यांनी दिली. हे पाणी डीस्टीलरी प्लांटचेच येते का या प्रश्नावर उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ करून फोन ठेवून दिला. लगेच माघारी फोन केला असता मीटिंग मध्ये असल्याचे कारण देत थोड्या वेळाने फोन करतो,असे सांगितले.