कोरोनाच्या संकटात डेंग्युचा कहर, वर्धा शहरात रुग्ण वाढले

कोरोनाच्या संकटातच आता पावसाळ्यातील आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यामध्ये काही ठिकाणी डेंग्युचे रुग्ण आढळत आहेत. वर्धा जिल्ह्यातील परिस्थिती सांगणारा आमचे प्रतिनिधी प्रणय ढोले यांचा ग्राऊंड रिपोर्ट....;

Update: 2021-07-31 16:59 GMT

कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यभरात कमी होते आहे. पण अजूनही दररोज कोरोनाचे आढळत आहेत. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्यानंतर इतरही आजारांचे संकट वाढू लागले आहे. वर्धा शहरातही असेच एक नवीन संकट आले आहे. इथे कोरोनासोबत आता डेंग्युचे रुग्ण देखील वाढू लागले आहेत.

डेंग्यूबाबत वर्ध्यामधील नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. यामुळे सध्या प्रत्येक नागरिकाने डेंग्यूबाबत खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन काटेकोर करण्याची गरज आहे असे आवाहन आरोग्य यंत्रणा करत आहे.

जिल्ह्यात सध्या नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची वेग मंदावला असाल तरी डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यू बाधितांमुळे रुग्णालयांमधील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात सध्या सुमारे १२९ हून अधिक डेंग्यूसदृश बाधितांवर उपचार सुरू असून, नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.


विशेष म्हणजे सध्या ७० टक्के रुग्णांना सध्या प्लेटलेट्स चढवाव्या लागत आहेत. मागील साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात ९८ डेंग्यूबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. तर एका व्यक्तीचा डेंग्यूने बळी सुद्धा घेतला आहे. जिल्ह्यात नवीन कोविड बाधितांच्या तुलनेत डेंग्यू बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात सध्या रुग्णखाटांचा तुटवडा भासायला सुरुवात झाली आहे.

कस्तुरबाच्या मेडिसीन विभागातील सर्व बेड फुल्ल

कोविड संकटाच्या काळात प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्याचे काम सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आले. मात्र आता या हॉस्पिटलच्या मेडिसीन विभागातील बेडवर सध्या डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये सुमारे ३० मुले असून, ७० टक्के रुग्णांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत आहेत.

नागरिकांनीही डेंग्यूची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करून घ्याव्या, तसेच औषधोपचार घ्यावे, असे आवाहन नगर परिषदेने केल आहे. शिवाय प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आवारात कुठे डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करून अडलेले पाणी वाहते करावे, असे आवाहन सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयाच्या डीन डॉ. नितान गगने यांनी केले आहे.


डेंग्यू या कीटकजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. त्यामुळे सहा नगरपालिका, चार नगरपंचायती व सर्व ग्रामपंचायतींना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वर्ध्याच्या जिल्हा हिवताप अधिकारी डॉ जयश्री थोटे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात डेंग्यू डोकेवर काढत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सध्या ४९ डेंग्यू बाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी दिली आहे.

दरम्यान साचलेल्या पाण्यात डेंग्युचे डास निर्माण होऊन डेंग्युचा प्रसार होतो. त्यामुळे पाणी साचू देऊ नका असे आवाहन केले जाते. पण वर्धा शहरात मात्र एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. अनेक पायाभूत सुविधांची कामे सध्या सुरू आहेत. या कामांमुळे अनेक ठिकाणी खड्डे करण्यात आले आहेत. यामध्ये पावसाचे पाणी साठल्याने डास होत आहेत.

वर्धा नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून नवीन सिमेंट रोड बनवण्यात आले होते. मात्र भुयारी गटर योजनेचे काम सांगत नगरपालिकेने संपूर्ण वर्धा शहरा अंतर्गत नवीन बनविलेले रस्ते खोदण्यात आले. त्या खोदलेल्या रस्त्यांमुळे वर्धा शहरातील तसेच अनेक नागरिक जे रोज या रस्त्यावर प्रवास करतात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक नागरिकांचे या रस्त्यानवर अपघातसुद्धा झाले आहे. तसेच या रस्त्यांच्या खड्ड्यात पाणी साठल्याने डासांची उत्पत्ती होते आहे. खोदलेल्या रस्ते दुरुस्तीसाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटनांनी तक्रारसुद्धा नगरपालिकेला दिली आहे. वर्धा नगरपालिका विकासासाठी २०० करोड रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. पण इतक्या मोठया प्रमाणात आलेल्या निधीचा वापर करूनसुद्धा वर्धा शहराची स्थिती दयनीय झालेली दिसते. यासाठी काही संघटनांनी आंदोलनही केले. येत्या ७ दिवसात या आंदोलनाची दखल घेत संपूर्ण वर्धा शहर खड्डेमुकत्त नाही केलं तर आम्ही गांधीगिरी करत वर्धा शहरच्या प्रत्येक प्रभागात साप्ताहिक गांधीगिरी आंदोलन सुरू करू अशा इशारा दिला आहे.


डेंग्युची लक्षणे

डेंग्युचा डास चावल्यास ४ ते ७ दिवस त्याची लक्षणे दिसू लागतात. पहिले तीन ते चार दिवस ताप येतो. दिवसभरात ताप चढ-उतार होत असतो. सांधे दुखीही जाणवते. मळमळ, पोटदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणेसुद्धा जाणवतात. काही रुग्णांना चार ते पाच दिवसांनी अंगावर पुरळ उठते. बहुतांश रुग्णांना एवढा त्रैस होतो आणि पुढचे ३-४ दिवसाच उपचार घेतले तर त्यांना बरे वाटते. त्यानंतर 15 दिवसात रुग्ण पूर्ण बरे होऊ शकतात. काही रुग्णांमणध्ये ताप आल्यानंतर तो गंभीर रुप धारण करतो. यामध्ये डेंग्यूच्या तापाबरोबर प्लेटलेट्सची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होते. त्यातून रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ शकते.

डेंग्युवर अजून कोणती लस आलेली नाही. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी काही खबरदारीची पावले उचलता येऊ शकतात. डेंग्युच्या डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. घरातील पाणी साठवण्याच्या टाक्या, रोपांच्या कुंडय़ा, पाणी साठेल अशा जागा, रबरी टायर, कुलर्स, एसी यामध्ये पाणी साठणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही ठिकाणी ५ दिवसांपेक्षा पाणी साठू देऊ नका. घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ तसेच कोरडा असला पाहिजे. पाणी साठवण्याची गरज असेल तर तर त्यामध्ये कीटकनाशक टाकणे गरजेचे आहे. तसेच त्यामध्ये गप्पी मासे सोडता येतात. तसेच डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला तातडीने कळवणे गरजेचे असते. म्हणजे रुग्ण आढळलेल्या परिसरात कीटकनाशक फवारणी करता येते. डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांचाही सहभाग असला पाहिजे.

Tags:    

Similar News