दलित वस्तीतील रस्त्याची कामे निकृष्ट ;ग्रामस्थांचे बेमुदत आमरण उपोषण

Update: 2022-10-13 15:24 GMT

गेल्या तीन महिन्यांपूर्वी दलित वस्तीत करण्यात आलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्यावर खड्डे पडून वाहून जावू लागला आहे. रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. यासह विविध मागण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील देगाव येथील ग्रामस्थ मोहोळ पंचायत समिती समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत.

आंदोलन कर्त्यांच्या या आहेत मागण्या

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी 2020 ते 2021 मध्ये मोहोळ तालुक्यातील देगाव येथील आण्णाभाऊ साठे नगर,डॉ,बाबासाहेब आंबेडकर नगर, संत रोहिदास नगर येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी बनवण्यात आलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता वाहून जावू लागला आहे. या कामात भ्रष्टाचार झाला असून संबधित ठेकेदार, इंजिनियर यांच्यावर रस्त्याच्या कामाची चौकशी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. पंतप्रधान,शबरी,रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना अॅडव्हान्स तसेच त्यांच्या बांधकाम स्टेज नुसार हप्ते देण्यात यावेत. माझे गाव,माझा विकास आराखड्यानुसार दलित वस्तीमध्ये सन 2020 ते 2022 मध्ये कोणती कामे करण्यात आली. याची चौकशी करण्यात यावी. देगाव येथील ग्रामपंचायतीस करापोटी किती रक्कम जमा झाली त्यातून कोणती कामे करण्यात आली,याची चौकशी करण्यात यावी. 15 व्या वित्त आयोगातून दलित वस्तीला मिळणाऱ्या निधीतून कोणती कामे करण्यात आली.

तांत्रिक सहाय्यक समाधान डोंगरे याची बदली करण्यात यावी. पंचायत समिती अधिकारी के.गावडे यांची चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. कनिष्ठ सहाय्यक कुर्डे यांची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे.या मागण्या घेवून देगाव येथील ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे आंदोलन कर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Full View

Tags:    

Similar News