कॉलेज सुरू... पण गोंधळ कायम!
बुधवारपासून म्हणजेच २० ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरू होत आहेत. कोव्हिड निर्बंधांसह हे कॉलेज सुरू होणार असल्याने लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाकडून या संदर्भात कॉलेजना काय सांगण्यात आले आहे. या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर वाचा हा स्पेशल रिपोर्ट...;
मार्च २०२० मध्ये कोव्हिड संक्रमणामुळे राज्यासह देशभरात लॉकडाऊन लागला. त्यावेळी राज्यात बंद झालेली शाळा आणि कॉलेज आता पुन्हा सुरू होत आहेत. काही दिवसांपुर्वीच राज्यातील शाळा कोव्हिड निर्बंधांसह सुरू झाल्या आहेत. त्याच धर्तीवर आता राज्यभरातील कॉलेज २० ऑक्टोबर पासुन सुरू होणार आहेत. तब्बल दीड वर्षांनंतर कॉलेज सुरू जरी होणार असली तरी ती कोव्हिड निर्बंधांसह सुरू होणार आहेत.
यातील सर्वात महत्वाचा नियम म्हणजे लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यात देखील ५० टक्के क्षमतेनुसार वर्ग भरवण्याचा निर्बंध देखील कॉलेजना लावण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसमोर; ज्यांचं लसीकरण पुर्ण झालेलं नाही त्यांनी लेक्चर्स ना उपस्थित कसं राहायचं? कॉलेज सुरू होत असल्याने आता या विद्यार्थ्यांच्या परिक्षा देखील ऑफलाईन पध्दतीनेच होणार की ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी आम्ही राज्य भरातील विविध कॉलेजशी संपर्क साधला.
कॉलेजचं म्हणणं काय?
कॉलेज सुरू होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर आम्ही ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, " विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही निम्म्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये आणि निम्म्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने लेक्चर्स उपलब्ध करून देणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झालेले नाही त्यांच्यासाठी ठाणे महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजमध्येच लसीकरण कॅम्पचे आयोजन करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या सध्यातरी ऑनलाईन पध्दतीनेच घेणार आहोत. पण याबद्दल आम्हा शिक्षकांना तरी परीक्षा ऑफलाईन पध्दतीनेच व्हायला हव्या आहेत. उद्यापासुन कॉलेज सुरू होण्यार असल्याने वर्गांचे सॅनिटायझेशन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, थर्मामीटर अशा सर्व सुविधांचे नियोजन कॉलेजडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत जाणुन घेण्यासाठी त्यांना आम्ही गुगल फॉर्म्स भरून घेतले आहेत. आता उद्या मुलं कॉलेजमध्ये आली की प्रत्यक्षीत काय होतं हे पाहावं लागेल."
याशिवाय मुंबईतील साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य राजवाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "खरंतर लसीकरणासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी पात्र आहेत. या मुलांचा अभ्यासक्रम पुर्ण झाला असुल त्यांच्या आता परीक्षा सुरू आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांना आम्ही कॉलेजमध्ये बोलावणारच नाही आहोत. उद्यापासुन फक्त पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच आम्ही बोलावले आहे. अठरा वर्षांखालील वयोमान असल्याने ते असेही लसीकरणासाठी पात्र नाहीत. त्यामुळे शासन निर्देशांप्रमाणे ५० टक्के क्षमतेनुसार एक दिवस आड कॉलेज सुरू ठेवणार आहोत."
याच संदर्भात आम्ही उल्हासनगर येथील एस.एस.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य के.सी. पुरस्वानी यांना संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, "शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार आम्ही ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देणार आहोत. ज्यांचे लसीकरण पुर्ण नाही झालेलं त्यांचं वेगळं नियोजन करून लेक्चर्स घेऊ. शिवाय उल्हासनगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण कॅम्पचं आयोजन देखील करणार आहोत."
विद्यार्थ्यांचे म्हणणे काय?
कॉलेज सुरू होण्याबद्दल आम्ही काही विद्यार्यांकरशी देखील संपर्क साधला असता एका विद्यार्थीनीने आम्हाला सांगितले, "मी सध्या एस.एस.टी. महाविद्यालयातून पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. मी कोव्हॅक्सीन लसीचा एक डोस देखील घेतला आहे. आम्हाला २० ऑक्टोबर पासुन कॉलेज सुरू होणार असल्याबद्दल काहीच सांगण्यात आलेलं नाही. आम्ही याबद्दल प्राध्यापकांना विचारणा केली असता त्यांच्याकडून दिवाळी नंतर कॉलेज सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कॉलेज सुरू होण्याची मला सुध्दा उत्सुकता लागली आहे."
आणखी एका विद्यार्थीनीने आमच्याशी बोलताना सांगितले की, "मी जोशी – बेडेकर महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. माझं लसीकरण देखील पुर्ण झालेलं आहे. कॉलेजमधुन मला पालकांचा ना हरकत फॉर्म ऑनलाईन भरून मागितला होता. तो मी भरून दिला परंतू त्यानंतर मला अजुनही कॉलेजमधून कोणताही मेसेज आलेला नाही. तसंही लवकरच आमची परीक्षा देखील ऑनलाईनच होणार आहे."
शासनाची बाजू काय ?
या संदर्भात शासनाची बाजू जाणण्यासाठी आम्ही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू तांत्रिक अडचणींमुळे तो होऊ शकला नाही. जेव्हा केव्हा आमचा त्यांच्याशी संपर्क होईल तेव्हा त्यांची बाजू आम्ही या बातमीत अपडेट करू.
महाविद्यालयांच्या माहितीनुसार असंच दिसुन येतं की ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झालेलं नाही त्यांच्या शिक्षणाबद्दल काय करायचं या बद्दल शासनाकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. कॉलेजेसनी आपापल्या परीने लसीकरण पुर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर्सची व्यवस्था केली आहे.