काँग्रेसनेच केली बाळासाहेब थोरात यांची कोंडी
सत्यजित तांबे यांच्या बंडानंतर बाळासाहेब थोरात यांनी कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही. त्यापार्श्वभुमीवर आता काँग्रेसने थेट बाळासाहेब थोरात यांची कोंडी केली आहे. नेमकी काय आहे काँग्रेसची खेळी जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट;
राज्यात सुरु असलेल्या पदवीधर आणि शिक्षक (Graduate and Teacher constituency Election) मतदारसंघात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला पाठींबा जाहीर केला आहे. यात नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी काँग्रेसने शुभांगी पाटील (Congress) यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे विरुध्द शुभांगी पाटील (satyajeet Tambe Vs Shubhangi Patil) असाच सामना रंगणार आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसने थेट बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना धर्मसंकटात टाकले आहे.
नाशिक पदवीधर निवडणकीत सत्यजित तांबे यांनी केलेल्या बंडानंतर अजूनही बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रीया दिली नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या मौनाची राज्यात चर्चा रंगली आहे. त्यातच काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे (dr. Sudhir Tambe) यांना निलंबित करून आणि आता सत्यजित तांबे यांना निलंबित करून बाळासाहेब थोरात यांची कोंडी केली आहे.
दुसरीकडे सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यांनी नाशिक पदवीधर निवडणूकीत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काँग्रेसने बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधरबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार काँग्रेसने तांबेंना कोरा फॉर्म दिला होता, असा खळबळजनक दावा विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसनेच बाळासाहेब थोरात यांची कोंडी केली आहे.
बाळासाहेब थोरात सध्या दवाखान्यात आहेत. मात्र ते नाशिक पदवीधर निवडणूकीत शुभांगी पाटील यांचाच प्रचार करतील, असं नाना पटोले (Nana Patole) यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे थोरात यांना भाचे सत्यजित तांबे यांच्याविरोधात प्रचारात उतरवून त्यांना काँग्रेस त्यांना निष्ठा सिध्द करायला लावणार असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात प्रचारात उतरले नाही तर त्यांच्या काँग्रेसवरील निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या निमीत्ताने बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी ही काँग्रेसची पक्षांतर्गत खेळी असल्याची चर्चा आहे.