ना वीज, ना पाणी असाही आहे मुंबईतील एक शापित डोंगर
मुंबई शहरात महापालिकेकडून विकासाचे मोठे दावे केले जातात. पण याच मुंबई महापालिकेंतर्गत येणाऱ्या मालाड भागात एक शापित डोंगर आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना ना वीज मिळते, ना पाणी, पण तरीही नागरिक येथे राहतात. काय आहे या शापित डोंगराच्या समस्या? जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी...;
मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे. मात्र मालाडमधील डोंगर भागातील झोपडपट्टीत 9 हजार घरं आहेत. 1991 पासून अनेक नागरिक वनविभागाच्या जागेवर राहत आहेत. मात्र या वस्तीचा अद्याप विकास झाला नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. रस्ते नाहीत, वीजेसाठी अवाजवी दर अकारले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. मात्र स्थानिक नगरसेविका धनश्री भरडकर या भागाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांनी आपले प्रश्न लोकप्रतिनिधीकडे मांडले असता, तुम्ही वनविभागाच्या क्षेत्रात येता. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नसल्याचे नगरसेविका सांगतात. मग तुम्हाला आमचं मत कसं चालतं? असा थेट सवाल नागरिकांनी विचारला आहे.
नगरसेविकेने पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या नावाने अनधिकृत मार्गाने पाणी उपलब्ध करून दिले. त्यासाठी जास्तीचा मीटर द्यावा लागत आहे. तसंच बारा-बारा दिवस या भागात पाणी येत नसल्याचे या भागातील नागरिक सांगतात.
मालाडच्या डोंगर भागातील नागरिकांना शौचालयाची मोठी समस्या आहे. त्यामुळे शौचालयाच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी कमिटी करून रहावं लागतं. प्रत्येक कमिटीत 32 लोकं आणि त्यामध्ये तीन पुरूष तर तीन महिलांसाठी शौचालये असतात. मात्र या शौचालयांची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे वैयक्तिकरित्या दीड हजार रुपये देऊन शौचालय साफ करणाऱ्या व्यक्तीला बोलवावे लागते.
या भागात येण्यासाठी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था आहे. कुणी आजारी पडलं तरी डोंगराळ भागात रुग्णवाहिका जात नाही. त्यामुळे गरोदर महिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात, अशी माहिती स्थानिक नागरिक देतात. याबरोबरच इतर ठिकाणी मुंबईत 4 ते 7 रुपये प्रति युनिट वीज दर आहे. मात्र या भागात नागरिकांना 17 रुपये प्रति युनिट वीज खरेदी करावी लागते. तसेच आमच्याकडून 80 हजार रुपये घेतले. मात्र अजूनही वीज कनेक्शन देण्यात आले नसल्याचे नागरिक सांगतात.
या समस्यांमधून आमची सुटका कधी होईल? आणि आम्हाला मुलभूत सुविधा कधी मिळतील? असा सवाल मुंबईतील मालाड भागातील डोंगर भागातील वार्ड क्र. 42 चे नागरिक विचारतात.