कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. असाच त्रास नांदेड शहरापासून 12 कि.मी. अंतरावर असलेल्या कामठा (बुद्रुक) या गावातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो आहे. या गावालगत असलेल्या एका ओढ्याला पूर आल्यानंतर कामठा ते सावरगाव या शाळेला जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून शाळकरी विद्यार्थ्यांना 20 फुटी खड्यातून मार्ग काढावा लागतोय.
याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून संताप व्यक्त केला जातो आहे. कामठा गावा जवळच असलेल्या श्री बसवेश्वर विद्यालयात कामठा, नांदुसा, निजामपुरवाडी, कोंढा ,गणपूर ,सावरगाव या गावातून साधारणपणे सातशे ते आठशे विद्यार्थी दररोज ये जा करत असतात. 19 ते 23 जुलै दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. यात कामठाजवळील ओढयाला आलेल्या पुरामुळे मेंडका नदीचे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय.
या ओढ्यावरील पूर तिसऱ्यांदा वाहून गेला आहे. यापूर्वीही पावसामुळे पूल वाहून गेला होता. त्यानंतर बसवेश्वर विद्यालयाच्या शिक्षकांनी मिळून इथे तात्पुरती सोय केली होती, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र जिल्लेवार यांनी दिली. यंदाच्या मुसळधार पावसाने हा पूल पुन्हा वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.