चित्ता आणि बिबट्या यांच्यातील फरक काय आहे?

Update: 2022-09-17 08:38 GMT

भारतात आता जवळपास ७० वर्षांनी चित्ते परतले आहेत. केंद्र सरकारने नामिबिया देशातून ५ नर आणि ३ मादी असे एकुण ८ चित्ते आणले आहेत. मध्यप्रदेशच्या कुनो अभयारण्यात त्यांचं यापुढचं वास्तव्य असणार आहे. चित्त्यांना जेव्हा आपण टीव्हीवर पाहिलं असेल तेव्हा आपल्याला अरे हा तर बिबट्यासारखाच दिसतो असे उद्गार पटकन ओठांवर आले असतील. बरोबर आहे आपलं. खरंच बिबट्या आणि चित्ते यांच्यात बरंचसं साम्य आहे कारण पण काही बारीकसे बदलही आहेत त्यामुळे हे दोन्ही प्राणी एकमेकांपेक्षा वेगळे देखील आहेत. चला आज या दोन प्राण्यांमधील नेमका फरक काय आहे जाणून घेऊयात.

चित्ता आणि बिबट्या हे एकाच कुळातले. मार्जर! दोघेही मांसाहारी प्राणी दिसायला जवळपास सारखेच. पण त्यांच्या उंचीत, शरीरयष्टीत बराचसा फरक आढळतो.

उंची

चित्ता तुलनेने बिबट्या पेक्षा लहान आहे , चित्ता खांद्यावर लांबलचक असून नराचं वजन ५४ किलो पर्यंत असतं. चित्त्याची लांबी ही अर्ध्या मीटर पेक्षा लांब नसते.
बिबट्या हा तुलनेते मोठा, वजनी असतो. पण वाघ किंवा सिंहा एवढा लांबही नसतो. एका नर बिबट्याचं वजन ६० ते ७० किलो पर्यंत असतं.

शेपुट

बिबट्याची शेपटी नळीच्या आकाराची असते आणि झाडावर चढताना ती समतोल राखण्यासाठी वापरली जाते. तर चित्त्याची शेपटी आकारात चपटी असते. चित्ता त्याच्या शेपटीचा वापर जेव्हा तो सर्वात वेगाने धावत असतो तेव्हा करतो.

ठिपके

बिबट्याच्या शरीरावरचे ठिपके गोलाकार आकाराचे आणि एकत्र असतात, दिसायला पोकळ असतात पण एकसारखे नसतात. याउलट चित्त्याचे ठिपके हे काळे, स्पष्ट, गडद आणि इतर ठिपक्यांपासून दुर असतात.

शिकार

बिबट्या त्याची शिकार घनदाट झाडी असलेल्या ठिकाणी शोधून काढतात आणि लपुन त्या प्राण्यांवर उडी मारतात. बिबट्या ला शिकार करताना वेळेचं बंधन नसतं. त्याच्या मनात आलं की तो शिकार करतो

तर या उलट चित्ता मोकळ्या ठिकाणी शिकार करण्यास पसंत करतो कारण त्याला शिकार करणे सोपे जाते त्यासाठी तो त्याच्या चपळाईचा वापर करतो. चित्ता हा फक्त दिवसाच शिकार करण्याला प्राधान्य देतो. दुपारच्या उष्णतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी तो पहाटेच्या उजेडात शिकार करण्याला प्राधान्य़ देतो.

वेग

हा या दोघांमधील सर्वात महत्वाचा आणि लगेच लक्षात येणारा फरक आहे. चित्ता हा जागातील सर्वात जास्त वेगाने पळणारा प्राणी आहे. तो सरासरी ताशी ११५ किलोमीटर वेगाने धावतो. त्याचा वेग हा २ सेकंदामध्ये ७५ किमी ने तो वाढवू शकतो. पण तो फार दुर पर्यंत असाच पळू शकत नाही. त्यामुळे मोकळ्या ठिकाणी शिकार करण्याला प्राधान्य देतो.

तर हा आहे एकाच कुळातील दोन प्राण्यांमधील फरक! यापुढे चित्ता आणि बिबट्यामधील फरक ओळखाल ना?

Tags:    

Similar News