LockDown: वाट तुझी बघतोय रिक्षावाला...!

लॉकडाऊनमुळं रिक्षा चालकांची परिस्थिती बिकट, रस्त्यावर माणसंच नाही तर रिक्षा कशी चालवणारं, कोरोनामुळं ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायामुळं रिक्षा चालकांवर प्रवाश्याची वाट पाहण्याची वेळ आली आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्राचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...;

Update: 2021-05-14 01:36 GMT

जिल्ह्यात आर टी ओ च्या अधिकाऱ्यांनी जुन्या रिक्षा तोडायला लावून नवीन रिक्षा घ्यायला लावल्या आहेत. आम्ही या रिक्षा बँक लोन काढून घेतल्या. मात्र, बँकेच्या हप्त्यासाठी तगादा लागलेला असतो. मागील लॉकडाऊन मध्ये आम्ही कर्ज काढून काढून थकलोय. लोक वसुलीसाठी दारात येतात, काय करायचं, कसं जगायचं, कधी कधी वाटत फास घेऊन मरून जावं, इतकी वाईट अवस्था झाली आहे.

अश्रुंच्या धारा पुसत शब्बीर चाचा यांनी रिक्षा चालकांच्या समस्या मांडल्या. शब्बीर चाचा नागोठणे येथे रिक्षा चालवतात. चाचा म्हणाले आम्ही रिक्षा घेऊन बाहेर पडतो. अशातच सकाळी 07 ते 11 पर्यंत दुकाने सुरू असतात, यामध्ये धंदा होत नाही. घरी लागणारे सामान नेता येत नसल्याने वाद होतात. सरकारकडून जी काही मदत मिळेल ती सन्मानाने मिळाल्यास बरं वाटेल. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात हाहाकार उडाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागासह शहरी भागाचं अर्थचक्र थांबलं आहे.


महाराष्ट्रात रायगड जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांमधील ऐतिहासिक ठिकाणं, धार्मिक स्थळं यांच्यामूळे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन स्थळापर्यंत घेऊन जाणारे रिक्षा चालक आता रिक्षात बसून असतात. लॉकडाऊनमुळं माणसं घराबाहेर पडत नाहीत. पायी चालणारा माणूस दिसला की, आता दोन पैसे खिशात येतील. या आशेनं ते आपल्याकडे पाहत असतात.

पहिल्या लाटेतून आता कुठं सर्वसामान्य लोक, व्यवसायीक यांची गाडी रुळावर येत होती. ती आता दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत पुन्हा एकदा फिस्कटली आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका हा पर्यटनाला बसला आहे. तरीही सरकारने या क्षेत्रातील लोकांना कोणतंही पॅकेज जाहीर केलेले नाही.

सरकारने सध्या अत्यावश्यक आस्थापने सुरू ठेवण्या बरोबरच प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्याचे आदेश देखील दिले. मात्र, पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यातील रिक्षा चालक रस्त्यावर रिक्षा स्टॉप वर नंबर लावलेली रिक्षा उभी करून प्रवाश्यांची वाट पाहत असतात. जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय वाहतुकीच्या साधनांवर देखील निर्बंध लागू केले आहेत. सध्या जिल्ह्यातील रस्ते हे सकाळी 11 नंतर लॉकडाऊनचे नियम लागू झाल्यानंतर मोकळे होतात. रस्त्यावर कोणीही फिरत नाही.

त्यामुळे प्रवासी वाहतूक कोणाची आणि कशाची करायची? असा प्रश्न सध्या रिक्षा चालकांना पडला आहे. दिवस भर शहरात फिरून एखादा दुसरा प्रवासी मिळतो. त्यानंतर दोन ते तीन तास प्रवाश्यांची चौका चौकात वाट बघत बसण्याची वेळ रिक्षा चालकांवर आली आहे. कोरोना काळापूर्वी दिवसाला 1000 ते 1200 रुपये मिळत होते. मात्र, सध्या ह्या स्थितीत 100 ते 200 रुपये मिळणे अवघड होऊन बसले आहे. सरकारने रिक्षा चालकांना मदतीचा हात म्हणून 1500 रुपये देऊ केले आहेत. त्यात आमचं कसं भागणार, कुटुंब कसं जगणार असा सवाल रिक्षा व्यवसायिक उपस्थित करीत आहेत. अशा परिस्थितीत टीचभर पोटासाठी प्रवासी वाहतूक करताना कोरोना संसर्गाचा होण्याचा धोका सोबत घेऊन रिक्षा चालक कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाडे मिळवण्यासाठी घराच्या बाहेर पडले आहेत.



 


रिक्षा चालक म्हणतात... घरी बसून काय करणार.? घरचे हफ्ते दैनंदिन खर्च कर्ज काढून घेतलेल्या रिक्षा चे हप्ते यासाठी लागणारे पैसे कुठून आणणार? असे एक ना अनेक प्रश्न या रिक्षा चालकांना सतावत आहेत. तर शासनाने मदत म्हणून देऊ केलेले दीड हजार रुपये कश्याला पुरणार.? असा गंभीर प्रश्न सध्या जिल्ह्यातील रिक्षा चालकांना पडला आहे. एकंदरीत पाहिलं तर या लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्याचा राज्य शासनाच्या निर्णय जरी रिक्षा चालकांच्या हिताचा असला तरी रिक्षात प्रवासी बसत नसल्याने रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रोहा तालुक्यात व नागोठणे विभागात माळी मामा म्हणून प्रसिद्ध असलेले रिक्षा चालक विठोबा माळी यांच्याशी आम्ही बोललो तर ते म्हणाले की, मी 24 वर्ष झाले रिक्षा चालवतोय. माझ्या कुटुंबात सहा माणसे आहेत. लॉकडाऊन पडल्याने आमचे खूप वांदे झालेत. मुख्यमंत्रीसाहेब म्हणाले सर्व रिक्षा वाल्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील. ते पैसे अजून आम्हाला मिळाले नाहीत. या भागात इतक्या इंडस्ट्रीज आहेत. त्या आम्हाला काही देऊ शकल्या नाहीत. मुख्यमंत्री काही देऊ शकले नाहीत, आम्ही खायचं काय आणि जगायचं कसं, त्यात आमच्या बऱ्याच रिक्षावाल्यांनी बँक लोन काढून रिक्षा घेतल्यात. हप्ते भरण्याची मुश्किल म्हणून आमची अवस्था बेकार झाली आहे.

अलिबाग येथील सामान्य रुग्णालयात आपल्या वृद्ध आई वडिलांना दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आलेले महेश म्हात्रे म्हणाले की, आमची नाही शेती वाडी, जे कमावतो ते रिक्षा च्या जीवावर, घरात दोन मुले व बायको असा परिवार आहे. लॉकडाऊन असल्याने घरातून बाहेर पडतो पण भाडे मिळत नाहीत. साधे 200 रुपये पण मिळत नाहीत, हाल खूप बेकार आहेत, झोप लागत नाही. वृद्ध रिक्षाचालक विलास भिडे यांनी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनमधील वेळेच्या मर्यादांमुळे बाजारात दूरवरच्या लोकांना येता येत नाही. खरेदीसाठी जरी आले तरी दुकाने बंद होतात. त्यांना घेऊन जायचं म्हटलं तर आम्हाला फक्त दोन माणसं नेमण्याची परवानगी आहे म्हणून आम्हाला भाडे परवडत नाही. त्यांना देखील परवडत नाही.


बाजारात फक्त खाद्यपदार्थ व अत्यावश्यक आस्थापने खुली आहेत. इतर हार्डवेअर ची दुकाने बंद असल्याने दरवर्षी पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणारे लोक आता येत नाहीत. त्यामुळे देखील धंद्याला फटका बसला आहे. आमच्याकडे 1500 रुपये मिळणारे अँप अद्याप सुरू झालेला नाही. म्हणून कुणालाच पैसे मिळाले नाहीत. आता जे काही घरात आहे, त्यावरच दिवस ढकलायचे.

परशुराम पाटील म्हणाले की आता आमची परिस्थिती खूप बिकट आहे, सकाळी 06 ला रिक्षा नंबर ला लावतो, भाडे मिळताना बारा वाजतात, आता तर 10 पन्नास रुपये मिळताना मुश्किल झाले आहे. दोन चार तासात आम्ही काय कमवणार? सरकारने जाहीर केलेली मदत मिळणार कधी, असे सवाल उपस्थित करीत पावसाळा जवळ येतोय. त्यात लॉकडाऊन वाढतोय. आमचे वाईट दिवस आहेत. सरकारने लवकर मदत करावी असे ते म्हणाले.

नागोठणे रिक्षा युनियनचे सचिव भारत भोय म्हणाले की सरकारने जाहीर केलेली मदत आम्हाला कुणालाच मिळाली नाही, इथं साधी वेबसाईट ओपन होत नाही, मग पैसे कधी मिळतील, उन्हातान्हात आम्ही प्रवाश्यांची वाट पाहतो, पण भाडे मिळता मिळत नाही. रिक्षा चालवू तेव्हा दोन पैसे मिळतात, आमचे दुसरे धंदे नाहीत जगावे की मरावे अशी अवस्था आमची झालीय. रायगड जिल्ह्याचे रिक्षाचालक मालक संघटनेचे सल्लागार महेश पोरे मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना म्हणाले की सरकारने 1500 रुपयांची देऊ केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे, त्यात कस भागणार, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून सदरची मदत वाढवून 5000 रुपये करावी अशी मागणी केली असल्याचे सांगितले.

उर्मिला पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण, रायगड (RTO) यांच्याशी रिक्षा चालकांना मिळणाऱ्या मदती संदर्भात बातचीत केली ते म्हणाले रायगड जिल्ह्यात एकूण परवाना धारक रिक्षा A/R 12518 आहेत. लॉकडाऊन काळात रिक्षा चालकांना राज्य सरकारने 1500 रुपयांचे सहाय्य देणेबाबतची घोषणा केली. सद्यस्थितीत त्या संदर्भात आवश्यक असणारी ऑनलाइन लिंक उपलब्ध झालेली नाही. दरम्यान जिल्ह्यातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सर्व रिक्षा चालकांनी आधार कार्ड लिंक व बँक खात्याची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

Full View
Tags:    

Similar News