रमाबाई नगरला शाप कुणाचा ?
मुंबईत अनेक झोपडपट्ट्या आहेत. तिथे जाण्यासाठी आजही प्रशासकीय यंत्रणा, पत्रकार आपल्या जीवाला घाबरत असतात. मुंबईतील अशाच एका नगरात रिपोर्टिंग करत असताना लोकांनी सांगितले त्यांचे अनुभव वाचा कृष्णा कोलापटे यांच्या या लेखातून;
रिपोर्टिंग करत मी आणि माझा मित्र ऋषिकेश घाटकोपर इथल्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पोहोचलो. ऋषी म्हणाला, हेच का ते रमाबाई नगर जिथं १९९७ चं हत्याकांड (1997 Ramabai killings) झालं होतं. मी म्हणालो, हो, हेच ते रमाबाई नगर...इथं तुला टायकोट ते गल्लीतील गुंड अशी सर्व प्रकारची माणसं दिसतील...मुंबई बदलली तसं रमाबाई नगरही बदललं...
आम्ही दोघं मग रमाबाई नगरमधील लोकांशी औपचारिक गप्पा करू लागलो. त्यातून अनेक धक्कादायक आणि गंभीर मुद्दे कळाले. कधीकाळी चळवळीचं केंद्र असलेल्या रमाबाई नगरची तीच ओळख आता धूसर होत चाललीय. अख्ख्या मुंबईत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली. परंतु आमच्या नगरात कोणतीही कारवाई झाली नाही ? संध्याकाळी रमाबाई नगरच्या कोपऱ्या-कोपऱ्यात खुले आम मुलं नशा करत असतात, त्यामुळे अनेक भांडण होतात. चौकात लोकप्रतिनिधीनं कॅमेरे बसवलेत. ते पण शो पीस साठीचं बसवले आहेत, अशी खंत इथल्या एका रहिवाशानं चर्चेदरम्यान व्यक्त केली.
आणखी एक घटनेनं रमाबाई नगरमधल्या तरूणाईची सध्याची स्थिती समजली. विशीतील तरूण मुलं एका तृतीय पंथीयाला अत्यंत घाणेरड्या भाषेत, शिवीगाळ करत चिडवत होती. या टवाळ पोरांमध्ये २ अल्पवयीन मुलंही होती. त्यामुलांशी बोलतांना एकजण म्हणाला, “ या मुलानं एक हाफ मर्डर केलीय. तर दुसरा मुलगा सहज बोलून गेला की, “ हाफ नाही फुल केला २ केस आहेत”. साधारणपणे २० ते २५ वर्षांच्या आतील ही मुलं इतकी क्रूर कधीपासून बोलायला लागली. इतक्या लहान वयात या मुलांची अशी मानसिकता कशामुळं झाली.
मग मी रमाबाई नगरमधल्या नागरी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. नालेसफाई, स्वच्छता होत नाही, तरूणाईच्या हाताला कामं नाही. त्यामुळं बेरोजगार मुलांचा दिवस हा टवाळक्या करण्यातच जातो. आम्ही लोकांच्या समस्या समजून घेत असतांनाच माझ्या समोरच आणखी एक घटना घडली. एक तृतीयपंथी दुपारच्या वेळेस रस्त्याने जात होता, त्याला पाहताच टपोरी मुलांनी आवाज दिला ए... मुस्कान ए.. मुस्कान मु.. मै ** * असा आवाज देत ते ओरडू लागले. मी शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीला विचारलं ही मुलं असं का बरं करतात. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मुल अशीच उनाडक्या करत फिरतात. एका लोकप्रतिनिधीनं CCTV कॅमेरा बसवला आहे. पण तो बंद अवस्थेत आहे. इथे खुले आम मुलं व्यसनं करतात, येता जाता मुलींकडे वाईट नजरेने पाहतात. डी.बी. पवार चौकासाठी आम्ही एक पोलीस चौकीची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंगळे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलत असताना सांगितले की रमाबाई नगरातील सर्व CCTV कॅमेरे चालू आहेत. त्याची माहिती मी कोणालाच दिली नव्हती परंतु ते मी स्वखर्चाने संपूर्ण नगरात कॅमेरे बसवले आहेत. कॅमेराचा कंट्रोल सर्व माझ्याकडे असल्याने डी.बी.पवार चौकात या CCTV मुळे अनेक गुन्हे उघडकीस आले असल्याचं पिंगळे यांनी सांगितले.
डी.बी. पवार चौकात जसा प्रवेश केला तसं सर्व पाणी रस्त्यावर, कचराही रस्त्यावरचं दिसत होता. तेथील एका ज्येष्ठ महिला रहिवाशी सोबत बोलत असताना तिनं सांगितलं की, कित्येक वर्षांपासून हे असचं सुरू आहे. रस्ता, गल्ली, सगळीकडे घाणीचं साम्राज्य असतं. लोकं रस्त्यावर, घराशेजारी कचरा टाकतात. त्यामुळं अनेक जण आजारी पडले आहेत. ४ ते ५ जण हे पॅरालिसीस पेशंट आहेत. आरोग्य विभागाही या विभागात अजिबात लक्ष देत नाहीत. एका महाविद्यालयीन मुलीला इथं महिला सुरक्षित आहेत का, याबाबत विचारणा केली. त्यावर ती म्हणाली,” दिवसभर असा काही प्रॉब्लेम नसतो, ओळखीच्या माणसांपासून कोणताही त्रास नसतो तर गल्लीबाहेर नाक्यावर बसणारी काही मुलं वाईट नजरेने पाहत असतात. बुधवारी रमाबाईत बाजार भरतो खुप गर्दी होते. त्यावेळी मुलींना हात वगेरे लावण्याचे प्रकार घडतात, असं तिनं सांगितलं.
अन्यायाविरोधात पेटून उठणा-या रमाबाई नगरबद्दल इथल्या चळवळीबद्दल वाचून-ऐकून होतो. मात्र, प्रत्यक्षात तिथं गेल्यावर कळलं की इथले प्रश्न हे वेगळे आहेत. मुंबई सारख्या महानगरामध्ये असूनही रमाबाई इथल्या रहिवाशांना आजही प्राथमिक गरजांसाठी संघर्ष करावा लागतोय. रमाबाई नगरला हा कुणाचा शाप आहे की हा दोष कोणाचा ? इथल्या रहिवाशांचा...सरकारचा...यंत्रणेचा...की सामाजिक पातळीवर आजही सुरू असलेल्या वर्णद्वेषाचा...या प्रश्नांची सल घेऊनच मी आणि ऋषी तिथून बाहेर पडलोय...बघूया भविष्यात तरी या प्रश्नांची उत्तरं सापडतात का ?
पत्रकार कृष्णा कोलापटे मॅक्स महाराष्ट्र