जातीने गुन्हेगारीचा मारलेला शिक्का भंडाऱ्याने पुसला
जातीने ज्या समाजावर गुन्हेगारीचा शिक्षा लावला तो समाज म्हणजे पारधी समाज, मात्र, धनगर समाजातील मेंढपाळांनी चोराचा माणूस केला... वाचा परिवर्तनाची गोष्ट
"चोरी केल्याशिवाय माझ्या कुटुंबाला अन्न मिळत नव्हतं, वर्षानुवर्षे मेंढरं चोरायची. त्याचं मटण वाटायचं. गाव मला जवळ घेत नव्हतं म्हणून मला ह्या धंद्याशिवाय पर्याय नव्हता." ही वाक्ये आहेत. पूर्वी अट्टल चोऱ्या करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील आरबुळी गावातील समाधान काळे यांचं. जातीने गुन्हेगारीचा शिक्षा लावलेला समाधान काळे. चोरीचा शिक्का लागल्याने कुणी जवळ घेत नव्हते. समाजात सन्मान मिळत नव्हता.
चोऱ्या करण्याशिवाय घर चालत नाही. हे काम सोडलं तर कुणी शेतकरी गाववाले विश्वास ठेवून काम द्यायला तयार नाहीत. या अवस्थेत परीसरात मेंढ्या चारण्यासाठी येणाऱ्या मेंढक्यांच्या वाड्यातील मेंढ्या उचलायच्या. हाच धंदा त्यांनी स्वीकारलेला. याच बरोबर वाळू चोरी चा धंदा देखील तो करायचा. या परीसरातील मेंढके सांगतात. आपण एखाद्या वाळकाच्या पिकात गेलो तर शेलकच वाळाक उचलतो. किडक्या मिडक्याला हात लावत नाही. अशाच प्रकारे समाधान काळे हा कळपातलं शेलकं मेंढरू उचलायचा.
मेंढी चोरली की त्याचं मटण अनेकांना वाटायचं. चोरी करण्याच्या याचं धंद्यातील प्रसंगातून समाधान काळे यांचे पुढचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. सांगोला तालुक्यातील मेंढ्या या भागात आल्या की, चोरी होणार. हा पारधी आपली मेंढी उचलणार हे ठरलेलं असायचं. पण मेंढक्यांना त्यांच्या भागात दुष्काळ असल्याने या परीसरात मेंढ्या चारण्याला पर्याय नसायचा.
बंडू मेटकरी आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांचा वाडा या परीसरात आला होता. या वाड्यावर लक्ष ठेवून समाधान काळे यांनी त्या कळपातील ४४,००० रुपये किंमतीचा बकरा उचलला. मेंढक्यांच्यासाठी एवढी किंमत असलेले बकरे समाधान काळे यासाठी केवळ मटन होते.
या घटनेबाबत ते स्वतः सांगतात "हे बकरं चोरून मी आणि माझा भाऊ संतोष काळे या दोघांनी मिळून झुडपात ठेवले. धनगर समाजातील लोकांना याचा माग लागला. आम्हाला पकडून त्यांनी ते द्यायला सांगितलं. यानंतर बंडू मेटकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचे ते बकरे दिले. आज बकरे मिळाले पण उद्या पुन्हा काही चोरी होऊ शकते. या चिंतेने त्यांनी या समाधान काळे यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
त्याने ते ऐकण्याची तयारी दर्शवली. घोंगडे टाकले. त्याच्यावर बैठक बसली आणि आम्ही सगळे मेंढके मिळून एक एक मेंढी देतो. मात्र तू हा चोरीचा धंदा सोडायला पाहिजे. असे म्हणून समोरचा भंडारा उचलायला सांगितला. चोऱ्या करून जगण्याला वैतागलेल्या समाधान काळे यांना पहिल्यांदाच कुणी तरी इतका सन्मान देऊन बोलत होते. त्यांनी तो भंडारा उचलला आणि आजपासून चोरी सोडली कुठल्याही मेंढराना धक्का लावणार नाही असा शब्द दिला.
मेंढक्यानी दिलेल्या शब्दाप्रमाने दीडशे नग मेंढ्या त्यांनी समाधान काळे यांना दिल्या. त्यात चांगल्या वाणाचे बकरे दिले. काही वर्षांनी त्यातून जन्मलेल्या एका बकऱ्याची एक लाखाला विक्री झाली. या पैशातून त्यांनी एक एकर जमीन घेतली. हळूहळू जमिनीत बोअरवेल घेतली. चोऱ्या करणारे समाधान काळे हे सन्मानाने आयुष्य जगू लागले. आज त्यांच्याकडे धनगर तसेच इतर समाजातील लोक तंटे मिटवण्यासाठी न्याय करण्यासाठी येत असतात. त्यांच्या पत्नी पारुबाई काळे सांगतात.
'माझ्या सासऱ्याला पोलिसांनी खोट्या संशयावरून जीव मारलं. त्यानंतर आम्ही मागुन कपडे घातले. केळीच्या पानावर जेवण केलं. घरात फुटक्या भांड्यानी संसार केला. खूपदा वाटायचे आपले शेत असावे आपल्या मेंढ्या असाव्या शेतात हिरवे पीक असावे. पण परिस्थितीला पर्याय नव्हता.पारुबाई पुढे सांगतात कुनब्याच्या आणि गावाच्या डोळ्यावर येईल असे वागू नको म्हणून मी सतत नव्हऱ्याला सांगायचे. यातून मेंढक्यांचा प्रसंग घडला. आणि आम्ही पारध्यांचे धनगर झालो. धनगर स्वतःच्या पोराची जेवढी काळजी घेत नाही तेवढी मेंढ्यांची घेतो. स्वतःच्या कपड्याने मेंढरांचा शेंबूड काढतो. आता आम्ही सुद्धा मेंढके झालोय. इमानदारीने हा धंदा करतोय. नवऱ्याचे परिवर्तन केले. आता गाव माझा पारू आक्का म्हणून सन्मान करत आहे. आमदार खासदारांकडून जो न्याय होत नाही. तो करायला लोक माझ्याकडे येत आहेत.
पारुबाई हे सर्व सांगत असताना सरकारने त्यांच्यासाठी काहीही केले नसल्याचे आवर्जून सांगतात. चोरीचा व्यवसाय सोडल्यानंतर देखील अनेकदा पोलिसांनी आरोप केले. आरोपी ठरवलं. पण गावाने पुढे येऊन हे लोक आमचे आहेत. हे चोर नाहीत हे सांगितले .आता त्यांना कोणी त्रास देत नाहीत. आज हे जोडपे त्यांची स्वतःची शेती कसत आहे. प्रभू मेटकरी सांगतात याला चोर म्हणू नका तो आमचा देव आहे. त्याने चोऱ्या सोडून भंडाऱ्या शी इमान राखलाय.
एकेकाळी अट्टल चोर म्हणून कू प्रसिद्ध असलेला बाळू पारधी आज लोकांचे देव झालेत. त्यांच्या कपाळावर लागलेल्या गुन्हेगारीचा शिक्का जाऊन त्यावर आता पिवळा धम्मक भंडारा उमटलाय. या सगळ्या प्रक्रियेत त्यांना सरकारची कोणतीही मदत मिळाली नाही. ही खंत त्यांना बोचते. शेतात गेलं, गावात गेलं की, हाकलून बाहेर काढणाऱ्या या जोडप्याने स्वतःची शेती कसली. मेंढ्या केल्यात. त्यांना त्यांच्या शेतातून घरातून हाकलायला आता कोणी पोलीस जात नाही, गावही नाही. स्वतःच्या कुटुंबातील न्याय निवाडा करण्यासाठी मात्र, येथे लोकांची रीघ लागलेली असते.
धनगर जातीतील एका समूहाने समाधान काळे यांचे जे परिवर्तन केले ते परिवर्तन सरकारच्या पातळीवर का होत नाही असा संतप्त सवाल उपस्थित होतो. आज एका समाधान काळेंचे मनपरिवर्तन झाले. पण गाव जवळ करत नाही कुणी काम देत नाही असे समाजाने गुन्हेगार ठरवलेले कित्येक समाधान काळे जगण्यासाठी चरितार्थासाठी चोरीचा व्यवसाय करत असतील. ज्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल. त्यांच्यापर्यंत सरकार कधी पोहचणार असा प्रश्न पडतो.
भटक्या समाजातील लोकांचा डाटा सरकारकडे उपलब्ध नसल्याचे नागडे वास्तव अनेकदा पुढे आले आहे. त्याच्यावर काँक्रिट काम केले जात नाही. या संदर्भात आम्ही भटके विमुक्त समाजाच्या हितासाठी काम करणारे प्रा विनायक लष्कर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते सांगतात ' नियोजन आयोगाच्या एका माजी अध्यक्षानी भटक्या समाजातील कुटुंबांच्या पॉलिसी च्या रखान्यात या जातींचा डाटा उपलब्ध नसल्याने पॉलिसी तयार करता येत नसल्याचा शेरा लिहिला होता 'हे जळजळीत वास्तव स्वीकारून या सरकारने तरी या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन या समाजाच्या भविष्याकडे लक्ष द्यावे' अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. माहिती उपलब्ध नसेल तर पॉलिसी कशी तयार होणार? आणि ही पॉलिसी गावाबाहेर असणाऱ्या माळातील पालापर्यंत कधी पोहचणार? हा सवाल आहे.