मॅक्स महाराष्ट्रचा यशस्वी पाठपुरावा, BMC मधील मोठ्या घोटाळ्याची होणार चौकशी

मुंबई महानगर पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून सावकारांनी दिलेल्या कर्जाच्या नावाने पैसे कट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण कर्मचाऱ्यांच्या या तक्रारीकडे दोन वर्ष दुर्लक्ष करण्यात आले, अखेर मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी थेट पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.

Update: 2022-08-23 14:36 GMT

मुंबई महापालिकेतील ८५ सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी दर महिन्याला कर्जाच्या नावाने पैसे कट केले जात आहेत. मात्र सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या या कामगारांनी आपली मोठी फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. आपण जे कर्ज घेतले नाही, त्या कर्जाचे हप्ते आमच्या पगारातून का कट केले जात आहेत, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

प्रकरण काय?

कुर्ला एल वार्ड मधील 85 सफाई कामगारांनी खासगी सावकराकडून कर्ज घेतले, तसेच त्यांनी ते फेडले नाही म्हणून सावकारांनी हायकोर्टात धाव घेतली. तसेच कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या पगारातून पैसे कट केले जात असल्याचे मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हायकोर्टाची हप्ते भरण्याची लेखी नोटीस देखील सफाई कामगारांना दाखवली गेली.

त्यानंतर संबंधीत सफाई कामगारांच्या मासिक पगारातून 15 टक्के व्याजासकट हप्ते कट करण्यास सुरुवात झाली. पण आपण जे कर्ज घेतले नाही, त्याचे हप्ते का फेडायचे असा सवाल करत फसवणूक झाल्याचा आरोप करत या सफाई कर्मचाऱ्यांनी पोलिसांक़डे धाव घेतली. विनोभा भावे पोलीस स्टेशनला गेले असता त्यांनी तक्रार घेण्यात आली नाही, असा आरोप या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. पोलिसांनी तक्रार न घेतल्याने 3 वर्षांपासून सफाई कामगार आपले मासिक हप्ते भरत आहेत.

मुंबईतील पंतनगर विभागात राहणारा सफाई कामगार सचिन बच्छाव यांनी दोन वर्षांपासून पंतनगर पोलिस ठाण्यात सावकराच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. पण पंतनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन सोनकांबळे यांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली असा आरोप सचिन बच्छाव यांनी केला आहे.




 


पोलीस अधिकाऱ्याची शिविगाळ आणि माफीनामा

यानंतर सचिन बच्छाव यांची तक्रार का घेतली गेली जात नाही अशी विचारणा मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी प्रसन्नजित जाधव यांनी सोनकांबळे यांना केली. त्यावर सोनकांबळे यांनी अरेरावीची भाषा करत शिविगाळ केली. याबाबत प्रसन्नजीत जाधव यांनी थेट सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण प्रकरण समजावून सांगितल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले. तसेच बच्छाव यांची तक्रार का घेतली नाही आणि पत्रकाराला शिविगाळ केल्याप्रकरणी सोनकांबळे यांची चौकशी करण्याचे आदेशही दिले. यानंतर विनोबा भावे पोलिस स्टेशन आणि पंतनगर पोलिस स्टेशन यांनी सात दिवसात सफाई कामगारांची तक्रार दाखल करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे यांनी प्रसन्नजीत जाधव यांना फोन करुन माफी मागितली आहे.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता

या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. ज्या लोकांकडून कर्ज वसुल करायचे आहे, त्यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल होते, पण त्या लोकांना कोर्टात बोलावले देखील जात नाही, असे कसे होऊ शकते, असा सवाल विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील सहभागी असावेत, असा संशय व्यक्त होतो आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार असे दिसते आहे.

Tags:    

Similar News