महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था झोळीत, रस्ता नसल्यानं रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ

Update: 2021-08-21 10:49 GMT

 प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला देशभरातून लोक भेट देतात. तिथल्या निसर्गसौदर्यांचा आनंद घेतात. मात्र, या निसर्गाच्या डोंगरदऱ्यांच्या कपाऱ्यात राहणाऱ्या आदिवासी वाड्यांच्या समस्या कधी कोणी जाणून घेतल्या आहेत का? या आदिवासी वाड्यांपर्यंत आजही विकासाची गंगा पोहोचलीच नाही.

माथेरान लुजा पॉईंटच्या पायथ्याशी असणारी आदिवासी वाडी म्हणजे हाशाची पट्टी. या आदिवासी वाडीत आम्ही प्रत्यक्ष जाऊन येथील लोकांचे जनजीवन काय आहे? हे जाणण्याचा प्रयत्न मॅक्समहाराष्ट्राच्या टीमने केला. तेथे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. डोंगराच्या किनाऱ्याने पाऊल वाटेने या वाडीत मॅक्समहाराष्ट्राची टीम पोहोचली.


हाशाची पट्टी ही आदिवासीवाडी एकूण 9 एकरामध्ये वसलेले असून या ठिकाणी ठाकर समाजाची आदिवासी लोकांची 65 घरे आहेत. या वाडीतील लोकसंख्या सरासरी 360 एवढी एवढी आहे. येथे जिल्हा परिषदेची अंगणवाडी ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. पिण्याच्या पाण्याची योग्य सोय या वाडीत नाही.

गावातील आर्यन सुरेश कानेकर सांगतो. मी गावातल्या शाळेत शिकलो. पण आता पुढंच शिक्षण घेण्यासाठी या डोंगरकपाऱ्यातून मला जाऊन इयत्ता 6 वीचं शिक्षण घ्यावं लागणार आहे.

आजही झऱ्याचं आणि गावातील एका विहिरीवरचं पाणी हे आदिवासी लोक पितात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावात पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. अशा रस्त्यावरून कोणी आजारी पडलं तर कसं जात असतील? याची कल्पनाही आपण करु शकत नाही. ज्या ठिकाणाहून आपण पायी निट जाऊ शकत नाही. अशा ठिकाणाहून तुम्ही आजारी असाल तर कसं पुढं जाणार? असा सवाल मनात आल्याशिवाय राहत नाही.

रस्ता नसल्याने आजारी व्यक्ती व चौथीनंतर शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना याच पायवाटेने चालत प्रवास करावा लागतो. जास्त आजारी असलेला व्यक्ती चालू शकत नाही म्हणून त्यांना आजही झोळीतून हॉस्पिटल पर्यंत घेऊन जावे लागते.

इथल्या मुलांनी शिकवण्याचं काम करणारे सुनिल कदम सांगतात... 1982 ते 1984 अशी दोन वर्ष मी येथील मुलांना शिकवलं. मी लोकांच्या घरोघरी जाऊन लहान मुलांना शाळेत आणून त्यांना अंघोळ वगैरे घालून शाळेत बसून शिक्षणाबरोबर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तो काळ माथेरान वरून येण्या-जाण्यासाठी कठीण असला तरी माथेरान वरून दररोज येऊन जाऊन या मुलांसाठी शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणच्या मुलांना शिकवण्याचं काम केलं. इथं रस्ता नसल्यानं मुलांच्या शिक्षणाचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे तसाच आहे. असं सुनिल कदम गुरुजी सांगतात...

गावातील लोक आरोग्यांच्या समस्याबाबत हतबल आहेत... कित्येक वेळा असे होते की आजारी व्यक्ती रस्त्यातच मृत्यू पावतो. असं इथले गावकरी सांगतात. औषध उपचार वेळेवर न मिळाल्याने व येण्या जाण्यासाठी रस्ता योग्य नसल्याने कित्येक गरोदर महिलांची डिलेवरी रस्त्यात म्हणजे डोंगरात कडेकपाऱ्यात होते. असं गावकरी सांगतात...



हशाची पट्टी या आदिवासी वाडीमध्ये गेली सत्तावीस वर्ष वास्तव करणाऱ्या गावकरी महिला वैशाली पारधी यांच्याशी आम्ही येथील महिलांच्या समस्याविषयी व आजारी व्यक्तींच्या समस्यांविषयी जाणून घेतले असता वैशाली पारधी म्हणाल्या...

औषधं उपचारासाठी माथेरानला डोंगर दरीतून जाईपर्यंत गरोदर महिलांची डिलेवरी रस्त्यातच होते आणि आणीबाणीच्या प्रसंगात प्रवास व रस्ता कड्यालगत असल्याने आजारी व्यक्तीला झोळीतून उचलून घेऊन जावे लागते. 1 महिन्यापूर्वी औषधं उपचार वेळेवर न मिळाल्याने पार्वती पारधी यांचा मृत्यू झाला आणि असे खूप वेळा होते की, हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंतच आजारी व्यक्ती रस्त्यातच मृत्यू पावतो. तसेच आमच्या गावात चौथीपर्यंतच शाळा आहे. चौथी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी मुले व मुलींना माथेरान ला जावे लागते. आणि कड्या कपारीतून लहान मुलांना जाणे म्हणजे खूप खूप अवघड समस्या आहे. तरी आमची शासनाकडे मागणी आहे की, रस्ता व आरोग्य सुविधा प्रथमोपचार सुविधा आम्हाला मिळावी.. असं रुपाली सांगतात.

याच गावातील रवींद्र हिरु भस्मा यांनी गावातील पाणी समस्या आरोग्य समस्या व शिक्षण समस्या याविषयी शासनाकडे मागणी केलेली असल्याचे सांगतात. आमच्या गावात कोणी रुग्ण आजारी पडला तर माथेरानला उचलून नेण्याची खूप मोठी अडचण आहे. कोणी आजारी असेल तर 3 ते 4 तास रुग्णांना न्यायला लागते. त्यामुळं अनेकदा रुग्ण दगावण्याची भीती असते. गावात शाळा 4 थी पर्यंत आहे. पावसाळ्यात पत्रे उडतात. त्या काळात मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. आमच्या गावची लोकसंख्या 365 आहे. आम्ही गावकरी झऱ्याचं पाणी पितो.


गावचे तरुण सरपंच जयेश सुतार सांगतात... गावातील लोक आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधांपासून वंचित आहेत. गावात फक्त 4 थी पर्यंत शाळा आहे. त्यानंतर 3 ते 4 किलोमीटर पायी जाऊन शिक्षण घ्यावं लागते. कोणी आजारी पडलं तर रस्ता नसल्याने रुग्णांना नेताना अडचण निर्माण होते. त्यामुळं गावात रस्ता कसा येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं सरपंच जयेश सुतार यांनी सांगितलं.

माथेरान प्राथमिक रुग्णालय येथे कार्यरत असणारे डॉक्टर रूपाली मिसाळ यांच्याशी हशाची पट्टी व माथेरान डोंगरदऱ्या कपारी मध्ये वास्तव्यात असणारे आदिवासी रुग्ण यांच्या आरोग्य तपासणीबाबत व सुविधा बाबत जाणून घेतले असता... त्या म्हणतात.

आदिवासी रुग्ण हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत त्यांना प्रवासाच्या संदर्भात अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागते. डोंगरदऱ्यात असणारी पायवाटेने पेशंटला झोळीतून घेऊन हॉस्पिटलमध्ये यावे लागते. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही योग्य ते उपचार रुग्णांना देत असतो आणि पेशंट सुद्धा औषध उपचारांच्या बाबतीत समाधानी असतात. परंतु प्रथमोपचार व आरोग्य विषयी योग्य माहिती देण्यासाठी आठवड्यातून एकदा आदिवासी वाड्यांमध्ये आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविका स्वतः त्यांच्या घरी जाऊन आरोग्य सुविधा विषयी त्यांना योग्य माहिती दिली तर पुढे घडणारे प्रसंग टाळता येतील. रस्ता नसणे हा मुद्दा शासनाचा असला तरी या आदिवासी वाड्यांमध्ये रस्ता होणे गरजेचं असल्याचं मत डॉक्टर व्यक्त करतात.

या संदर्भात आम्ही कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी वैयक्तीक संपर्क साधला. ते म्हणाले... रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीत अनेक ठिकाणच्या पायवाटा किंवा रस्ते वाहून गेले आहेत. शासनाचे निकष त्यानुसार निधी ला वेळ लागणार आहे. कोव्हिड काळात तसेच महापूर व दरडग्रस्त भागात प्रथम प्राधान्याने मोठ्या प्रमाणात निधी वापरला गेला आहे. हाशाची पट्टी या गावाची व रस्त्याची लवकरच पाहणी करून रस्त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार थोरवे यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत काळे, माथेरान


Similar News