रुग्णालय हवं... देवालय हवं की मशीद हवी…ठरवणार कधी ?

Update: 2019-01-29 14:13 GMT

नवी दिल्ली - अयोध्येतील वादग्रस्त जागेशेजारील ६७ एकर जागा मूळ मालकाला परत देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज आज केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळं पुन्हा वादग्रस्त जागा आणि चर्चेला उधाण आलं आहे. अशा परिस्थितीत या वादग्रस्त जागेमुळं खरंच मंदिर हवंय की त्या जागेवर

सर्वसमावेशक असं विधायक काहीतरी उभं करावं याविषयी गंभीरपणे चर्चा करण्याची वेळ आल्याचा सूर नेटिझन्सच्या चर्चेतून उमटायला सुरूवात झाली आहे.

भारताला सुपर पॉवर बनवण्याचं वचन सर्वच सत्ताधारी पक्ष वेळोवेळी देतात. मात्र, त्यादृष्टीनं त्यांची पावलं पडतांना दिसत नाहीत. अजूनही आपल्या देशामध्ये आरोग्याच्या सुविधा, वैद्यकीय क्षेत्रातलं सशोधन प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत मागे आहे. आयुष्मान भारत सारख्या योजनांच्या जाहिरातींचा ढोल मोठ्या प्रमाणावर वाजवला गेला. भारतातल्या गरिबांना आरोग्य सुविधा मिळावा हा हेतू चांगला आहे. मात्र, आधुनिक आरोग्य सुविधा मिळत नसतील तर अशा योजनांचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होतो.

देशातील अनेक राजकीय नेत्यांनी भारतातील आरोग्य व्यवस्थेवर अविश्वास दाखवत परदेशात उपचार घ्यायला सुरूवात केली आहे. यात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, सुषमा स्वराज, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री सोनाली बेद्रे, अभिनेता इरफान खान, क्रिकेटपटू युवराज सिंग यांनीही परदेशात उपचार घेतलेले आहेत. कॅन्सरसारख्या आजारांवर आपल्या देशात चांगले उपचार उपलब्ध असतांनाही त्यांनी परदेशातील आरोग्य व्यवस्थेवर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो.

अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेमुळं समाजाचं आरोग्य मात्र वेळोवेळी बिघडलेलं आहे, हे वस्तुस्थिती आहे. त्यावादाच्या जखमांची वेदना अजूनही देशाला जाणवतात. अशा परिस्थितीत देशाचं सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्या त्या वादग्रस्त जागेवर सुसज्ज असं अत्याधुनिक रूग्णालय उभारावं, अशी मागणीही करण्यात येत आहे. रूग्णालय उभारण्यावर जर एकमत होत नसेल तर एखादी चांगली शिक्षण संस्था किंवा मोठं विद्यापीठही उभारण्याचा पर्याय नागरिकांनी सुचवला आहे. त्यामुळं या वादग्रस्त जागेवर देवालय हवंय, रूग्णालयं हवं की मशीद हवी…की एखादं विद्यापीठ हवं आपण ठरवणार तरी कधी…असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो.

Similar News