चायनीज विक्रेत्यांची महागाईमुळे कोंडी, ग्राहक रोडावल्याने स्टॉलधारक अडचणीत
देशात महागाई रोज नवा उच्चांक गाठत आहे. या महागाईचा हॉटेल व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे. त्यातच जीभेचे चोचले पुरवण्यासाठीचे चटपटीत पदार्थ असलेल्या चायनीज व्यवसायावरही महागाईचा गंभीर परिणाम झाला आहे. मात्र यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा स्पेशल रिपोर्ट...;
वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. तर आता व्यावसायिक, व्यापारी यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून व्यवसायात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चायनीज पदार्थ खाण्यासाठी नागरिकांची रीघ लागलेली असायची. या व्यवसायिकांचा धंदाही तेजीत होता. पण दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचा या धंद्यावर परिणाम झाला आहे, असे चायनीज व्यवसायिक सुरज चव्हाण सांगतात.
चायनीज पदार्थ बनवण्यासाठी खाद्य तेल हा घटक महत्वाचा आहे. या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत चालली आहे. चायनीज पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सॉस, तांदूळ, चिकन, कोथिंबीर, कोबी आणि मसाल्यांच्या किंमतीत वाढ होत चालली आहे. चायनीज पदार्थ गॅसवर बनवले जात असल्याने गॅस च्या वाढत्या किंतीचाही या धंद्यावर परिणाम झाला आहे. तसेच चायनीज पदार्थ बनवणाऱ्या वस्तादांच्या आणि कामगारांच्या पगारात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने या चायनीज पदार्थांच्या धंद्यावर आर्थिक संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे चायनीज व्यवसायिकांनी चायनीज खाद्य पदार्थांच्या किंमतीत वाढ केली आहे. मात्र आता पुर्वी चायनीज पदार्थ खाण्यासाठी स्टॉलवर जेवढी गर्दी जमायती ती आता जमत नाही. त्यामुळे व्यवसाय संकटात सापडल्याचे मत सुरज चव्हाण यांनी सांगितले.
लॉकडाऊनचा चायनीज धंद्यावर परिणाम
कोरोना महामारीचा चायनीज व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला होता. कोरोना काळात लोक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे कोरोना काळात ग्राहकच नसल्यामुळे चायनीज व्यवसायावर त्याचा परिणाम झाला होता. तसेच या काळात अनेकांचे रोजगार गेल्याने चायनीजच्या स्टॉलकडे वळणारी पाऊले कमी झाली. तर त्यानंतर आता पुन्हा महागाईने डोकं वर काढल्याने त्याचा चायनीज व्यवसायावर गंभीर परिणाम दिसत आहे.
ग्राहक रोडावण्याची काय आहेत कारणे?
कोरोनानंतर सावरत असतानाच महागाईचा दर वाढत गेला. त्यामुळे भाज्या, गॅस, यांच्या दरातही वाढ झाली. त्यामुळे त्याचा परिणाम किंमतीवर झाला. तसेच 50 ते 60 रुपयांना मिळणारे चायनीज पदार्थ तब्बल 150 रुपयांवर जाऊन पोहचले. त्यामुळे चायनीजच्या दरात तिपटीने वाढ झाल्याने नागरिकांनी चायनीजकडे पाठ फिरवली, असे मत सुरज चव्हाण यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले.
१) कोरोनाचा धोका टळला नसल्याची भावना
राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवले असले तर अजूनही कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे ज्या लोकांचे रोजगार गेले आहेत. ते पैसा जपून वापरु लागले आहेत. तसेच चटपटीत पदार्थ खाणे कमी केले आहे. तसेच जे लोक नव्याने पैसा कमावू लागले आहेत. त्यांना महागाईमुळे चायनीज परवडत नाही. तसेच पुन्हा लॉकडाऊन झाले तर काय करायचे त्यामुळे अनेकांनी पैसे वाचवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती ग्राहकांनी दिली.
२) चिकनसह इतर वस्तुंही महागल्या
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना चायनीज व्यवसायिक सूरज चव्हाण याने सांगितले की,वाढत्या महागाईमुळे चायनीज पदार्थ खाण्यासाठी ग्राहक येईना गेले आहेत. महागाई खूपच वाढली आहे. सगळ्याच वस्तूंचे भाव वाढले आहेत. खाद्य तेल,गॅस टाकी,तांदूळ,सॉस,कोबी आणि मसाल्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. भाज्यांच्या किंमती सतत कमी-जास्त होत आहेत. चायनीज पदार्थांसाठी आवश्यक असणाऱ्या कोंबडीच्या चिकनच्या किंमतीत वाढ होत चालली आहे. पूर्वी चिकनचा दर 170 रुपये किलो होता. तर आता 260 रुपयांच्या आसपास गेला आहे. तांदूळ पूर्वी 70 रुपये किलो होता. तो आता 85 रुपये किलो झाला आहे. तांदळाच्या किंमतीत 15 रुपयांनी किलोमागे वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी खाद्य तेलाची किलोमागे 110 रुपये किंमत होती. तीच आता 180 रुपये ते 200 रुपयांच्या आसपास पोहचली आहे. आता कोणतेच मटेरियल स्वस्त राहिले नाही. या धंद्यात काहीसुद्धा राहिले नाही, अशी खंत सुरज चव्हाण यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना सुरज चव्हाण म्हणाले, पूर्वी या धंद्यात 25 टक्के फायदा होत होता. आता या व्यवसायात काहीच फायदा राहिला नाही. कामगारांचा पगार,गाळा भाडे,वस्ताद यांचा पगार वाढल्याने मालकाला काहीच शिल्लक राहत नाही. महागाई वाढल्याने ग्राहक कमी झाले आहेत. महागाईचा ग्राहकांवर खूपच परिणाम झाला आहे. चायनीज पदार्थांमध्ये ट्रिपल राइस, लॉली पॉप, लेगपीस, चिकन 65, मच्छी फ्राय, अंडा फ्राय, अंडा आम्लेट, अंडा राइस तर व्हेज मध्ये व्हेज लॉली पॉप, व्हेज नूडल्स, व्हेज ट्रिपल राइस, व्हेज 65, व्हेज मंचुरीयन बनवले जाते. हे पदार्थ बनवण्यासाठी खाद्य तेल हा घटक महत्वाचा आहे. दिवसाला 7 ते 8 किलो खाद्य तेल लागते. महागाईमुळे 30 ते 40 टक्के ग्राहक कमी झाले आहेत. जो धंदा लॉकडाऊन च्या अगोदर होत होता, तो आता होत नाही. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारने महागाईवर नियंत्रण आणावे, असे चायनीज व्यवसायिक सुरुज चव्हाण ला वाटत आहे.
३) चायनीजच्या दरात तिप्पट वाढ
लॉकडाऊन च्या अगोदर चायनीज पदार्थांचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे होते. त्यामुळे चायनीज पदार्थ खाण्याकडे लोकांचा ओढा असायचा. चायनीज गाड्यावर किंवा दुकानात गर्दी पहायला मिळायची. ती आता पाहायला मिळत नाही. पूर्वी ट्रिपल राइस 60 ते 70 रुपयांच्या आसपास मिळत होता. पण आता महागाई वाढल्याने याच्याही दरात वाढ झाली आहे. फुल ट्रिपल राइस 180 रुपयाच्या आसपास विकला जात आहे. मंचुरीयन च्या दरात वाढ झाली असल्याचे पहायला मिळते. चायनिजच्या सर्वच पदार्थांमध्ये सध्या दरवाढ झाली आहे. सर्वसामान्य लोक ज्या आवडीने चायनीज गाड्याकडे येत होते. ते आता कमी प्रमाणात येत आहेत. लॉक डाऊन चा परिणाम सर्वसामान्य लोकांवरच जास्त झाल्याचे दिसते. या लॉक डाऊन आणि कोरोनाच्या महामारीतून चायनीज व्यवसायिक ही सुटलेले नाहीत.