Ground Report : बीएमसीचा कारभार, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची टाकी आली पण ऑक्सिजन नाहीच !

कोरोना संकटाशी लढण्यासाठी मुंबईत अनेक कोवीड सेंटर नव्याने तयार केले गेले, पण महापालिकेच्याच एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनसाठीची यंत्रणा उभी राहूनही इथे ऑक्सिजन नसल्याने 90 बेड रिकामे पडून आहेत. पाहा कार्यकारी संपादक विलास आठवले यांचा ग्राऊंड रिपोर्ट...;

Update: 2021-05-06 05:24 GMT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या दूरवस्थेचे चित्र समोर आले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर परिस्थिती आणखीनच गंभीर आहे. पहिल्या लाटेत धारावीमधल्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवल्याने महापालिकेचे जगभऱात कौतुक झाले खरे.....पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र मुंबई महापालिकेचा कारभार कसा भोंगळ पद्धतीने सुरू आहे याचे अनेक पुरावे समोर आले. महापालिकेच्या याचट कारभाराचे वाभाडे काढणारा हा रिपोर्ट...

कोरोनाच्या संकटाला आता एक वर्ष उलटून गेले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आधी बेडसाठी आणि त्यानंतर ऑक्सिजनसाठी रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाल्याची दृश्यं सर्वत्र व्हायरल झाली आहेत. अनेकांना मुंबईत बेड न मिळाल्याच्या तक्रारी आल्या. कोरोनाचा भारतात शिरकाव झाला तेव्हापासून आरोग्य वस्थेवर खर्च केला गेल्याचे दाखवले हेले. मुंबई महापिलिकेनेही कोट्यवधी रुपये खर्च केले. पण महापालिकेचं नियोजन किती ठिसाळ आहे याची प्रचिती बोरिवली येथील भगवती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर येते. इथे 90 बेड आहेत आणि हे सर्व बेड रिकामे आहेत कारण या हॉस्पिटलमध्ये आक्सिजनची सुविधाच नाहीये. आता ऑक्सिजनची सुविधा नसणे हा काही भोंगळ कारभार नाहीये. पण भगवती हॉस्पिटल आहे बोरिवलीमध्ये....इथून जवळच असलेल्या दहिसर कोविड सेंटरमध्ये आक्सिजन व्यवस्थित पोहचत आहे, पण या हॉस्पिटलमध्ये मात्र ऑक्सिजन जात नाही.

पश्चिम उपनगरानगरातील बोरीवली येथील भगवती हॉस्पिटल तसे सर्वसामान्य नागरिकांचे उपचारासाठी हक्काचं ठिकाण. अनेक लोक इथे उपचारासाठी येतात. महापालिकेचे हॉस्पिटल असल्यामुळे स्वस्त दरात औषधे उपलब्ध होत असल्याने अनेकांसाठी हे हॉस्पिटल आधार ठरते आहे. पण आता इथं कोणी पेंशंट आला तर त्याच्यावर उपचार होत नाहीत. त्या पेशंटला दुसरीकडे पाठवलं जाते.

काही दिवसांपूर्वी आम्ही महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलचा कारभार कसा चालतो हे दाखवले होते. या ठिकाणी आक्सिजनच्या टाक्या गेल्या सहा महिन्यांपासून होत्या. पण त्या सुरूच झाल्या नव्हत्या, कारण आक्सिजन टाक्या आणि पेशंटपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणाच इथे लावण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकवेळा पेशंटला बीकेसी कोविड सेंटरमध्ये नेण्यात येत होते. .सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बाबत अनेकदा आवाज उठवून यंत्रणा लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. मॅक्स महाराष्ट्रनेही याबाबत आवाज उठवला होता. त्याचा परिणाम म्हणून म्हणजे दोन दिवसांपूर्वी इथे ऑक्सिजन पुरवछ्याची यंत्रणा बसवण्यात आली.

भगवती हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन का नाही?

आता भगवती हॉस्पिटलची स्थिती पाहूया.. इथं आक्सिजनची टाकी आहे, पण त्याला फायर क्लिअरन्स मिळालेले नाही, म्हणून आक्सिजन घेता येत नाही आणि त्यात आक्सिजनची कमतरताही आहे. त्यामुळे भगवतीसारखं हक्काचं हॉस्पिटल रिकामं पडून आहे. काही वेळा ज्यांना आक्सिजनची आवश्यकता नसते अशा रुग्णांवर उपचार होतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोविड सेंटर म्हणून या हॉस्पिटलने चांगले केले. पण आता मात्र हे हॉस्पिटल रिकामे पडून असते, असे भाजपचे नगरसेवक हरिश छेडा यांनी सांगितले. थोडा आक्सिजन आला आणि रुग्णांवर उपचार सुरू केले तर आक्सिजन संपल्यावर त्यांना दुसरीकडे पाठवावे लागते, असंही छेडा यांनी सांगितले.

मध्यंतरी रेमेडेसीवीर आषधांचाही मोठा तुटवडा या ठिकाणी होता. आता तर पेशंटच घेत नाहीत त्यामुळे औषधांचा प्रश्न येतच नाही. या संदर्भात महापालिकेचे सह आयुक्त सुरेश काकांणी यांना नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांनी इथे भेटही दिली होती, पण पुढे काहीच झालं नाही, परिस्थिती जैसे थेच आहे.

कोरोनाच्या संकटाला एक वर्ष उलटून गेले आहे. पण महापालिकेचे हे हॉस्पिटल सक्षम करण्याची मोठी संधी होती. पण नवे कोविड सेंटर उभे करण्यातच अधिका-यांना स्वारस्य दिसल्याची टीका होते आहे. जवळच असलेल्या दहिसर येथे जम्बो कोविड सेंटर उभे करण्यात आले. तर कांजरपाडा इथे दुसरे कोविड सेंटर उभए केले गेले. कांजरपाडा इथं आयसीयू आणि व्हेंटीलेटरचीही सोय आहे. यासाठी कोरोडो रूपये खर्च झाले आहेत. या ठिकाणी लोकांच्या कष्टातून भरण्यात आलेल्या टॅक्सचे पैसे खर्च होतात. पण भगवती हॉस्पिटलमध्ये आता एकाही रुग्णावर उपचार होत नाही. भगवती हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या 80 खाटा आणि दहा बेडची व्यवस्था आहे. पण ही सर्व यंत्रणा आता ठप्प आहे. ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या तीन महिन्यांपासून जाणवतो आहे. पण महापालिका प्रशासनाला याठिकाणी ऑक्सिजनची सुविधा तातडीने कशी देता येईल यावर मार्ग काढता आला नसल्याचे भाजपचे नगरसेवक हरीश छेडा यांनी सांगितलं.

भगवती हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत ते नवीन आहेत. जुने भगवती हॉस्पिटल शिफ्ट करून ते नर्सिंग कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे. याच ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आलं आहे. खरं तर या ठिकाणी आणखी जास्त मोठं सेंटर बनवता आलं असतं. पण महापालिकेनं हे का केलं नाही, याबाबत कुणालाच काही सांगता येत नाही. भगवती हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्रही आहे. पण आता लस तुटवड्यामुळे ते बंद आहे.

सध्या सुरू असलेल्या भगवती हॉस्पिटलमध्ये आपरेशन थिएटरही नाही. सुरुवातीला आयसीयची सोय करण्यात आली होती. पण ते चार ते पाच वर्ष ते सुरूच झालं नाही. सर्व मशिन पडून होत्या. आता कोरोना संकटाच्या काळात ह्या आयसीयू मशीन खुप कामास आल्या.

हॉस्पिटलच्या डीनचे म्हणणे काय?

या संदर्भात आम्ही हॉस्पिटलचे डीन डॉ, शांताराम कवडे यांच्याशी संपर्क साधला. सध्या हॉस्पिटलला आक्सिजनचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. दीड वर्षापूर्वी आक्सिजनसाठी टाकी बसवण्यात आली होती, पण त्यात काही परवानग्या मिळाल्या नाहीत, त्यामुळे ती कार्यान्वीत नाही असे त्यांनी सांगितले.. परवानग्या मिळवण्यासाठी विभाग अधिकारी आणि उपायुक्त प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच गेल्या वर्षभरापासून टाकी तर बसवली आहे पण ती सुरू नाही हेसुद्धा कवडे यांच्या खुलाशावरून स्पष्ट होते.

जेव्हा मुंबई आतापर्यंतच्या सगळ्यात भयावह संकटातून जात आहे तेव्हा मुंबईचा कारभार पाहणाऱ्या महापालिकेच्या एका हॉस्पिटलची अवस्था महापालिकेचा कारभार कसा सुरू आहे याची साक्ष देत आहे.

Tags:    

Similar News