Ground Report : मतांसाठी घरांचे बनावट उतारे, ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार
मतांसाठी पैसे वाटले जातात, दारु पार्ट्या दिल्या जातात हे आपण ऐकलं आहे..पण मतांसाठी घरांचे बनावट उतारे वाटले गेल्याचे आपण ऐकले आहे का....हो असे घडले आहे....पाहा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांचा स्पेशल रिपोर्ट
खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास असे म्हटले जाते. या खेड्यांच्या विकासाची जबाबदारी असते ग्रामपंचायतींवर....ग्रामपंचायतींना गावांचा विकास करता यावा यासाठी ग्रामसभांच्या माध्यमातून त्यांना सर्वाधिकार देण्यात आले. ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयाला कायदेशीर महत्त्व आहे. पण याच ग्रामसभांच्या नावाने खोटे ठराव दाखवून गरिब गावकऱ्यांची फसवणूक केली गेल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील एका गावात घडला आहे.
ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर येत असतात. पण जळगाव जिल्ह्यातील मौजे लोहारा ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे. पदावर असतांना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनी ग्रामसभेच्या प्रोसेडिंग बुकमध्ये बनावट ठराव टाकल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघड झाला आहे. गावठाण जमिनीचे मालकी हक्क दाखवणारे बनावट नमुना नंबर 8 चे सातबारा (७/१२ ) उतारे तयार करून ग्रामस्थांकडून देऊन कोट्यवधींची माया जमा केली आहे.
नियमानुसार ग्रामपंचायतची गावठाण जागा कोणालाही देता येत नाही. सातबारा उताराही देता येत नाही, असे असताना लोहारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि ग्रामवसेवकाने बनावट दाखले तयार केले. त्यात सही शिक्का मारून लोकांना सर्रास देण्यात आले. हे दाखले एक दोन लोकांना नाही तर तब्बल 432 लोकांना हे दाखले देण्यात आले.
असा झाला भ्रष्टाचार उघड
इथल्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीआधी हा सर्व धक्कादायक प्रकार केला गेला. ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी गावठाणातील जमिनीवर बांधण्यात आलेली घरं कायमची नावांवर करून सात-बारा देण्याचं अमिष तत्कालीन सरपंच आणि उपसरपंच यांनी गावकऱ्यांना दिले होते. त्यानुसार तत्कालीन सरपंच मालतीबाई संजय पाटील, उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांनी 432 ग्रामस्थांकडून पैसे घेऊन घरी जाऊन वार्ड निहाय बनावट सातबारा दिला. निवडणूक संपल्यावर लाभार्थी ग्रामस्थ ज्यावेळी नवा सातबारा उतारा घेण्यासाठी आले, त्यावेळी हा दाखला बनावट असल्याचे त्यांना ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. गावठाण जमिनीचा सातबारा उतारा देण्याचा कुठलाही आदेश सरकार कडून आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सातबारा उतारा घेणाऱ्या ग्रामस्थांनी नवीन सरपंचांना भेटून हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला. गावातील 432 लोकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. 2019 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर ग्रामसभा घेऊन तत्कालीन सरपंच मालतीबाई संजय पाटील, उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांनी ग्रामविकास अधिकारी आर टी बैसाणे यांच्याशी संगनमत करून नमुना नंबर ८ चे बनावट उतारे ७/ १२ तयार करून वाटप केला आणि य़ाद्वारे मोठा भ्रष्टाचार केल्याचं उघड झाले आहे.
सरकारी नियम कसा धाब्यावर बसवला गेला?
लोहारा ग्रामपंचायतीमध्ये नव्याने रुजू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले की सरकारचा कोणताही GR आणि आदेश नाहीत. गाव गावठाणातील नमुना नंबर 8 चा सातबारा स्वतंत्रपणे कोणालाही देता येत नाही, तसेच सरपंचांना हा उतारा देण्याचा अधिकारही नाही. गावठाण जमीन घोटाळ्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आणखी संख्या वाढण्याची आरोपींची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितली आहे.
राजकीय वरदहस्त मुळे दीड वर्ष माहिती दडवली – सरपंच
अनेकदा विभागीय माहिती आयुक्तांना स्मरण पत्र देऊनही ह्या घोटाळ्याची माहिती मिळाली नाही, एका बडया राजकीय व्यक्तीच्या वरदहस्तामुळे माहिती मिळण्यास उशिरा झाला, असा आरोप सरपंच जैस्वाल यांनी केला आहे. मात्र मिळालेल्या माहितीच्या आधारावर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी याबाबत चौकशीचे आदेश दिल्यानंतर चाळीसगावच्या बीडीओंनी चौकशी करून सरकारी जमिनीवर 432 लोकांना देण्यात आलेले सातबारे उतारे बनावट असल्याचे उघड झाल्याने सांगितले. त्यावंतर हे सर्व उतारे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ग्रामपंचातीची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, संगणक चालक यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर गुन्हा दाखल होऊनही राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना अटक होत नाही असा आरोप सरपंच जैस्वाल यांनी केला आहे.
मतांच्या बदल्यात सातबारा उतारे दिले – ग्रामस्थ
मॅक्समहाराष्ट्रने लोहारा गावात जाऊन बनावट उतारे मिळालेल्या काही लोकांशी संवाद साधला आणि धक्कादायक बाब समोर आली. "ग्रामपंचायतीच्या पॅनलमध्ये मतदान केले तर ज्या गावठाण जागेवर अतिक्रमित घरे बांधली, त्या जागेचा सातबारा उतारा नावावर करून देऊ असे आमिष आम्हाला देण्यात आलं, पैसे घेऊन गावातील 432 लोकांची फसवणूक केली" असा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
एका लाभार्थ्यांने सांगितलं की, "त्यावेळचे उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांनी माझ्याकडून 25 हजार रुपये घेतले आणि सातबारा उतारा दिला. हा उतारा ग्रामपंचायतीमध्ये न देता घरी आणून दिला. काही दिवसांनी नवा उतारा घ्यायला ग्रामपंचायतीमध्ये गेलो तर हा उतारा चालत नाही, ग्रामपंचायत असा कोणताही उतारा देत नाही असं सांगितल्यावर आपल्या पायाखालची जमीनच गेली, बनावट दाखला देऊन आमची फसवणूक झाल्याने आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली," असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या लाभार्थ्यांने सांगितलं की, "निवडणुकीत आमच्या पॅनलला मतदान करा, तसेच माझ्याकडून 19 हजार रुपयेही घेतले. मात्र हा दाखला बनावट असल्याचे समजल्यावर आम्ही कुठे जायचं, मुलं शाळेत जातात आम्ही रस्त्यावर येऊ सरकारने आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे" अशी मागणी ह्या लाभार्थ्यांने केली.
ही कहाणी केवळ एक-दोघांची नाही तर गावातील 432 लोकांची आहे. फसवणूक तर झालीच आहे पण आता पोलिसांकडेही जबाब देण्यासाठी जावं लागत आहे. आम्हाला आमचे पैसे परत करा, अशी मागणीही काही लोक करत आहे.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी, आणखी आरोपींची नाव वाढतील- पोलीस प्रशासन
गावठाण जमीन घोटाळ्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन सरपंच, उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता, असल्याचं लोहारा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी उदय कुलकर्णी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं.