घाण उपसताना अंगावर आळ्या- किडे यायचे, तरी कर्तव्ये बजावत आलो.....
एका बाजूला स्वच्छ भारत अभियाना देशभर गाजावाजा होत असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत मध्ये ४० वर्षे सफाई कामगार म्हणून काम करणारे हिरामण शिंदे आणि त्याचे सहकारी कामगार यांनी ठेकेदारी पद्धतीने काम करण्यास विरोध दर्शवला असता त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने कामावरून काढल्याने या सफाई कामगारांची वाताहत होऊन त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे, आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट....
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत मध्ये ४० वर्षे सफाई कामगार म्हणून काम करणारे हिरामण शिंदे आणि त्याचे सहकारी कामगार यांनी ठेकेदारी पद्धतीने काम करण्यास विरोध दर्शवला असता त्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने कामावरून काढल्याने या सफाई कामगारांची वाताहत होऊन त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.
एकीकडे शासन स्वच्छता अभियान राबविण्याच्या मोठमोठ्या वल्गना करताना दिसून येते. तर दुसऱ्या बाजूला या मिशनच्या शिलेदारांवर अन्यायकारक भूमिका घेत असल्याचे भयानक चित्र वडखळ ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळत आहे.
रस्त्यावरील घाण, कचरा साफ करून तुटपुंज्या पगारावर काम करून आपली हयात प्रामाणिक सफाई कामगार म्हणून ज्या वडखळ ग्रामपंचायतमध्ये घालवली त्याच ग्रामपंचायतीने त्यांच्यावर आज उपासमारीची पाळी आणली आहे. कोणतीही अत्याधुनिक साधने नसताना जीवावर उदार होऊन आजार व रोगराईला कवटाळून सर्वप्रथम कर्तव्याला महत्व दिले. प्रामाणिक पणे सेवा केल्याचे हे फळ आमच्या वाट्याला आले अशी व्यथा हिरामण शिंदे या सफाई कर्मचाऱ्याने मांडली.
महागाई वाढली आहे, कसं जगावं असा प्रश्न आहे, मुलांची लग्न कर्ज उसनवारी काढून केली, आता डोक्यावरील कर्जाचा बोजा कसा उतरावा हा प्रश्न सतावत आहे, पैसे घ्यायला लोक घरी येतात, काय करणार, या सर्वांना कस तोंड देणार? घर संसार चालावा यासाठी घरमालकीन हातभार लावते, लोकांची धुणीभांडी करून त्यातून येणाऱ्या मोबदल्यातून या महागाईत दिवस ढकलत आहोत. यापुढील दिवस कसे असतील हे विचार करून अंगावर काटा येतो.
गरज सरो, आणि वैद्य मरो अशी अवहेलना झाली आहे गोरगरीब कष्टकरी सफाई कामगारांची. उभं आयुक्ष स्वच्छ व सुंदर गाव राखण्यासाठी खर्च करून शेवटीअखेर वाट्याला अपमानास्पद वागणूक आली, कोरोनासारख्या महामारीत जगण्याची उमेद सम्पली असताना आम्ही यामध्ये मोठ्या हिमतीने टिकून राहिलो, पण आता पुढे काय, आणि कुटुंबाच कसं होणार अशी वेदना सफाई कर्मचारी हिरामण शिंदे यांनी मॅक्समहाराष्ट्र जवळ बोलताना व्यक्त केलीय.
यासंदर्भात आम्ही सरपंच राजेश मोकल यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्र मोठे असून योग्यशिरपद्धतीने स्वच्छता राखली जावी यासाठी आम्ही टेंडर पद्धतीने ठेकेदारांची नेमणूक केली, व त्यांच्या माध्यमातून साफसफाईचे काम केले जातेय. जनतेच्या तक्रारी कमी व्हाव्यात , कामे वेळेत व्हावीत यासाठी ही ठेकेदारी पद्धत्ती अवलंबली आहे.