Special Report : शिवसेनेच्या हातातून मुंबई महापालिका जाऊ शकते का?
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राज्यात नवीन समीकरण उदयास येऊन आता वर्ष लोटले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीतील राजकीय गणितं कशी राहू शकतात याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांचा स्पेशल रिपोर्ट.... Challenges before Shivsena for BMC election, a Special report;
मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांपासून म्हणजेच 1996 सालापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र 2022 मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आणि राजकीयदृष्ट्याही महत्वाची आहे. ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी वेगळी आहे. जरी निवडणूक 2022 मध्ये असली तरी चर्चा आतापासून सुरु झालीय. बिहार विधानसभा असो किंवा हैदराबाद महापालिका निवडणूक असो भाजपने ताकदीमध्ये भाजपने आपले सर्वस्व पणाला लावलं आहे.
मुंबई महापालिका निवडणूक
हैदराबाद महापालिका निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर भाजपचे पुढील लक्ष मुंबई महापालिका आहे. देशातली सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये जरी असली तरी चर्चा आणि राजकीय पक्षांची तयारी आतापासून सुरु झालीय. मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या महत्त्वाच्या महापालिका निवडणुका येत्या काळात होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट 30 हजार कोटींच्यावर आहे. हे बजेट काही राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. देशातली सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे पाहिलं जातं.
मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेकडे 92 जागा, भाजप 82 जागा, काँग्रेस 31 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 9 जागा आहेत. २०१७ ला झालेल्या निवडणुकीत राज्यात भाजप - शिवसेना युती असली तरी देखील मुंबई महानगर पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. पण निवडणुकीनंतर शिवसेनेला बहुमतासाठी भाजपने पाठिंबा जाहीर केला. पण आता राज्याचे राजकीय गणित बदलले आहे. महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे मुंबईच तिन्ही पक्षांचे गणित कसे जुळणार याची चर्चा होतेय.
महाविकास आघाडी एकत्र लढली तर काय?
राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर पहिलीच निवडणूक विधानपरिषदेची झाली. ही निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढवली. यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यामुळे हाच फॉर्म्युला 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत वापरला जाईल का अशी चर्चा आहे. पण यावर महाविकास आघाडीतील काही नेत्यांमध्येच मतभेद असल्याचे दिसते आहे.
शिवसेनेची भूमिका काय?
याबाबत शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांनी सांगितले की,
"याचा निर्णय पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे घेतील. त्याबद्दल मी बोलणार नाही पण, शिवसेना मुंबईत 24 तास कार्यरत असते. फक्त निवडणूक आली म्हणून आम्ही काम करत नाही, आम्ही कायमच मुंबईकरांच्या सेवेत असतो. मुंबईमध्ये आमच्या प्रत्येक वॉर्डमध्ये शाखा आहेत. आमचे नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी सतत त्या -त्या भागात काम करत असतात." असे सांगत त्यांनी आगामी रणनीतीवर बोलणे टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले की, "मुंबई महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजप मुंबईमधून हद्दपार होईल. अनेक पक्ष एकत्र लढल्यास बंडखोरी होते हे खरं असले तरी या निवडणुकीत चित्र वेगळं आहे. या निवडणुकीत रोष भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आहे. मुंबईमध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक स्वतः काम करत आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांची पकड आहे."
काँग्रेसची भूमिका काय?
"मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडी सोबत न लढता स्वबळावर लढवणार आहे. याची तयारी म्हणून आम्ही १०० दिवस १०० वार्ड अशी पदयात्रा सुरु केली आहे. मुंबई महापालिकेचा महापौर आमचा असेल किंवा आमच्याशिवाय दुसरा कोणीही बसवू शकत नाही याची खात्री आम्हाला आहे. आम्ही दिलेला स्वबळाचा नारा २०२२ पर्यंत असाच राहणार आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप असल्यामुळे पक्षामध्ये उत्साह आहे. आम्ही स्वतंत्र लढलो तरी महाविकास आघाडीमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. कारण भाजप आणि शिवसेना ज्यावेळी राज्यात सत्तेत होते तेव्हादेखील वेगवेगळे लढले होते. त्यामुळे एकत्र लढणं आवश्यक वाटत नाही, कारण जागावाटपात सर्वच पक्ष आपापल्या जागा सांगणार यामध्ये पेच निर्माण होऊ शकतो. एकत्र लढण्याबाबत २०२२ पर्यंत पक्षश्रेष्ठींचा आदेश आला तर त्या निर्णयाचं आम्ही पालन करू पण आम्ही आमचा स्वबळाचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिली आहे.
भाजपची रणनीती काय?
भाजपचे आमदार अतुल भातखळकर सांगतात की, "मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे लढली तरी यावेळी भारतीय जनता पार्टी एकहाती भगवा फडकवायला तयार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाची कारणे वेगळी आहेत. त्यांचा संबंध या निवडणुकीशीही जोडणं चुकीचं ठरेल."
महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजपला फायदा होईल का?
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली आणि या निवडणुकीत त्यांना मोठं यश देखील मिळालं. मात्र येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत गणितं बिघडू शकतात, कारण अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत चलबिचल झाल्याची उदाहरणे आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलाय. पण २०२२ पर्यंत गणितं बदलू शकतात. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. मात्र येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध तीन पक्ष आहेत. त्यामुळे याचा भाजपला फायदा होणार की तोटा यासंदर्भात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सांगतात की,
"स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल पाहिले तर एकत्र लढल्यावर तिन्ही पक्षाला फायदा झालेला दिसतो. मुंबई शहरी क्षेत्र असल्यामुळे इथे गणितं बदलू शकतात. गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने आहेत ते एकवटतील आणि मोठ्या प्रमाणात मतदान करतील. मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तो या निवडणुकीकडे कसं बघतो हे देखील विचारात घेतलं पाहिजे. १९९२ च्या दंगलीला जी शिवसेना मुस्लिम समाजाच्या विरोधात शत्रू म्हणून उभी राहिली तीच शिवसेना आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेवर आहे. भाजप या निवडणुकीत दंगलीचे मुद्दे काढून हिंदू मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल. मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्यात सर्वात मोठं संकट आहे ते जागावाटपाचे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद इतर दोन पक्षांपेक्षा तुलनेने कमी आहे. मात्र सरकारच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जास्त जागांसाठी अपेक्षा असणार. त्यामुळे शिवसेनेला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. जागावाटपात खूप मोठा पेच निर्माण होऊ शकतो. महाविकास आघाडीतील प्रत्त्येक पक्षाने स्वतंत्र लढून ए आणि बी श्रेणीच्या जागा असलेल्या शिवसेनेचे जिथे सध्याचे नगरसेवक आहेत, तिथे परस्पर उमेदवार न देता जिथे काही फरकाने पराभव झाला आहे, तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जागा देऊन तडजोड केली तर चित्र वेगळं असेल. कारण जागावाटप करायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस ३० ते ४० जागा मागेल, काँग्रेस देखील दुप्पट जागांची मागणी करेल. त्यामुळे शिवसेनेसमोर हा पेच निर्माण होऊ शकतो."
याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे की,
"मुंबई महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर त्याचा फायदा होईल. मात्र बंडखोरी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मुंबईमध्ये स्वतंत्रपणे प्रत्येक पक्षाची ताकद पाहिली तर काँग्रेसचा परप्रांतीय मतदार भाजपकडे वळला आहे. दलित, मुस्लिम आणि परप्रांतीय वोट बॅंक काँग्रेसची आहे. जर (एआईएमआईएम) ने निवडणुका लढवल्या तर मुस्लिम मातांची विभागणी होऊ शकते. मुंबईमध्ये नवाब मलिक, अस्लम शेख यांची वोट बॅंक सुरक्षित राहील की नाही याची शाश्वती नाही. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही. महाविकास आघाडी एकत्रितपणे लढतायत की नाही हे स्पष्ट नाही. मात्र शिवसेनेला स्वबळावर लढण्यापेक्षा एकत्रितपणे लढणे फायद्याचं होईल. दुसरं म्हणजे मनसे काय करते, मनसे भाजपसाठी पडद्यामागची भूमिका घेईल की थेट भूमिका घेईल हे अजूनही सांगता येत नाही. सध्या तर मनसेने भाजपविरुद्ध सौम्य टीकेची भूमिका घेतली आहे."
भाजपची हैदराबादची रणनीती मुंबईत चालणार का?
हैदराबाद निवडणुकीत 5 जागा मिळवणाऱ्या भाजपनं 46 जागांवर विजय मिळवला. भाजपची केंद्रातील सर्व टीम या निवडणुकीत उतरली होती. या निवडणुकीत देखील धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पाहायला मिळालं. हैदराबाद निवडणुकी दरम्यान भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी रोहिंग्या मुसलमानांचा मुद्दा उपस्थित केला होता. हैदराबादमध्ये रोड शोदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे, अशी घोषणा केली. निवडणुकीचे निकाल पाहता भाजपने केलेल्या प्रचावर भाजपची आकडेवारी वाढलेली दिसली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची काय रणनीती असेल, कोणते मुद्दे उचलले जातील याबाबत संदीप प्रधान सांगतात,
"हैद्रबादप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांची फौज मुंबई महापालिका निवडणुकीत देखील येणार. अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्या सभा मुंबईला होतील. मोदींच्या प्रेमात असलेला वर्ग या निवडणुकीकडे कसं बघतो हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. सेनेचा हार्डकोअर मतदार आहे सेनेबरोबर राहील. त्याला आपल्या सोबत ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत. मनसे आणि भाजप या निवडणुकीत परस्पर पूरक राजकारण करतील. भाजपला मनसे बरोबरची युती फायदेशीर ठरणार आहे.
यासंदर्भात आम्ही जेव्हा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की,
" मुंबई महापालिकेच्या २२७ जागा लढवण्यासाठी मनसे तयार आहे. प्रत्येक वार्डनुसार आमच्या बैठका घेऊन काम सुरु आहे. आम्ही मराठी मते खाण्यासाठी उभं राहत नसून आमची मते मिळवण्यासाठी उभे आहोत, कारण शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला लोकं कंटाळलेली आहेत. आम्ही भाजपविरुद्ध सौम्य भूमिका घेतली नसून जो सत्ताधारी पक्ष आहे त्यालाच आम्ही प्रश्न विचारू मग शिवसेना असो किंवा भाजप. आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू. भाजपसोबत युती करण्याबाबत आता तशी वेळ नाही आम्ही २२७ जागांची तयारी करतोय."
निवडणुकीत ध्रुवीकरणाचं राजकारण पाहायला मिळेल का?
भाजप आमदार अतुल भातखळकर सांगतात की,
"हैदराबादमध्ये धर्म, जात, ध्रुवीकरण यावर भाजपने निवडणुका लढवल्या नाही. हैदराबाद निवडणूक आम्ही स्थानिक मुद्द्यांवर लढवली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेचा भ्रष्ट कारभार, रस्ते, पाणी, पावसाळ्यात मुंबई तुंबणं अशा सर्व स्थानिक मुद्द्यांवर लढणार आहोत. शिवसेनेने कोरोनाकाळात जो भ्रष्टाचार केला त्याच्या संदर्भातलं पुस्तक आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. तिन्ही पक्ष एकत्र आले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचं ध्रुवीकरण होणार नाही. मुंबईतील जनता शिवसेनेच्या भ्रष्ट कारभार आणि अकार्यक्षमतेला विटलेली आहे. त्यामुळे समर्थ पर्याय भाजप असेल."
इतर ठिकाणी झालेल्या काही निवडणुकांच्या प्रचारातील मुद्द्यांवर लक्ष घातले तर सर्जिकल स्ट्राईक, बांगलादेश, मुसलमान, पाकिस्तान, चीन असे मुद्दे गाजले. त्यामुळे हैदराबाद प्रमाणे येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत नवीन कोणते मुद्दे असणार की याच मुद्द्यांवर जोर दिला जाईल याबाबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, "शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ध्रुवीकरणापेक्षा स्थानिक प्रश्नांना महत्व येणार आहे. मुंबईसारख्या शहरात धर्म आणि जातीकडे न पाहता मुंबईच्या स्थानिक प्रश्नांना महत्व दिलं जाईल. यावेळची निवडणूक वेगळी आहे, कारण शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे भाजप जोरदारपणे कामाला लागलाय. आशिष शेलार, भालचंद्र शिरसाठ,अमित साटम या भाजपच्या नेत्यांना मुंबई महापालिका बाहेरून-आतून माहिती आहे. शिवसेनेच्या काळातील स्कॅम, गैरकारभार बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न भाजप करेल. त्यासंबंधीचं पुस्तक देखील ते काढणार आहेत. या सर्वाला तोंड देण्यासाठी शिवसेनेला जबरदस्त तयारी करावी लागेल."
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे सांगतात,
"भाजप निवडणुकीत ध्रुवीकरण करण्यात माहीर आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करायचं हीच भाजपची खेळी आहे. जरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी लोक विकासाच्या बाबतीत आमच्यासोबत राहतील. (MIM) बाबत महाराष्ट्रच्या जनतेला माहित आहे (MIM) ही भाजपची बी टीम आहे."
काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे सांगतात की,
"भाजपचे ध्रुवीकरणाचे दिवस संपले आहेत. भाजपने इतके दिवस ध्रुवीकरण करून निवडणूक लढवली आहे. राम मुद्यावरून भाजपने मतं घेतली आता राममंदिर पूर्ण झाल्यामुळे इथे ध्रुवीकरणाचा प्रश्न येत नाही. मुंबईसारख्या शहरात ध्रुवीकरणाला जास्त महत्व दिलं जाणार नाही. (MIM)चा प्रभाव मुंबईमध्ये फारसा नाही. (MIM) हे भाजपचे दुसरे रूप आहे. भाजप आणि (MIM) एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. (MIM) ला मतं देणं म्हणजे भाजपला विजयी करणे असं आहे.
दलित, वंचित मतदार यापूर्वी काँग्रेसकडे होता मात्र तो आता मोठ्या प्रमाणात वंचित आघाडीकडे वळला आहे. दलित, वंचित मतदार काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. त्याला पुन्हा आमच्याकडे वळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."
एकूणच भाजपची तयारी पाहता शिवसेनेला मुंबईत महाविकास आघाडीचा प्रयोग करताना अनेक राजकीय जोखीमांचा विचार करावा लागणार आहे.