मुबंई राजधानी पासून 100 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका विकासापासून कोसोदूर आहे.दरवर्षी गेल्या अनेक अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासाठी मोठ्या मोठ्या आकड्याची तरदूत केली जाते, परंतु खऱ्या अर्थाने येथील आदिवासींचा विकास होताना दिसत नाहीये. अनेक योजना कागदावर राबवल्या जातात, यामुळे आदिवासींचा विकास हा फक्त प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या तोंडून ऐकायला मिळतोय, ही बाब खेदाने म्हणावी लागेल अशी परीस्थिती आहे, प्रतिनिधी रविंद्र साळवेंचा रिपोर्ट...
मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून 25 ते 30 किमी अंतरावर आसे ग्रामपंचायत मधील 250 घरांच्या 745 लोकवस्तीच्या भोवाडी गावाला फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यांना 4 किमी अंतरावर असलेल्या नदीतून खड्डा खोदून दूषित पाणी प्यावे लागतेय. दिवस भराचे कामकाज सोडून येथील आदिवासी बांधवाना लहानग्यासह कुटूंबासहित घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. परंतु वेळेत पाणीपुरवठा विभागाचे टँकर उपलब्ध होत नाही 2 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर एप्रिल महिन्यात पाणी पुरवठा विभागाचे टँकर उपलब्ध होतात. परंतु वेळेवर टॅंकर येत नाही दोन टँकरची आवश्यकता असताना अधून मधून कसा बसा येत असल्याचे येथील गावकरी सांगतात.
भोवाडी गावात फेब्रुवारी पासूनच पाणी टंचाई सुरू होते. यानंतर नदीवरून चार किमी अंतरावरून पाणी आणावं लागते दिवसभर घरचे काम सोडून पाणी भरावे लागते. टॅंकर मात्र दोन महिन्यानंतर उपलब्ध होतो. येथे दोन टँकरची आवश्यकता असताना एकच टॅंकर अधूनधून येतो यामुळे गावाची तहान देखील भागत नाही. यामुळे घोटभट पाण्यासाठी होणारी पायपीट कायम आहे, असे येथील युवा कार्यकर्ता ग्रामस्थ ईश्वर बांबरे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
आम्हाला दिवस रात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. टॅंकर आली नाही की आताही नदिवरूनच पाणी आणावं लागतंय. यामुळे आमच्याकडे कुणी तरी लक्ष देऊन आमच्या गावात सक्षम नळ पाणी पुरवठा योजना राबवावी, अशी मागणी येथील महिला कल्पना पागारी हीने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केली आहे.
मोखाडयाची अवस्था धरण उशाला कोरड घशाला " पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या मध्यान्हीच पाणी टंचाई सुरवात होते.आजघडीला मोखाडा तालुक्यात 53 गावपाड्यात पाणीबानीची परिस्थितीत निर्माण झाली असून 19 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, परंतु येथे मुबल पाणी साठा असूनही नियोजनाअभावी धरण उशाला अन कोरड घशाला " अशी अवस्था आहे, मोखाडा तालुक्यात मोठी मोठी पाच धरणे तालुक्यात असताना दरवर्षीच आदिवासीच्या पाचवीला पुजलेली पाणी टंचाईचा छाप अद्यापही पुसला गेलेला नाही.