डिसले गुरूजींवरील कारवाई टळणार? मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष
ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजीत डिसले यांच्याविरोधात सोलापूर जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने डिसले गुरूजींवर कारवाई होणार की त्यांना क्लीनचीट मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.;
जागतिक पातळीवरील ग्लोबल टीचर अवार्ड जिंकत रणजित डीसले गुरुजी रातोरात स्टार झाले...पण त्यांना मिळालेला ग्लोबल टीचर अवार्ड आणि त्यांच्या कामाबाबत संशय असल्याचे सांगत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांची चौकशी सुरू केली. या चौकशी समितीचा अहवाल तयार झाला असून असून डीसले गुरुजी कामावर हजर नसतानाही पगार घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्याकडून 17 लाख रुपये वसूल करण्यात यावेत,अशी शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान डीसले गुरुजी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून अद्याप त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. कारवाई होण्याच्या भीतीने आणि लोकांची सहानभुती मिळवण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. रणजीत डिसले यांनी या सर्व वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण मॅक्स महाराष्ट्रने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सर्व आरोप फेटाळले आणि अमेरिकेला जाण्याआधी आपण सर्व आरोपांची पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान डिसले गुरूजी ३ वर्ष कामावर नव्हते तर संबंधित मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांनी एवढी वर्षे गप्प का बसले, असा सवालही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत आबा शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान एकीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने डिसले गुरूजींवर कारवाईची तयारी सुरू केली असताना डिसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्य़ांनी याप्रकरणात लक्ष घालत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच जागितक पातळीवरील पुरस्कार विजेत्या शिक्षकावर कारवाई करताना त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे आणि विनाकारण कारवाई होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. डिसले गुरूजींनी याबाबत आपली भूमिका मांडलेली नाही, पण आता राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घातल्याने डिसले गुरूजींचा फैसला लवकरच होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.