निवृत्तीनंतरही रस्त्यावर का सेवा देतात नांदेडचे हे ट्रॅफिक पोलीस ?
निवृत्तीनंतरही रस्त्यावर का सेवा देतात नांदेडचे हे ट्रॅफिक पोलीस ? जाणून घेण्यासाठी वाचा कुलदीप नंदूरकर यांचा रिपोर्ट..;
सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर आपल्या कामातून मुक्त होतो. आयुष्यभराचा शीण झटकतो, बाहेर फिरायचा प्लॅन करतो, पण कामातून मुक्त झालो तरी कर्तव्यातून मुक्त झालो नाही अशी भावना बाळगत नांदेडचे निवृत्त ट्राफिक पोलीस शेख अब्दुल शेख अमीर हे दररोज निशुल्क चार तास सेवा बजावत आहेत.
आपल्या संपूर्ण सेवेत आपल्याविरुद्ध एकदाही तक्रार झाली नसल्याचे ते अभिमानाने सांगतात. शेख अब्दुल शेख अमीर हे पोलीस दलात 25 वर्ष कार्यरत होते. अनेक वर्ष त्यांनी नांदेड च्या वाहतूक विभागात आपली सेवा बजावली. 2020 साली ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर शेख हे घरी न बसता दररोज शहरातील कोणत्यातरी चौकात जाऊन वाहतुक सुरळीत करण्यासाठी चार तास सेवा देतात.
नांदेड येथील सेवानिवृत्त वाहतूक पोलीस कर्मचारी शेख अब्दुल शेख अमीर हे पोलीस खात्यात कर्तव्यावर असताना कधी एक क्षणही खाली न बसणारा प्रामाणिक कर्मचारी म्हणून ते नांदेड शहरात प्रसिद्ध आहेत. पोलीस खात्यातून तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असले तरी शेख अब्दुल दररोज न चुकता दररोज चार तास नांदेड शहरातील रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे कुठलाही मोबदला न घेता ते सेवा बजावतात. जिथे वाहतुकीची अडचण असेल त्या ठिकाणी जाऊन ती सुरळीत करतात.
त्यांची सेवाभाववृत्ती पाहून त्यांना सेवानिवृत्ती नंतरही वाहतूक शाखेची वर्दी घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. माणूस काम करून कधीच मरत नाही तर काम न केल्याने माणूस मरतो, त्यामुळे प्रत्येकाने अंगात शक्ती आहे तोपर्यंत कर्तव्य पार पाडावे असा संदेश शेख अब्दुल यांनी दिला आहे.
शेख अमीर या कर्मचाऱ्यास दोन मुली, एक मुलगा आहे. सध्या ते शिक्षण घेत आहेत.शेख यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही, शेती नाही, ते भाड्याच्या घरात राहतात. पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावरही दररोज तीन ते चार तास निशुल्क सेवा देखील देत असतात.शेख अमीर यांचे सर्व स्तरातून कौतुक देखील होत आहे.