दलित वस्तीची कामे झाली,पण समस्या मात्र कायम

ठेकेदार आणि ग्रामपंचायतीच्या चुकीमुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने या रस्त्याच्या कडेने राहणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, काम झाले परंतु समस्या कायम अशी अवस्था गावकऱ्यांची झाली आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट...;

Update: 2022-09-18 05:39 GMT

राज्यातील दलित वस्त्याचा विकास व्हावा,या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने,यासाठी विशेष अशा निधीची तरतूद करून दलित वस्त्यात प्राथमिक सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष अशा तरतुदीनुसार दलित वस्त्यांत रस्ते,पाणी गटार,लाईट या सोयी सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. या वस्त्यांचा निधीचा इतरस्त वापरण्यात येवू नये,अशी कायद्यात तरतूद असतानाही दलित वस्त्यांचा निधी इतर कामासाठी वापरला जात असल्याच्या अनेक घटना राज्यात उघडकीस आल्या आहेत. अनेक ठिकाणी,अनेक गावात हा निधी गावातील इतर कामांसाठी वापरला गेला असल्याचे समोर आले आहे. दलित वस्त्यांत झालेल्या कामांचे मूल्यांकन केल्यास बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्ज्याची कामे ही झाली असल्याचे अनेकदा समोर आले असून त्यामुळे दलित वस्त्यांत केल्या जाणाऱ्या कामांवर प्रश्नचिन्हे उपस्थित केली जावू लागली आहेत. अनेक ठिकाणच्या दलित वस्त्यांत कामे करत असताना संबधित ठेकेदारानी व्यवस्थितरीत्या कामे केली नसल्याचे दिसून आले आहे.


असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात घडला असून दलित वस्तीत रस्त्याचे काम करत असताना येणाऱ्या काळात रस्त्यावर पाणी साचून राहणार नाही,याची दक्षता घेतली गेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबधित ठेकेदार आणि ग्रामपंचायतीच्या चुकीमुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने या रस्त्याच्या कडेने राहणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत ग्रामपंचायत काय निर्णय घेतेय,याकडे पेनुर मधील भीमनगर येथील रहिवाशांचे लक्ष लागून राहिले आहेत. दलित वस्त्यांची विशेष निधीतून कामे झाली,पण ती कामे व्यवस्थित झाली का नाहीत,याचीही पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक मांडत आहेत. जर शासनाचा मुख्य उद्देश दलित वस्त्यांत प्राथमिक सोयी-सुविधा पोहचाव्या असा असेल तर मग या समस्या निर्माण होतात कशा असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दलित वस्त्यांची कामे झाली,पण समस्या मात्र आजही कायम आहेत,असे दिसून येते. याबाबत येणाऱ्या काळात शासन काय निर्णय घेतेय यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. नाहीतर शासनाने करोडो रुपये खर्चूनही त्याचा काही उपयोग होणार नाही. असे नागरिकांना वाटत आहे.

रस्त्यावर पाणी साचत असल्याने आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर


पेनुरच्या भीमनगर मध्ये रस्त्याचे काम करण्यात आले असून याच रस्त्याच्या बाजूने बंदिस्त गटारीचे काम करण्यात आले आहे. या गटारीचे काम करत असताना ठिकठिकाणी चेंबर बनवण्यात आले असून त्याचा उपयोग गटार डॅमेज झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी करतात. पण या गटारीच्या बाजूने बनवण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला पाणी जाण्यासाठी व्यवस्थित उतार दिला नसल्याने याठिकाणी सातत्याने पाऊसाचे पाणी साचत आहे. पाणी साचू लागल्याने या पाण्यात डुकरे,कुत्री यांचा वावर वाढला आहे. जास्त दिवस पाणी साठून राहत असल्याने मच्छरांचाही प्रादुर्भाव वाढला असून येणाऱ्या काळात डेंग्यू सारख्या गंभीर आजाराचाही सामना करावा लागत आहे,असे पाण्याच्या बाजूला राहणारे रहिवाशी सांगतात. सातत्याने पाणी साचत असून या घाण पाण्यात लहान मुले खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होत असून याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार अर्ज,निवेदने देवून ही ग्रामपंचायत जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे नारिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीकडे पाण्याचा प्रश्न मार्गी लावा,असे सांगण्यास गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे तक्रारदार लखन सोनवणे सांगतात.

पाण्याच्या घाणीमुळे लोकांच्या आजारांचे प्रमाण वाढले


या रस्त्यावर पाणी साचल्याने या पाण्यात आळ्या निर्माण झाल्या असून यामध्ये लहान मुले खेळत आहेत. लहान मुलांबरोबरच या ठिकाणच्या लोकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच सातत्याने पाणी साचून राहत असल्याने आजूबाजूच्या घरांच्या भिंतीवर देखील त्याचा परिणाम झाला असल्याचे नागरिक सांगतात. पाऊस झाल्यास याच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असून त्याच्यातून मार्ग काढत घरात जावे लागते. घराच्या पुढेच पाणी साचत असल्याने रात्रीच्या वेळेस येथील नागरिकांना त्रास होत असून या पाण्याच्या निचऱ्यासाठी ग्रामपंचायतीने लवकर पाऊल उचलावे,असे नागरिकांना वाटत आहे.

साचलेल्या पाण्यात पाय घसरून वृध्द महिला झाली फ्रॅक्चर

गेल्या एका वर्षापासून ग्रामपंचायतीला या पाण्याचा निचरा होण्यासाठी निवेदने देत आहोत. ग्रामपंचायतीमध्ये जावून तोंडी सांगत आहोत. त्यावर येत्या काही दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावू,अशी उत्तरे देण्यात येत आहेत. असे येथील नागरिक लखन सोनवणे सांगतात. या पाण्यातून एक वृध्द महिला किराणा दुकानातून साहित्य आणण्यासाठी जात असताना पाय घरून फ्रॅक्चर झाली आहे. याबाबत या महिलेने ग्रामपंचायतीला सर्वस्वी जबाबदार धरले आहे. मी वृध्द असल्याने औषध उपचारालाही पैसे नसल्याचे त्या सांगतात. त्यामुळे ग्रामपंचायत या पाण्याची कशी विल्हेवाट लावेल,याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

..अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन करू

ग्रामपंचायतीला वारंवार निवेदने देवून ही पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जात नाही. याबाबत मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ही निवेदन देण्यात आले आहे. पण अद्यापही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. या पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी नाही लावल्यास येत्या काही दिवसात मोहोळ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसू,असा इशारा लखन सोनव भणे आणि त्याचे सहकारी आनंद अवचारे यांनी दिला आहे.

आज चर्चा करून सांगतो - सरपंच सुजित आवारे

पेनुर गावचे सरपंच सुजित आवारे यांच्याशी संपर्क साधून साचत असलेल्या पाण्याबाबत विचारले असता,आज चर्चा करून सांगतो,असे सांगितले.

आजच्या मासिक मीटिंग मध्ये विषय ठेवण्यात येईल - ग्रामसेवक

आज होणाऱ्या मासिक मीटिंग मध्ये साचत असलेल्या पाण्याचा विषय ठेवण्यात येणार असून त्याबाबत ग्रामपंचायत सदस्य काय निर्णय घेतात,यावर अवलंबून आहे. असे ग्रामसेवक वाघमारे यांनी सांगितले.



Full View

Tags:    

Similar News