सोलापूर जिल्ह्यात दुर्मिळ काळ्या गव्हाची लागवड यशस्वी
काळ्या गव्हाच्या शेतीचा प्रयोग पंजाब मध्ये केला गेला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील काळ्या गव्हाच्या लागवडीचा पहिला प्रयोग शेतकरी राम चौधरी यांनी केला आहे.दहा हजार रुपये क्विंटलला विकला जाणाऱ्या त्यांची काळ्या गव्हाच्या शेतीची सध्या जोरदार चर्चा आहे, शेतकरी राम चौधरी यांचा अशोक कांबळेंनी केलेला ग्राऊंड रिपोर्ट...;
काळ्या गव्हाच्या शेतीचा प्रयोग पंजाब मध्ये केला गेला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील काळ्या गव्हाच्या लागवडीचा पहिला प्रयोग शेतकरी राम चौधरी यांनी केला आहे.दहा हजार रुपये क्विंटलला विकला जाणाऱ्या त्यांची काळ्या गव्हाच्या शेतीची सध्या जोरदार चर्चा आहे, शेतकरी राम चौधरी यांचा अशोक कांबळेंनी केलेला ग्राऊंड रिपोर्ट...
सोलापूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रात विविध प्रयोग होताना दिसत आहेत.पारंपारिक शेती पिकांपेक्षा पैसे मिळवून देण्याऱ्या नगदी पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. परंतु ऊसाची शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो.त्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. ऊस लवकर कारखान्याला जात नाही.त्यामुळे सुमारे दोन वर्षे शेती ऊसाच्या पिकात गुंतून राहते.त्याकारणाने जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील झाला आहे.
जिल्ह्यात सफरचंद शेती,खजूर शेती,ड्रॅगन फ्रुट शेती,सीताफळ शेती,आद्रक शेती,केळीची शेती,डाळींब शेती यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे.या फळबागांच्या उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो.येथील मालदांडी ज्वारीला बाजारपेठेत चांगली मागणी असते.जिल्ह्यात गव्हाचे पीक ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.परंतु हा गहू पारंपरिक पद्धतीचा घेतला जातो. हा गहू बाजारात सुमारे 2 हजार दोनशे रुपये क्विंटलला विकला जातो.गव्हाच्या पिकासाठी पंजाब,हरियाणा,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन घेतले जाते.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पण या पारंपारिक गव्हाच्या पिकाला फाटा देत करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील शेतकरी राम चौधरी यांनी काळ्या गव्हाची लागवड केली आहे.हा गहू 100 रूपये किलोने विकला जात आहे.तर 10 हजार रुपये क्विंटलने शेतकरी घेत आहेत. या काळ्या गव्हाच्या शेतीचा प्रयोग पंजाब मध्ये केला गेला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील काळ्या गव्हाच्या लागवडीचा पहिला प्रयोग शेतकरी राम चौधरी यांनी केला आहे.त्यांची काळ्या गव्हाच्या शेतीची सध्या जोरदार चर्चा आहे.
केळी उत्पादक क्षेत्रात काळ्या गव्हाची लागवड
करमाळा तालुक्यातील कविटगाव उजनी धरणाच्या जवळ असणारे गाव आहे. त्यामुळे येथील शेती क्षेत्राला मुबलक पाणी उपलब्ध होते.या उजनी जलाशयाच्या पट्ट्यात केळी,उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.उजनी जलाशयाच्या शेजारी असणाऱ्या कंदर गावची केळी महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.येथे केळीच्या तोडणीसाठी पश्चिम बंगाल,उत्तर प्रदेश येथून कामगार कामाला आणले जातात.येथून राज्याबाहेर व परदेशात केळी एक्स्पोर्ट केली जाते.येथे केळीचे भरघोस उत्पादन निघते होते.पण गेल्या काही दिवसांपूर्वी केळीचे भाव गडगडले होते.त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.उजनी जलाशयाच्या आसपास केळीची शेती मोठया प्रमाणात पहायला मिळते.यातून शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधली आहे.त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली पण केळीचे भाव पडल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्याला पर्यायी शेती केली जात आहे. याच ऊस व केळीच्या पट्ट्यात शेतकरी राम चौधरी यांनी काळ्या गव्हाची लागवड करून शेतकऱ्यासमोर शेतीचा नवीन प्रयोग केला आहे.
आंतरपिकात केली गव्हाची लागवड
शेतकरी राम चौधरी यांनी एक एकर शेती क्षेत्रात सीताफळाची लागवड केली आहे.त्यामध्ये त्यांनी आंतरपिक म्हणून काळ्या गव्हाची लागवड केली आहे.या गव्हाची लागवड करीत असताना त्यांनी शेतीची मशागत ट्रॅक्टरने करून घेतली.सुरुवातीला त्यांनी शेतीमध्ये जवळपास 4 ट्रॉली शेणखत पसरून घेतले.युट्यूबवर पाहून पंजाब मधील शेतकऱ्यांकडून काळ्या गव्हाचे बियाणे मागवले.ते बियाणे त्यांना ट्रान्सपोर्टमार्फत मिळाले.काळ्या गव्हाची लागवड त्यांनी पूर्णपणे शेंद्रिय पद्धतीने केली आहे.पारंपारिक गव्हापेक्षा या काळ्या गव्हाची उंची जास्त आहे.याच्या लोंब्या थोड्याशा लांब आहेत.गव्हाच्या वाढीसाठी शेतकरी राम चौधरी यांनी रासायनिक खतांचा वापर केलेला नाही.त्यामुळे त्यांच्या या काळ्या गव्हाच्या शेतीला महत्व प्राप्त झाले आहे.त्यांच्याकडे या गव्हाची मागणी शेतकरी करू लागले आहेत.2020 सालापासून शेतकरी राम चौधरी काळ्या गव्हाची लागवड करत आहेत.एका क्विंटलला 10 हजार रुपये भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
काळ्या गव्हाचा आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये केला जातोय उपयोग
यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी राम चौधरी यांनी सांगितले की, या गव्हाचे बियाणे पंजाबवरून मागवले आहे.याच्या लागवडीसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांशी संपर्क साधून 2020 सालापासून याची लागवड करत आहे.या गव्हाचा उपयोग आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये केला जात आहे.काळा गहू हा लठ्ठपणा, शुगर,ब्लड फ्रेशर याच्यावर गुणकारी आहे.याची लागवड करत असताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने फणनी करून बैलांने काळ्या गव्हाची लागवड केली.याच्या लागवडीसाठी गावातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.काळ्या गव्हाच्या विक्रीसाठी सध्या मार्केट उपलब्ध नाही.कारण ही काळ्या गव्हाची दुर्मिळ जात आहे.पण ही पूर्वी अस्थित्वात होती.सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
काळ्या गव्हाची दुर्मिळ जात पंजाब मधील विद्यापीठाने केली विकसित
काळ्या गव्हाची जात नामशेष होण्याच्या मार्गावर होती.त्याचे संवर्धन करून ही जात पंजाब मधील विद्यापीठाने विकसित केली आहे.हा दुर्मिळ काळा गहू शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे सध्या काम सुरू आहे.काळ्या गव्हाची शेती सध्या दुर्मिळ आहे.याचे उत्पादन एकरी 9 ते 10 क्विंटल निघते.याला पाटाद्वारे पाणी दिले आहे.याचा परिपक्कवतेचा साधारण कालावधी 120 दिवसाचा असून पारंपारिक गव्हाचा कालावधी 150 दिवसाचा आहे.या गव्हाची उंची 4 ते साडेचार फुटाच्या आसपास आहे. तर पारंपारिक गव्हाची उंची याच्या मानाने कमी असते.जास्त उंची असणे हा याचा अंगीकृत गुण आहे.पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या काळ्या गव्हाची ऍडव्हान्स मागणी केली आहे.असे शेतकरी राम चौधरी यांनी सांगितले.
काळ्या गव्हात आयर्न आणि मिनरलचे प्रमाण जास्त असते
कृषी तज्ञांच्या मते काळ्या गव्हात आयर्न आणि मिनरलचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे याचा उपयोग आयुर्वेदिक औषधामध्ये केला जातो.अलीकडच्या काळात या गव्हाची शेती वाढू लागली आहे. महाराष्ट्र राज्यात याची लागवड फारच कमी प्रमाणात आढळते.इतर पिकात ही काळ्या बियाण्यांची संख्या वाढू लागली आहे.अलिकडकच्या काळात गव्हाच्या बियांनातही निळ्या,काळ्या प्रकारचे बियाणे मार्केटमध्ये दिसून येत आहे.याच्या विक्रीसाठी सध्या मार्केट उपलब्ध नाही. भविष्यात याची शेती वाढल्यास मार्केटमध्ये याची विक्री होऊ शकते.येणाऱ्या काळात काळ्या गव्हाची शेती वाढू शकते,असे कृषी तज्ञांचे मत आहे.