टाळी वाजली की पोटाला दोन पैसे मिळतात. मात्र, टाळेबंदीमध्ये दुकाने, रेल्वे, बाजार बंद झाले. त्यामुळे लोकांनी गजबजलेल्या ठिकाणी टाळी वाजवून पैसे मागून चरितार्थ चालवणाऱ्या तृतीयपंथी समाजाचं पोटावरच कुऱ्हाड आली. सरकारने तृतीयपंथी समाजासाठी केलेल्या घोषणा या केवळ आश्वासनंच ठरल्या आहेत. या खडतर परिस्थितीत तृतीयपंथी अनेक समस्यांना तोंड देत आहेत.
दुकानाच्या शटरबाहेर, रेल्वेच्या डब्यात, अथवा बाजारात टाळीचा आवाज आला की सर्वांच्या नजरा पदर घेतलेल्या, हातात बांगड्या घातलेल्या तृतीयपंथीयाकडे वळतात. कुणी खिशात हात घालून दहाची नोट त्यांच्या हातावर टेकवते तर कुणी दुकानदार "देवा आताच मागून गेली की तुमच्यातील असे म्हणते''. टाळ्या वाजवून बहुतांशी तृतीय पंथीयांच्या आयुष्याची गुजराण होत असते. यातील काही वेगवेगळ्या जिल्ह्यात देवांच्या गाण्यांचे कार्यक्रम करत असतात. यातून काही पैसे त्यांना मिळतात. यल्लामा देवीच्या जोगत्यांचा कार्यक्रम करून अनेकजण आपला चरितार्थ चालवतात.
बहुतांश तृतीय पंथीयांचे स्वतःचे घर नाही. शहरातील भाड्याच्या खोलीत राहून दिवसभर पैसे मागून गुजराण करतात. काजल राणी या तृतीयपंथी आहेत. त्या बाजार मागतात आणि कार्यक्रम असलेल्या वेळेत कार्यक्रम करतात. त्यांचा यल्लामा देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात त्यांचा चौदा कलाकारांचा संच आहे. यातील कुणी कलाकार पेटी वाजवतो. कुणी ढोलकी वाजवतो तर कुणी तुणतुणे.
वर्षभरातील वेगवेगळ्या दिवशी गावागावांमध्ये देवीच्या गाण्यांचे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमात त्यांना अकरा ते बारा हजार रुपयाची सुपारी मिळते. हे पैसे कलाकारांना वाटून काही पैसे स्वतः ला उरतात. परंतु यासाठी अगोदर वर्षभरासाठी कलाकारांना काही रक्कम अडवॉन्स द्यावी लागते.
अन्यथा या कार्यक्रमासाठी कलाकार मिळत नाहीत. या वर्षी तरी कार्यक्रम होतील म्हणून त्यांनी ते पैसे खाजगी सावकाराकडून कर्ज काढून त्यांनी दिलेले आहेत. मात्र, यावर्षी एकही कार्यक्रम झाला नाही. या बरोबरच बाजार मागून दिवसाला मिळणारे चारशे ते पाचशे रुपये देखील बंद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे बाजार बंद असल्याने त्यांना बाजार देखील मागता येत नाही. यापुढील दिवस कसे काढायचे? हा प्रश्न त्यांना पडला आहे. त्या सांगतात
"मी नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. लोकांच्या मनात असलेल्या भेदभावामुळे मला कुठे काम मिळाले नाही. व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्यातही तृतीयपंथी असल्याने अपयश आले. त्यानंतर मात्र, मी सध्याचा तृतीय पंथीयांचा पारंपारिक व्यवसाय निवडला आहे. त्यावर देखील लॉकडाऊनमुळे कुऱ्हाड कोसळली आहे. काढलेलं कर्ज भागवायच कसं? आणि जगायचं कसं असे प्रश्न त्यांना पडले आहेत.
या कठीण प्रसंगात सामाजिक संस्थानी, दानशूर व्यक्तींनी याचबरोबर ज्यांची खरी जबाबदारी आहे. त्या सरकारने मदत करावी. अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. तृतीयपंथीय असलेल्या हरिदास पाटील यांनी घर सोडून तीस वर्षे झाली. ते आता उतार वयाकडे झुकलेले आहेत. आई वडील सर्व नातलग आहेत. पण कुणीही जवळ करत नाही. ते सांगतात
"घर सोडलं त्यानंतर कुणी घरी ये म्हटलंच नाही, सर्व नातलग तुच्छतेने बघतात, गणगोत कुणीही कसलीही मदत करत नाही. जे काही असेल ते स्वतः च्याच जीवावर पोट भरते. बाजार मागून मी जगत होते. अशात लॉकडाऊन आला. बाजार, दुकाने बंद झाली. कर्ज काढून सुरवातीला आम्ही जगलो. आता पुढच्या दिवसात जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे.
सोमनाथ यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. दिवसा मिळालेल्या पैशातून रात्री घर चालायचं. एका रुपयाची बचत नाही. पैसे थांबले की पोट थांबले. या परिस्थितीत मदत करणारे कुणीच नाही. जो आधार आहे. तो देखील लॉकडाऊन ने हिरावून घेतला आहे.
तृतीयपंथी समाज हा उपेक्षितांमधील उपेक्षित आहे. त्यांना तुच्छ लेखून अनेकांच्या नातलगांनी संबंध तोडलेले आहेत. समाज देखील त्यांच्याकडे तुच्छतेने बघतो. त्यामुळे नोकरी,काम मिळत नाही. मग या व्यवस्थेमध्ये टाळ्या वाजवून कला सादर करून पैसे मिळवणे. हा एकमेव पारंपारिक आधार त्याच्याजवळ उरतो.
लॉकडाऊनमुळे त्यांचा हा आधारच तुटला आहे. या काळात सरकारने जाहीर केलेली रक्कम देखील त्यांना मिळालेली नाही. बहुतांश तृतीयपंथी हे घर सोडून आलेले असतात. यातील अनेकांचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत. भाड्याच्या घरात राहून कसाबसा आपला उदरनिर्वाह करत असतात.
२०२० मध्ये तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना झाली आहे. स्थापनेसाठी अनेक वर्ष तृतीय पंथीयांना संघर्ष करावा लागला होता. मंडळ स्थापन होऊनही याची अद्यापपर्यंत केवळ एक ऑनलाईन बैठक झालेली आहे. या मंडळाने तृतीय पंथीयांच्या विकासासाठी कोणताही ठोस कार्यक्रम जाहीर केलेला नाही.
या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारा तृतीयपंथीयांचा डाटा नोंदणीतून मिळू शकतो. तशी नोंदणीच करण्यात आलेली नाही. माहिती संकलन करणे, ओळखपत्र देणे ही कामे रेंगाळलेली आहेत. याचा फटका राज्यातील तृतीयपंथीयांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे.
तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या राज्य कार्यकारीणी सदस्या शामिभा पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
त्या सांगतात ''तृतीयपंथीयांच्यासाठी राज्य कल्याणकारी मंडळ आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयाचे बजेट देखील गेल्यावर्षी ठेवण्यात आले. परंतु गेल्या १७ महिन्यांमध्ये या मंडळाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही.
सामाजिक न्याय मंत्री असलेले धनंजय मुंडे हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. राज्यमंत्री या नात्याने बच्चू कडू याचे सदस्य आहेत. तरीही अजूनही मदत मिळू शकलेली नाही. तृतीय पंथीयांची नोंदणी नसल्याने आवश्यक डाटा उपलब्ध नाही. सचिवालय आयुक्तालय कार्यालयाकडून हलगर्जी पणा होत आहे. केवळ आश्वासनांच्या कागदी घोड्यात तृतीयपंथीयांचे प्रश्न आजही उपेक्षित राहिलेले आहेत.
तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष असलेल्या धनंजय मुंडे यांनी तृतीय पांथियांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या मंडळामध्ये आपल्या धडाकेबाज कामासाठी प्रसिध्द असलेले राज्यमंत्री बच्चु कडू हे देखील सदस्य आहेत. या दोघांनी पुढाकार घेऊन तृतीय पंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील तृतीपंथीयांनी केली आहे.