11 रुपयात उपचार कुठं मिळतो माहितीय का?
तुम्ही किंवा तुमच्या कुटूंबातील व्यक्ती आजारी पडला तर रुग्णालयाचे बील पाहून डोळे पांढरे होतात. पण मुंबई शहरात अवघ्या 11 रुपयांमध्ये रुग्णावर उपचार केले जातात. पण हे उपचार नेमके कुठं मिळतात? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजित जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट;
मुंबई हे आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणून ओळखले जाते. मात्र या शहरात आजारी पडल्यास उपचारासाठी येणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. मुंबईत महापालिकेची रुग्णालये आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकसंख्येमुळे ही रुग्णालयेही अपुरी पडतात. मात्र मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर 11 रुपयांमध्ये उपचार मिळतात, असं डॉ. उमेश गायकवाड यांनी सांगितले.
डॉ. उमेश गायकवाड म्हणाले की, जोधपूर एक्सप्रेसने एक महिला मुंबईला येत होती. ती महिला गरोदर होती. अचानक तिला त्रास असह्य झाला. त्यावेळी रेल्वे स्थानकावरील रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आणि केवळ अर्ध्या तासात महिलेचे सुरक्षित बाळंतपण झाले. त्यावेळी त्या महिलेला कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावले नाहीत.
केवळ 11 रुपयांमध्ये उपचार करणारे रुग्णालय प्रत्येक रेल्वे स्थानकावर आहे. ज्यामध्ये मॅजिक लाईफ, वन रुपी, जीवन ज्योत, अपेक्स ही नावं या रुग्णालयांची आहेत. या रुग्णालयांकडून रेल्वे कुठल्याही प्रकारचे भाडे घेत नाही, अशी माहिती डॉ. दिवेकर पाटील यांनी दिली.
या 11 रुपयांमध्ये सेवा देणाऱ्या रुग्णालयांमध्ये एमर्जन्सी सेवा दिली जाते. ज्याचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना फायदा होतो, अशी माहिती डॉ. दिवेकर पाटील यांनी दिली.