स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही डोंबारी समाज उपेक्षितच

एकीकडे देशात स्वातंत्र्याचा सुवर्णहोत्सव साजरा केला जात असताना आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या देशात काही जाती जमाती विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांच्यापर्यंत आजही रस्ते,पाणी, गटार,वीज या प्राथमिक सोयी सुविधा पोहचल्या नाहीत. अशीच परस्थिती मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील डोंबारी समाजाची आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट..;

Update: 2022-07-02 14:53 GMT

 एकीकडे देशात स्वातंत्र्याचा सुवर्णहोत्सव साजरा केला जात असताना आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या देशात काही जाती जमाती विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांच्यापर्यंत आजही रस्ते,पाणी, गटार,वीज या प्राथमिक सोयी सुविधा पोहचल्या नाहीत. अशीच परस्थिती मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील डोंबारी समाजाची आहे. त्यांना मागणी करूनही या सुविधा मिळेना गेल्या आहेत. त्यामुळे डोंबारी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. डोंबारी समाज हा दोरीवर चालने, उड्या मारणे तसेच आपल्या बोली भाषेतून गेल्या कित्येक वर्षापासून लोकांचे मनोरंजन करत आलेला आहे. या डोंबारी खेळाच्या जीवावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. पण अलीकडच्या काळात मनोरंजनाची साधने बदलल्याने या डोंबारी समाजाच्या जीवनावर परिणाम झाला आहे.

डोंबारी समाज हा गावोगावी फिरून भटके जीवन जगणारा समाज आहे. पण सध्या एके ठिकाणी स्थिरस्थावर होताना दिसत आहे. त्यांच्यातील सध्याची पिढी शिक्षणाकडे ओढली गेली आहे. पण डोंबारी समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना मुलांना शिक्षण देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा समाज भटके जीवन जगत असल्याने त्यांची कोणत्याच गावात स्थावर मालमत्ता नाही किंवा कोठेच शेतजमीन नाही. पारंपारिक डोंबारी खेळ बंद पडल्याने डोंबारी समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यांच्याकडे जीवन जगण्यासाठी कोणतीही साधने नाहीत. त्यामुळे हाताला मिळेल ते काम डोंबारी समाजाच्या महिला आणि पुरुष करत आहेत.




 


कोळेगाव येथे डोंबारी समाजाची 500 कुटुंबे राहण्यास असून त्यांच्या या वस्तीत वीज,पाणी,गटार,रस्ता यांचा अभाव आहे. त्यांच्याकडे पक्की घरे नाहीत. ते या आधुनिक भारतात आजही पालाच्या झोपडीत राहत आहेत. पावसाळ्यात या पालाच्या झोपडीची दैनिक अवस्था होते. झोपडीत पाणी येत असल्याने त्यांना रात्र बसूनच काढावी लागते. त्यामुळे डोंबारी समाजाकडून शासन,प्रशासनाकडे रस्ते,पाणी,वीज,गटार आणि घरे देण्याची मागणी करण्यात येवू लागली आहे. आम्ही या देशाचे नागरिक असूनही आम्हाला प्राथमिक सोयी सुविधा देण्यात येत नाहीत. त्या देण्यासाठी प्रशासनाने लवकर पावले उचलावीत,अशी अपेक्षा डोंबारी समाजाच्या लोकांनी बोलताना व्यक्त केली.

डोंबारी समाज राहतो पालाच्या झोपडीत

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आदिवासी,पारधी, मरीआईवाले आणि इतर भटक्या जमातीच्या लोकांची म्हणावी तशी प्रगती झाली नसल्याचे दिसते. आजही डोंबारी समाज आणि मरीआईवाले समाजाचे लोक पालाच्याच झोपडीत राहत आहेत. या झोपड्या विविध रंगाच्या गोधड्यानी आच्छादलेल्या असतात. पावसाळ्यात या पालात रहाणाऱ्या डोंबारी समाजाची मोठी तारांबळ उडते. या वस्तीत जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने चिखलातून मार्ग काढत जावे लागते. त्यांच्याकडे सौचालय नाही. तसेच अंघोळ करण्यासाठी चांगल्या बाथरूमची सोय नाही. साडी आणि कपडे गुंडाळून स्नानग्रह बनवली आहेत. त्यातच अंघोळी केल्या जात आहेत. तर पुरुष वर्ग उघड्यावरच अंघोळी करतात. पिण्याचे आणि वापरायचे पाणी सिना नदीवरून आणावे लागते. कोळेगाव येथील डोंबारी समाज उघड्या माळरानावर राहत असल्याने नदीतून त्यांना पाणी चढ चढून वर आणावे लागते. पाण्यासाठी त्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे. शासन आणि प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी डोंबारी समाजाकडून होत आहे.




 


डोंबारी समाजाची होतेय पिळवणूक

डोंबारी समाजाचे उपजीविकेचे साधन बंद झाल्याने ते इतर कामाकडे वळले आहेत. महिला दुसऱ्याच्या शेतात खुरपणीच्या कामाला जातात तर काही महिला हाताला मिळेल ते काम करतात. पुरुष वर्ग ही मिळेल ते काम करत आहेत. पण या कामातून त्यांना म्हणावा तसा रोजगार दिला जात नाही. काहीजण त्यांच्या कामाचे पैसे ही देत नाहीत. त्यांच्याकडून फक्त काम करून घेतले जाते. पण त्याचा मोबदला काहीजण देत नसल्याची खंत त्यांनी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे आधीच हजारो वर्षे व्यवस्थेने शोषण झाले असताना या आधुनिक युगातही त्यांचे शोषण सुरू असल्याचे दिसते.

विद्यार्थी एकच ड्रेस धुवून घालतात

डोंबारी समाजाच्या विद्यार्थ्याने सांगितले,की सहावीच्या वर्गात शिकत असून अंगात घालायला एकच ड्रेस आहे. तोच दररोज धुवून घालत आहे. आश्रम शाळेकडून कपडे वगैरे दिली जात नाहीत. जर एखादा मुलगा अभ्यासात जास्तच हुशार असेल तर त्याला शाळेकडून वह्या,पेन दिल्या जातात. आमचे आई-वडील कामाला जातात,पण त्यांना काहीजण रोजगार देतात तर काहीजण देत नाहीत. त्यामुळे अडचणीला सामोरे जावे लागत आहे. डोंबारी समाजाची मुले सद्या शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे डोंबारी समाजाची मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डोंबारी समाजाच्या महिला खत कारखान्यात काम करताना झाल्या होत्या अत्यावश्यक

डोंबारी समाजाच्या महिला आणि पुरुष हाताला मिळेल ते काम करत आहेत. त्यांना अत्यंत कमी पगार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. डोंबारी समाज राहत असलेल्या कोळेगाव या गावापासून दहा किलोमिटर अंतरावर खत निर्मितीचा कारखाना होता. या कारखान्यात हाताला काम नसल्याने या समाजातील महिला कामाला होत्या. त्यावेळेस कंपनीच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याने या महिला खताच्या उग्र वासाने अत्यावश्यक झाल्या होत्या. त्यांना सोलापूर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसाच्या उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने एक लाख रुपयांची मदत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.




 


प्रशासनाने डोंबारी समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज

प्रशासनाने डोंबारी समाजाचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती सोशल मीडिया प्रभारी संजीव दादा खिलारे यांनी बोलताना केली. त्यांनी सांगितले की,गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून डोंबारी समाज कोळेगाव येथे राहत आहे. कोरोनाच्या समाप्तीनंतर हा डोंबारी समाज स्थिरस्थावर होताना दिसत आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्याने त्यांना रेशन कार्ड मिळत नाही. त्यामुळेच रेशन दुकानातून मिळणारे धान्य ही त्यांना मिळत नाही. प्रशासनाने डोंबारी समाजाच्या अडचणी समजून घेवून त्या सोडवाव्यात. त्यांना प्राथमिक सोयी सुविधा देण्यात याव्यात. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अनावे. या डोंबारी समाजातील मुलांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना जातीचे दाखले प्रशासनाने उपलब्ध करून द्यावेत.

कलेक्टर जगदीश पाटील यांनी डोंबारी समाजाला उपलब्ध करून दिली होती जागा

जगदीश पाटील ज्या वेळेस सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर होते. त्यावेळेस त्यांनी डोंबारी समाज,पारधी समाज यांच्या पुनर्वसनाचा प्रयोग केला होता. तो यशस्वी होऊन त्यांनी या समाजाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु त्यानंतर या डोंबारी समाजाच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष दिले नसल्याची भावना लोकांनी बोलताना व्यक्त केली.


Full View

Tags:    

Similar News