मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त जाहीर केलेले गाव कोरोनामुक्त नव्हतंच!

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोनामुक्त गावाची नावं जाहीर केली होती. मात्र, अंत्रोळी गावात कोरोनाचे रुग्ण असताना मुख्यमंत्र्यांनी हे गाव कोरोनामुक्त कसं जाहीर केलं असा सवाल गावकऱ्यांनीच उपस्थित केला आहे? वाचा काय आहे सर्व प्रकरण...

Update: 2021-06-12 07:55 GMT

कोरोना मुक्तीच्या संदर्भाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधित करताना सोलापूर जिल्ह्यातील अंत्रोळी गावच्या सरपंच कोमल करपे व मोहोळ तालुक्यातील घाटणे गावचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी गाव कोरोना मुक्त केल्याने कौतुक केले होते. त्यामुळे ही गावं राज्यात कोरोना मुक्तीच्या फॉर्म्युल्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती. या दोन तरुण सरपंचांनी गाव कोरोना मुक्त करण्यासाठी आखलेल्या योजना महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतीनी आखाव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्र्यांनी घाटणे गावचे कौतुक केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात या गावाची चर्चा झाली. मात्र, गाव कोरोना मुक्त झालं आहे. हे प्रशासनालाच माहिती नसल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात आम्ही गावातील लोकांशी बातचीत केली असता सरपंच ऋतुराज देशमुख प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधी गटाने मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केला आहे. तर हे आरोप खोटे आहेत. असं सरपंच ऋतुराज देशमुख म्हणाले की, आरोप राजकीय हेतूने करण्यात येत असून त्यात काही तथ्य नाही.

या सर्व प्रकरणा संदर्भात आम्ही मोहोळचे गटविकास अधिकारी यांच्याशी बातचीत केली ते म्हणाले कोरोनाची प्रक्रिया ही सतत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चालणारी आहे. शासकीय यंत्रणेने घाटणे गाव कोरोना मुक्त झाले आहे असे म्हटलेले नाही किंवा तसा अहवाल ही दिलेला नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी हे गाव कोरोना मुक्त झालेले नसताना कोणत्या माहितीच्या आधारे हे गाव कोरोना मुक्त झालं आहे. अशी घोषणा केली?

असा सवाल आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना केला असता, कदाचित माध्यमात आलेल्या बातम्यांच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी घाटणे गावचे कौतुक केले असावे. असं गटविकास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

या सर्व गोंधळाबाबत आम्ही नरखेड आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. बंडगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घाटणे गावची लोकसंख्या ९५३ असून एकूण घर/कुटुंबे २०० आहेत. या गावात सध्या १४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. गावातील वय वर्षे ७४ वयाच्या व्यक्तीचा ८ जून ला सोलापूर येथील गंगामाई हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला आहे.

त्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन या गावात आजही 14 रुग्ण Active आहेत. तसंच गेल्या तीन दिवसांपुर्वी या गावात एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. तसंच शासनाच्या अधिकाऱ्याने असा कोणताही अहवाल मुख्यमंत्र्यांना दिलेला नसताना हे गाव कोरोनामुक्त कसे झाले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

काय आहे सर्व प्रकरण?

या सर्व गोंधळामुळे सध्या मोहोळ तालुक्यातील घाटणे गाव सध्या महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. गाव कोरोना मुक्त करण्यासाठी पंचसूत्री योजना आखून गाव कोरोना मुक्त केल्याचा दावा सरपंच ऋतुराज देशमुख करीत आहेत. तर विरोधी गटाकडून गावात पंचसूत्री योजना राबवली गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

विरोधी गटाचा आरोप होता की, सरपंचाने गावात सॅनिटायझरची फवारणी केली नाही. गावात काही मोजक्याच लोकांना मास्क व सँनिटाझरचे वाटप केले असून कोविड लसीकरणात दुजाभाव केला आहे. गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून घाटणे गाव कोरोना मुक्त झाले नसल्याचा दावा घाटणे गावचे ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत.

घाटणे गावात कोरोनाचे रुग्ण असतानाही गाव कोरोना मुक्त झाले अशी खोटी बातमी प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्र्यांना दिली असून मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्या वतीने चौकशी करावी. गावात रुग्ण असतानाही सरपंचाने आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खोट्या जाहिराती व्हिडिओ, फोटो, मुख्यमंत्र्यांना पाठवून खोटे बोलण्यास भाग पाडले आहे. गावात रुग्ण असताना सरपंच गावकऱ्यांच्या जीवाशी खेळले आहेत. अशी खोटी प्रसिध्दी करून सरपंच व ग्रामसेवक यांनी गावची बदनामी केली आहे. असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

या संदर्भात प्रमोद सावंत यांच्याशी आम्ही बातचीत केली ते सांगतात...

घाटणे गावच्या ग्रामपंचायतने जो पंच सुत्री कार्यक्रम राबवला म्हणून मुख्यमंत्री कार्यालय प्रशासनाची खोट्या बातम्या देऊन फसवून केली आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे. या पंचसुत्रीमध्ये सरपंचांनी सांगितलं होतं की, नागरिकांना कोरोना सेफ्टी कीट दिलं. त्या व्हिटॅमीनच्या गोळ्या, विलगीकरण कक्ष, बाहेर आलेल्या लोकांचं रॅपीड टेस्ट मात्र, प्रत्यक्षात असं काहीही झालेलं नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला 30 मे ला घाटणे गावचं कौतुक केलं. आणि त्यामध्ये सांगितलं की पंचसुत्री वापरुन गाव कोरोनामुक्त केलं. हे सगळं टीव्हीवर पाहिल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की, मात्र, असं काही झालंच नाही. गावात वेळोवेळी फवारणी केली आहे. त्यामुळं आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली.

त्यावेळी गावच्या सरपंचांनी सांगितलं की, आम्ही हे फक्त फोटोबाजी आणि प्रसिद्धसाठी केलं आहे. आणि तुम्हाला जे काही आमच्या विरुद्ध कारवाई करायची आहे. तुम्ही आमच्या विरुद्ध खोटं काही करु शकतात. तुम्ही बिनधास्त करा. आमचं कोणी काहीही करु शकत नाही. विशेष म्हणजे गावात कोरोनाचे 4-5 कोरोना रुग्ण होते. सरपंच, ग्रामसेवकाने त्यांच्या प्रसिद्धीसाठी कोरोना रुग्णांना कोरोनाच्या टेस्ट देखील करु दिल्या नाहीत. त्यांच्यावरती दबाव आणला. आमचं मुख्यमंत्र्यांच्या तोंडून जे कौतुक झालंय. त्याच्यामुळं तुम्ही कोरोना टेस्ट करु नका. आमचं नाव खराब होईल. असा दबाव आणला आहे.

तीन दिवसांपुर्वीच गावातील एक रुग्ण कोरोनाने दगावला आहे. तरी या सर्व प्रकरणात सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्य़ात यावी अशी मागणी प्रमोद सावंत या ग्रामस्थाने केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोनामुक्त गावाची नावं जाहीर केली होती. मात्र, अंत्रोळी गावात कोरोनाचे रुग्ण असताना मुख्यमंत्र्यांनी हे गाव कोरोनामुक्त कसं जाहीर केलं असा सवाल गावकऱ्यांनीच उपस्थित केला आहे? वाचा काय आहे सर्व प्रकरण...

एकंदरीत प्रशासनाची व गावकऱ्यांची दिशाभूल करून सर्व काही खोटे केले असल्याचा आरोप सरपंचावर विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. सरपंच व ग्रामसेवक यांची प्रशासनाने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी घाटणे गावचे ग्रामस्थ शासकीय कार्यालयीन वेळेत मोहोळ पंचायत समितीच्या आवारात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत.

या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य खेलू दिगंबर माने,लक्ष्मण बनसोडे, समाधान गायकवाड,किरण देशमुख,सचिन शिराळ,मलिकार्जुन कारंडे,गुंडीबा बनसोडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

Tags:    

Similar News