...असा झाला होता सोलापुरात आंबेडकरांचा सत्कार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानपत्र देऊन सोलापूर नगरपालिका आणि अस्पृश्य बांधवांनी केलेल्या गौरवाच्या आठवणींचा धांडोळा घेणारा प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा स्पेशल रिपोर्ट..;
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर शहरात केलेल्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकवेळा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आले होते. त्यांनी अस्पृश्य समाजाला संबोधित केले होते. अस्पृश्य समाजातील लोकांना माणूस असून ही हीन दर्जाची वागणूक देण्यात येत होती. या समाजातील लोकांच्या शरीरात जीव असून ही त्यांची शरीरे मुर्दाड झाली होती. या मुर्दाड शरीरात नवचेतना पेटवण्याचे काम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. त्यांच्या या अस्पृश्य उद्धाराच्या कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सोलापुरातील पहिले मानपत्र अस्पृश्य बांधवांच्या वतीने देण्याचे आले होते तर दुसरे मानपत्र सोलापूर नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले होते. तिसरे मानपत्र नगरपालिका आणि जिल्हा लोकल बोर्डाच्या वतीने संयुक्तरित्या देण्यात आले होते, अशी माहिती आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व पत्रकार किरण बनसोडे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सोलापुरात तीन वेळा मानपत्र
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापूरशी अतुट ऋणानुबंध होता. सोलापूर शहर आणि जिल्हयाला अनेकवेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श लाभला होता. सोलापूर शहरात तीन वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करण्यात आले होते. सोलापूर शहरात नगरपालिकेच्या वतीने 2 वेळा आणि अस्पृश्य जनतेतर्फे एकदा असे तीन वेळा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना थाटात मानपत्र अर्पण करण्यात आले होते.
अस्पृश्य जनतेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकराना पहिले मानपत्र 24 मे 1932 रोजी प्रदान
सोलापूर येथील आताचे मिलिंद नगर आणि पूर्वीचा थोरला राजवाडा येथे 24 मे 1932 रोजी तत्कालीन अस्पृश्य जनतेच्या वतीने प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनोभावे मानपत्र प्रदान करण्यात आले होते. बेंच मॅजिस्ट्रेट पापय्या बाबाजी बेलपवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला होता. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांनी स्वत:च्या पायावर सर्वांगीण उन्नती करावी " असा स्फूर्तीदायी मंत्र दिला होता.
दुसरे मानपत्र सोलापूर नगरपालिकेच्या वतीने 1 जानेवारी 1938 रोजी प्रदान
दुसरे मानपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोलापूर नगरपालिकेच्या वतीने भागवत चित्रमंदिर येथे 1 जानेवारी 1938 रोजी रावबहादुर डॉ. व्ही.व्ही. मुळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थिताना असा संदेश दिला की, " संसदीय लोकशाहीत अतिरिक्त श्रद्धाळू वृत्ती मारक आहे. पक्षाचे विचार आणि कृती या विषयी लोकांनी कठोर आणि चिकित्सा करून न्यायनिष्ठा केली पाहिजे " असा प्रेरक संदेश त्यांनी याप्रसंगी दिला होता.
तिसरे मानपत्र 14 जानेवारी 1946 रोजी जिल्हा लोकल बोर्ड आणि नगरपालिकेच्या वतीने संयुक्तरित्या प्रदान
हरिभाई देवकरण हायस्कूलच्या कै. रा.ब. मुळे स्मारक मंदिरात 14 जानेवारी 1946 रोजी जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्यात आले होते. तत्कालिकन नगराध्यक्ष रावबहादुर नागप्पा अण्णा अब्दुलपूरकर यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले होते. तसेच जिल्हा लोकल बोर्डाचे मानपत्र तत्कालिन बोर्डाध्यक्ष जी. डी. साठे यांनी प्रदान केले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री होते. " सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ सोलापुरात मी रोवली. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी अभिमानाने सांगितले होते. मजूरमंत्री या नात्याने मजुरांच्या हिताकडे अधिक लक्ष देत आहे. मजूरांच्या हिताचे दहा कायदे करीत आहोत. ज्यामुळे देशाचे सामाजिक व आर्थिक दारिद्रय दूर करण्याचा प्रयत्न आहे," असे त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते.