भाजपनं लोकसभा निवडणूकीत सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याजागी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. महास्वामी यांच्याबद्दल महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना माहिती विचारली असता, त्यांनी त्यांची माहिती सांगण्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषदच घेण्याचं सांगून मूळप्रश्नाला बगल दिली. त्यामुळं ऐनवेळी उमेदवारी दिलेल्या उमेदवारांची माहितीच भाजपच्या नेत्यांना फारशी नाही. त्यामुळं पत्रकारांनी या नवख्या उमेदवारांविषयी माहिती विचारल्यावर भाजप नेत्यांची भंबेरी उडत असल्याचं आज समोर आलंय.
डॉ. महास्वामी यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव इथल्या मठाचे ते प्रमुख आहेत. विद्यमान खासदार बनसोडे यांच्याऐवजी डॉ. महास्वामी यांना उमेदवारी दिली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारले. डॉ. महास्वामी यांच्याबद्दल माहिती सांगा अशी वारंवार विचारणा केली, त्यावर डॉ. महास्वामी यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊ, असं उत्तर देत मूळप्रश्नालाच बगल दिली. मी जाहीरनामा आणि प्रचाराच्या नियोजनात आहे, त्यामुळं आमचा प्रचार हा त्यांच्यासाठीही (डॉ. महास्वामी) असेल असंही त्यांनी सांगितलं. उमेदवार हा पार्लमेंटरी कमिटीकडून ठरवला जात असल्याचं पंकजा यांनी सांगितलं.