शेतकऱ्याची कन्या झाली क्लास वन अधिकारी
नुकताच एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत पंढरपूर तालुक्यातील आंबे गावाच्या रहिवाशी असलेल्या स्वप्नाली गायकवाड या शेतकरी कन्येने यश मिळवले आहे. एमपीएससी आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मृदा व जलसंधारण विभागाच्या परीक्षेत सेल्फ स्टडी करत EWS मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट;
तर राज्यात ती मुलींमध्ये नववी आली आहे. स्वप्नालीचे आई-वडील अशिक्षित असूनही त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले. स्वप्नालीला एक भाऊ व बहीण असून मुलाला त्यांनी अधिकारी बनवले आहे तर मोठ्या मुलीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून तिचा विवाह झाला आहे. स्वप्नालीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांबरोबरच मामाचा ही वाटा आहे. पण स्वप्नालीचे हे यश पाहण्यासाठी तिचा मामा सध्या या जगात नाही. कोरोनाच्या काळात त्यांचे निधन झाले. मामाने दाखवलेले स्वप्न स्वप्नालीने पूर्ण केले. एकीकडे ती आनंद ही साजरा करीत आहे तर दुसरीकडे हे यश पाहण्यासाठी तिचा मामा जिवंत नसल्याने तिला अतीव दुःख ही होत आहे.
स्वप्नालीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात झाले आहे तर उच्च माध्यमिक शिक्षण पंढरपुरात झाले आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेज मधून झाले आहे. ती सिव्हिल इंजिनिअर असून तिने 2017 साली इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आहे. त्यानंतर तिच्या मामाने व भावाने एमपीएससी करण्याचा सल्ला देऊन तिच्याकडून तयारी करून घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तिने पुण्यातील लायब्ररीत अभ्यास केला. त्यानंतर तिने गावात येऊन सेल्फ स्टडी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती प्रिलियम पास झाली होती तर 2018 साली ती एमपीएससीची मेन परीक्षा नापास झाली होती. पण तिने उमेद सोडली नाही. पुन्हा तिने जोमाने तयारी करण्यास सुरुवात केली. 2019 साली मृदा व जलसंधारण विभागाच्या जागा निघाल्यानंतर फॉर्म भरला व परीक्षा दिली. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून या परीक्षेत तिने EWS मुलींमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे तिचे विशेष कौतुक होत आहे.
परीक्षेच्या तयारीसाठी भावाने केली मदत
ज्यावेळेस स्वप्नाली सिव्हिल इंजिनिअरिंग पास झाली, त्यावेळेस एमपीएससीच्या जागा निघाल्या होत्या. एमपीएससी परीक्षे विषयी तिला जास्त काही माहीत नव्हते. तिचा मोठा भाऊ शिकलेला असून सरकारी नोकरीत आहे. त्याने याविषयी तिला माहिती दिली. सुरुवातीला एमपीएससीच्या जागा निघाल्या त्यावेळेस स्वप्नालीच्या भावाने त्याचा आणि तिचा फॉर्म भरला. भावाने तिला सिलँबस समजावून सांगितला. तिला अभ्यासाला पुस्तके आणून दिली होती. एखादी माहिती हवी असेल तर तिचा भाऊ तिला पूर्ण गाईडन्स करायचा. काही दिवसांतच स्वप्नाली प्रिलियम पास झाली. त्यानंतर भावाने आणखीन विश्वास दिला,की तू नक्कीच स्पर्धा परीक्षा पास होशील. क्लास वगैरे लावायची तुला काही गरज नाही. तू सेल्फ स्टडी कर असा सल्ला तिच्या भावाने तिला दिला होता. त्यानंतर कमी काळावधीतीच स्वप्नाली एमपीएससीची प्रिलियम परीक्षा पास झाली. त्यावेळी स्वप्नालीला एमपीएससीच्या क्लास विषयी फारशी माहिती नव्हती. या परीक्षेसाठी क्लासच लावावा असे काही तिच्या डोक्यात नव्हते. त्यानंतर 2018 साली तिला मुख्य परीक्षेत अपयश आले. तरीही स्वप्नाली अपयशाने खचून गेली नाही. तिने पुन्हा जोमाने सुरुवात केली. 2019 साली तिने परीक्षा दिली. त्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये स्वप्नालीने बाजी मारली आहे. ती राज्यात EWS महिला वर्गातून दुसरी आली आहे.
आई-वडील अशिक्षित असताना मामांनी केली मदत
स्वप्नालीचे आई-वडील अशिक्षित असल्याने स्वप्नाली व तिच्या भावंडाना शिक्षणासाठी गाईड करण्याचे काम स्वप्नालीच्या मामांनी केले. स्वप्नालीचा मोठा भाऊ सध्या सरकारी नोकरीत आहे. तर बहिणीचे लग्न झाले असून ती पदवीधर आहे. स्वप्नालीला अभ्यासात काही अडचण आली तर ती मामाची मदत घेत असे. ज्यावेळेस स्वप्नाली मुख्य परीक्षा नापास झाली,त्यावेळेस तिच्या मामांनी आणि भावाने धीर देण्याचे काम केले. तिच्या मामाचे तिला सतत सांगणे असायचे,की तू मुख्य परीक्षेपर्यंत जाऊ शकते तर तू अजून अभ्यास केला पाहिजे. तू महाराष्ट्रात टॉप टेन मध्ये आले पाहिजेस. 2019 सालच्या परीक्षेच्या लागलेल्या निकालात स्वप्नाली मुलींमधून राज्यात नववी आली आहे तर EWS महिला प्रवर्गातून ती दुसरी आली आहे. पण ज्या मामाने तिला गाईड व मदत केली. त्या मामाचे कोरोनाच्या काळात निधन झाल्याने तिचे हे यश तिचा मामा पाहू शकले नाहीत. याचे ही स्वप्नालीला मोठे दुःख आहे.
दहावी नंतर स्वप्नालीने सायन्स साइडला घेतला होता प्रवेश
स्वप्नाली 10 वी पास झाल्यानंतर तिला तिच्या घरच्यांनी आर्ट साइडला प्रवेश घेण्याचा आग्रह केला होता,पण तिने तो मान्य केला नाही. शिक्षणाच्या बाबतीत तिने घरच्याकडे हट्ट केला होता,की मोठा भाऊ जो शिक्षण घेईल,ते मी ही घेणार आणि तो तिने सार्थ करूनही दाखवला. म्हणूनच तिने भावाप्रमाणे सायन्स साइडला प्रवेश घेतला. भावाने ही तिचा हट्ट पुरवला व आई-वडिलांची समजूत काढली. स्वप्नालीच्या शिक्षणासाठी तिच्या आई-वडिलांनी तिला नेहमीच पाठबळ दिले. एमपीएससीची परीक्षा देऊन रिझल्ट येण्यासाठी 3 वर्षे 10 दिवस लागले. या कालावधीत तिच्यावर अभ्यासाचा प्रेशर वगैरे नव्हता असे तिचे म्हणणे आहे.
आई-वडिलांनी शेतात काबाडकष्ट करीत शिकवले मुलांना
स्वप्नालीचे आई-वडील अशिक्षित आहेत. पण त्यांनी शेतात राबून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. वेळप्रसंगी त्यांनी बँकेचे कर्जही घेतले. पण मुले शिकवली. त्यांना काय हवे ते दिले. मुले जरी नोकरीला लागली असली तरी स्वप्नालीचे आई-वडील शेतात राबत आहेत. स्वप्नालीच्या लग्नाबाबत सातत्याने त्यांना विचारणा व्हायची पण त्यांनी नेहमीच स्वप्नालीला धीर दिला. स्पर्धा परीक्षा स्वप्नाली कधी पास होणार यातच लग्नाचे वय वाढत चालले आहे. असे अनेक प्रश्न नातेवाईक व समाजातील लोकांकडून विचारले जात होते. पण स्वप्नालीच्या आई-वडिलांनी याची परवा केली नाही. त्यांनी स्वप्नालीवर विश्वास दाखवला व तो विश्वास स्वप्नालीने ही सार्थ करून दाखवला.
महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला शिकण्यासाठी पाठींबा द्यावा
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना स्वप्नाली गायकवाड म्हणाली,की माझ्या आई-वडिलांनी दाखवलेल्या विश्वासमुळेच मी स्पर्धा परीक्षा पास होऊ शकले. आई-वडिलांच्या कष्टाची परतफेड रिझल्टच्या माध्यमातून केली आहे. माझ्या आई-वडीलांसारखे महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहेत. ग्रामीण भागातील मुलींना त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षणासाठी पाठींबा द्यावा. ग्रामीण भागातील मुलगी जेव्हा शिक्षण घेत असते तेंव्हा तिचे कुटुंब तिच्या सोबत असणे तितकेच महत्वाचे आहे. कारण आई-वडिलांचा सपोर्ट मुलींना विश्वास देतो. त्यांनी विश्वास दिला तर मुलींना शिकण्यासाठी आणखीन खूप जास्त बळ येते. घरच्यांनी दाखवलेला विश्वास मुलींनी सार्थ करून दाखवावा. असे तिला वाटते.
शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सोडवणार
स्वप्नालीने बोलताना सांगितले,की मी शेतकऱ्याची मुलगी असल्याने त्यांच्या प्रश्नांची मला चांगली जाणीव आहे. त्यांचे प्रलंबित प्रश्न माझ्या विभागाच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठवाडा, विदर्भात शेतीला पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या योजना प्रलंबित आहेत. त्या सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. मृदा व जलसंधारण विभागात माझी उपविभागीय अधिकारी क्लास वन पदावर निवड झाली आहे. त्याला साजेसच काम भविष्यात करणार आहे. असे स्वप्नालीने सांगितले.