Exclusive - मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ, प्रक्रियेशिवाय वैद्यकीय कचरा डम्पिंग ग्राऊंडवर

कोरोनाचे रुग्ण मुंबईत कमी झाल्याचा दावा केला मुंबई महापालिकेतर्फे केला जातो आहे. पण मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्या ग्राऊंड रिपोर्टमुळे महापालिकाच लाखो मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Update: 2020-11-11 09:30 GMT

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे आणि महापालिकेच्या उत्तम नियोजनामुळे कोरोनाशी यशस्वी लढा दिला जात असल्याचे ढोल बडवले जात असले तरी मुंबई महापालिकाच लाखो मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचे उघड झाले आहे.

देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्ट टाकले जात आहे. वास्तविक मेडिकल वेस्ट उघड्यावर न टाकता त्यावर प्रक्रिया करुन ते नष्ट केले जाते. पण सध्या देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्ट टाकला जातोय. महापालिका रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यांत तब्बल १०४ टक्क्यांनी वाढले आहे. जून महिन्यात सरासरी १२ हजार किलोग्रॅम असलेल्या जैविक कचऱ्याचा भार ऑगस्टमध्ये प्रतिदिन सरासरी २४ हजार ८८० किलोग्रॅमवर पोहोचला आहे. परिणामी वाहनांची कमतरता, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि देवनार कचराभूमीवर जैविक कचऱ्यासाठी राखीव एक एकर जागेवरील ताण वाढला आहे.


मुंबईत कोरोनाचा प्रसार मार्च महिन्यात सुरू झाल्यापासून मास्क, ग्लोव्हज, औषध सिरिंज, सलाइन बॉटल, युरीन बॅग अशा प्रकारच्या जैविक कचऱ्याचे प्रमाण देवनार कचराभूमीवर वाढले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आसपास असणाऱ्या रफिक नगर पार्ट 1, रफिक नगर पार्ट 2, बाबा नगर, बैंगनवाडी इथे राहणाऱ्या आणि स्थानिक कचरा वेचक हा जैविक कचरा वेचण्याचं काम करतात. हे नागरिक आपला जीव धोक्यात टाकून हे काम करत आहेत. पण त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती आहे.

केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमावलीनुसार रुग्णालय व अन्य आरोग्य यंत्रणेकडून आलेला हा प्लॅस्टिकचा कचरा लाल पिशवीमध्ये वेगळा ठेवावा लागतो. त्यानंतर प्रत्येक पिशवीचे निर्जंतुकीकरण करून त्याची विल्हेवाट अथवा प्रक्रियेसाठी पाठवली जाते. मात्र जैविक कचऱ्याचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे वाहनांची संख्या आणि हा कचरा ठेवण्यासाठी देवनार कचराभूमीवर जागाही कमी पडू लागली आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर लागण होण्याच्या भीतीने बहुतांशी कर्मचारी काम सोडून गेल्यामुळे मनुष्यबळही कमी असल्याने अडचणीत भर पडली आहे.


देवनार कचराभूमीवर दररोज येणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी एसएमएस एन्वोक्लीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आहे. रुग्णालयातून जैविक कचरा गोळा करण्यासाठी या कंपनीकडे ६० वाहने आहेत. तसेच मुंबईतील बाधित क्षेत्र, कोविड सेंटरमधून महापालिकेच्या ३५ वाहनांतून पिवळ्या पिशवीतून जैविक कचरा कचराभूमीवर आणला जातो. मात्र आता दररोज जैविक कचºयाचे सरासरी प्रमाण २४ हजार ८८० किलोग्रॅम गेल्यामुळे ताण वाढला आहे. यामुळे अनेक वेळा या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यास विलंब होत आहे.

अशी लावली जाते जैविक कचऱ्याची विल्हेवाट

मास्क, ग्लोव्हज, औषध, सिरींज, युरीन बॅग, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वापरलेले पीपीई किट आदी जैविक कचरा पिवळ्या पिशवीत एकत्रित करून त्यावर धोक्याचे चिन्ह लावण्यात येते. कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयातील सर्व जैविक कचरा त्यानंतर देवनार कचराभूमीवर विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात येतो. तसेच कोविड केअर सेंटरमधील अन्य वापरलेल्या वस्तू उदा. अन्न आदी देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये स्वतंत्र ठिकाणी टाकून त्यावर सोडियम क्लोराइडची फवारणी करण्यात येते. पण डम्पिंगमध्ये कचरा वेचक लोक येऊन हा जैविक कचरा उचलत आहेत आणि डम्पिंग ग्राऊंडमध्ये सुरक्षा अधिकारी तैनात असताना कचरा वेचणारे लोक आतमध्ये जातातच कसे हा खरा प्रश्न आहे?

Full View

Tags:    

Similar News