'कान्स' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या 'पोटरा' चित्रपटाच्या अभिनेत्रीचा संघर्ष
फ्रान्स देशात 17 मे ते 28 मे च्या दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोलापूर जिल्ह्यात तयार झालेल्या 'पोटरा' चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलेली गीता देवकरचा जीवनाचा संघर्ष सुरु असून दहाव्या इयत्तेत शिकणारी गीता मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावी एका ओढ्याच्या कडेला पालाच्या झोपडीत राहत आहे. गीता मरीआईवाले समाजातील असून तिचे आई-वडील डोक्यावर मरीआई या देवीचा गाडा घेऊन गावोगावी फिरत असून लोकांनी दिलेल्या अन्नावर ते दिवस कंठीत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....
फ्रान्स देशात 17 मे ते 28 मे च्या दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोलापूर जिल्ह्यात तयार झालेल्या 'पोटरा' चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटा बरोबर या महोत्सवात 'कारखानीसांची वारी' आणि 'तिच शहर होणं' या दोन चित्रपटांची देखील निवड राज्य शासनाने केली आहे. पोटरा चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर धोत्रे यांनी केले असून या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत गीता देवकर आहे. चित्रपटाचे निर्माते शरद शिंगाडे असून चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तालुका आणि मोहोळ तालुक्यात झाले आहे.
या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलेली गीता देवकरचा जीवनाचा संघर्ष सुरु आहे. ती 10 मध्ये शिकत असून मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावी एका ओढ्याच्या कडेला पालाच्या झोपडीत राहत आहे. गीता मरीआईवाले समाजातील असून तिचे आई-वडील डोक्यावर मरीआई या देवीचा गाडा घेऊन गावोगावी फिरत असून लोकांनी दिलेल्या अन्नावर ते दिवस कंठीत आहेत.
सध्या तिचे वडील अंथरुणाला खिळलेले असून कुटूंबाची जबाबदारी गीताचा भाऊ आणि आईवर येऊन ठेपली आहे. गीता आष्टी या गावातील ओढ्याच्याकडेला राहत असल्याने पावसाळ्यात घरात पाणी शिरते. त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नाहीत. कारण मारीआईवाले समाज पूर्वीपासून भटके जीवन जगत आला आहे. ना त्यांची कोणत्या गावात स्थावर मालमत्ता आहे,ना कोणते उद्योग. सध्या हा समाज एका ठिकाणी स्थायिक होताना दिसत आहे. पण त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोटरा चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली. पण या चित्रपटातील अभिनेत्री च्या डोक्यावर पक्के घराचे छत नाही. दररोज चार घरे मागून आणलेले अन्न ती खाते. तिच्या वाट्याला फक्त दुःख आणि दुःख आले आहे. परस्थिती अतिशय बिकट असतानाही शिक्षण घेऊन काहीतरी बनण्याची तिची इच्छा आहे.
ओढ्याच्या कडेला राहते गीता
फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेले अभिनेत्री चक्क ओढ्याच्या कडेला राहते. त्यांना स्वतःची जागाही नाही. व्यवस्थेमुळे वाट्याला आलेले दुःख सोसत गीता जीवन जगत आहे. मरीआईवाले समाज भटके जीवन जगत असल्याने तिच्या जीवनाला स्थिरता नाही. त्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. गीताचे आई-वडील ही अशिक्षित असून दररोज एक गाव मागून आणून पोट भरावे लागते. मग शिक्षण घेणे तर दूरच असे गीताची मावशी सांगते. आम्ही ओढ्याच्याकडेला राहत असल्याने पावसाळ्यात घरात पाणी येते. त्याचबरोबर गावाच्या उताराला राहतो. त्यामुळे पावसाळ्यात गावातील पाणी या झोपड्यांच्या दिशने येते. पाऊस पडल्यानंतर या झोपड्याकडे जाणे-येणे मुश्किल होते. तेथे जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. ना पाण्याची ना गटारांची. अशा या बिन सुविधांच्या वस्तीत गीता आपले जीवन व्यस्थित करीत आहे. आई-वडिलांबरोबर गावोगावी भिक्षा मागायला गेल्यानंतर या लोकांसारखे आपले जीवन का नाही,असाही प्रश्न तिला पडलाय. हे दुःख आपल्याच वाट्याला का अस तिला वाटतय.
गीताच्या वस्तीत पाणी,गटार,लाइट या सुविधा अभाव
गीता राहत असलेल्या जागेत मरीआईवाले समाजाची 10 ते 15 कुटूंबे राहत आहेत. हा समाज पूर्वीपासून भटके जीवन जगत असल्याने त्यांची कोणत्याच गावात स्थावर मालमता नाही. त्यांचे मूळ गाव कोणते याची माहिती त्यांच्याकडे नाही. आपण मरीआई चा गाडा डोक्यावर घेऊन फिरत असल्याने आपली जातही मरीआईवाले झाली असल्याचे या वस्तीतील नागरिकांनी सांगितले. पण आम्ही नेमके कोणत्या जातीचे आहोत याचीच आम्हाला माहिती नसल्याचे ते सांगतात. पण गावोगावी मरीआई चा गाडा डोक्यावर घेऊन फिरत असल्याने या समाजाला मरीआईवाले समाज हे नाव पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. गीता राहत असलेल्या वस्तीत घाणीचे साम्राज्य आहे. त्याठिकाणी भांडी व इतर साहित्य अस्थाव्यस्त पडल्याचे दिसते. त्याठिकाणी मागून आणलेल्या भाकरीचे वाळवण घातले जाते. या वस्तीत शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा पोहचल्या नाहीत. सध्या त्यांना राहण्यासाठी जागा ही नाही. अत्यंत अडगळीत असणाऱ्या झोपडीत गीता सध्या राहत आहे.
'पोटरा' चित्रपटाची कथा काय आहे
पोटरा चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील मुलींच्या जीवनानावर आधारित आहे. चित्रपटाची कथा गीता भोवती फिरते. गीता किशोरवयीन मुलगी आहे. जी अभ्यासात व इतर उपक्रमात हुशार असते. गीताला मासिक पाळी येताच तिची आजी तिच्या वडिलांना तातडीने वर शोधण्यास सांगते. शेवटी पोटराची कथा एका मार्मिक मुद्यावर येऊन संपते. या चित्रपटाचे शूटिंग सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे दोन महिने चालले. या चित्रपटाला अनेक पुरस्कार पण मिळाले आहेत. पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गीताला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
शिक्षण घेऊन काहीतरी बनायचे आहे
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना अभिनेत्री गीता देवकर हिने सांगितले की, या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर धोत्रे आमच्या वस्तीत ऑडिशन घ्यायला आले होते. येथेच माझे सिलेक्शन झाले. त्यानंतर 15 दिवसानंतर चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाचे शूटिंग दोन महिने चालले असून ते सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात डोणज गाव,मंगळवेढा तालुका आणि मोहोळ तालुक्यातील रानमसले शिरापूर येथे झाले. या चित्रपटात असे सांगितले आहे की,गीताला शिक्षण घेण्याची इच्छा असते,पण वडील तिला शिकू देत नाहीत. तिचे लग्न लावून देतात. फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाल्याने अतिशय आनंद होत आहे. सुरुवातीला चित्रपटात काम करण्यास आई-वडिलांचा विरोध होता. पण दिग्दर्शक शंकर दादाने समजावल्यानंतर आई-वडील तयार झाले. या चित्रपटात माझ्या बरोबर माझ्या दोन मावस बहिणीनी ही काम केले आहे. पोटरा म्हणजे कच्या ज्वारीचे कणीस होय. त्यालाच पोटरात आलेले कणीस असे म्हणतात. म्हणून या चित्रपटाला पोटरा असे नाव देण्यात आले आहे. आई-वडिलांबरोबर गावोगावी फिरले पण आता शाळा शिकू वाटतेय. शिकून काहीतरी बनावे वाटतय, असे गीताने बोलताना सांगितले.