महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाचं एक प्रादेशिक भागावर वर्चस्व राहिलेलं आहे...किंबहुना तो भाग त्या पक्षांचा गडच मानला जातो. विदर्भ कॉंग्रेसचा, पश्चिम महाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचा, शिवसेनेचा कोकण तर उत्तर महाराष्ट्रात भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षांचं वर्चस्व आहे. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं कायम शक्तिस्थान राहिलं ते भगवान गड… ते त्यांच्यानंतर आजही कायम आहे. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातील भक्तांसह राजकीय पुढारी भगवान गडाचे दर्शन घेण्यासाठी येतात. भगवान गड आणि वंजारी समाजाचं अतुट नातं आहे.
बीड जिल्ह्याची ओळखच मुळात ऊस तोड कामगारांचा जिल्हा अशी आहे... याच जिल्ह्यात वंजारी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळं गोपीनाथ मुंडेंच्या रूपानं या समाजानं पहिल्यांदाच मोठं नेतृत्व बघितलं होतं. गोपीनाथ मुंडेंनी स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय याच भगवानगडाला साक्षी ठेवून घेतले. हयात असतांना प्रत्येक दसऱ्याला गोपीनाथ मुंडे यांनी विजयाचा संकल्प याच गडावर जाऊन केला होता. गडावरुन कधी मला दिल्ली दिसते तर कधी मुंबई दिसते असं म्हणत मुंडे यांनी समाजाला राजकीय साद घातली.
ही साद घालताना प्रत्येक दसरा मेळाव्याला राज्यातील एक मातब्बर नेता गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत असायचा. आतापर्यंत गडावर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, कॉंग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, अभिजित पवार, प्रविणदादा गायकवाड, खासदार संभाजीराजे भोसले, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे
, दिवंगत केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनगर समाजाचे नेते अण्णा डांगे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यारखे अनेक मातब्बर नेते गोपीनाथ मुंडे यांनी गडावर आणून सोशल इंजिनिअरिंग कायम ठेवले. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील २०१४ च्याविधानसभा निवडणुकीपुर्वी या गडावर येऊन गेले आहेत. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या गडावर येऊन दर्शन घेऊन गेले आहेत. वास्तविक पाहता या गडाला अलिकडेच राजकीय स्थान प्राप्त झाले असे नाही. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीच या गडाचे नाव धोम्या डोंगरावरुन भगवान गड असं जाहीर केलं. मात्र, खऱ्या अर्थाने या गडाला राजकीय शक्ती स्थान मिळवून देण्याचं काम दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी केलं.
मुंडे यांचा दसरा मेळावा म्हणजे मुंडे यांचे राजकीय शक्ती प्रदर्शनच असायचे. या मेळाव्याला आलेला समाज हा मुंडे यांचे एक गठ्ठा मतदान असायचे. त्यातच हा समाज राज्यातील विविध मतदार संघात विभागलेला आहे. त्यामुळे ज्या मतदार संघात वंजारी समाज जास्त त्या मतदार संघातील लोकप्रतिनिधी हजर असत. त्यामुळे या धार्मिक सोहळ्याला एक राजकीय स्वरुप येत असे.
भगवान गड आणि राजकीय नेते…
या धार्मिक सोहळ्यातूनच स्वत: गोपीनाथ मुंडे यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. त्या बरोबरच विनायक मेटे, महादेव जानकर, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यासारखे नेते यातुन राज्याला मिळाले. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक राजकारणी या गडाच्या पायथ्याशी डोकं टेकवत आला आहे. एकंदरीत या गडाचे महत्व पाहता या गडावर वर्चस्व ठेवण्यासाठी राजकीय लढाई सुरु झाली. या राजकीय लढाईतूनच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण-भावांममध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. राजकारणामुळे दूर गेलेले दोन बहिण - भाऊ देखील आपण पाहिले. त्याच बरोबर या गडानं एक नवीन बहिण भावाचं नातं पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांच्या रुपाने आपण पाहिलं.
जानकर आणि राम शिंदे या दोनही धनगर समाजाच्या नेत्यांनी नेहमीच भगवान गडावरील सभांना उपस्थित राहत आपली निस्सीम भक्ती दाखवली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते नेहमीच मुंडे कुटुंबांशी प्रामाणिक राहिल्याचं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. याचाच फायदा भाजपला २०१४ च्या निवडणुकीत झाला. यामागे मुंडे यांचं राजकीय गणित दिसून येते.
भगवान गडावरील सभेचा परिणाम होणारे मतदार संघ…
लोकसभा…
१) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ…
या मतदार संघात वंजारी समाज जास्त असल्याने विद्यमान खासदार दिलीप गांधी नेहमी मुंडे घराण्याशी जुळवून घेत असतात.
२) बीड लोकसभा मतदार संघ - हा मतदार संघ मुंडे घराण्याचा पारंपरिक मतदार संघ म्हणून ओळखला जातो. सध्या डॉ. प्रितम मुंडे या लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. या मतदार संघात देखील वंजारी समाजाचे मतदान लक्षणीय आहे.
या विधानसभा मतदारसंघात वंजारी समाजाचा प्रभाव आहे...
परळी – पंकजा मुंडे, आमदार भाजप तथा ग्रामविकास मंत्री
आष्टी - भीमराव धोंडे, आमदार भाजप
केज - संगीता ठोंबरे, आमदार भाजप
शेवगाव - पाथर्डी - मोनिका राजळे, आमदार भाजप
कर्जत - जामखेड - राम शिंदे, आमदार भाजप तथा जलसंधारण मंत्री
राहुरी - शिवाजीराव कर्डिले,आमदार भाजप
नेवासा - बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाजप
उस्मानाबाद कळंब मतदार संघ : या मतदार संघात देखील वंजारी समाजाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो.
बुलढाणा : जिल्ह्यातील सिंदखेड या मतदार संघात वंजारी समाज जास्त आहे.
परभणी, नाशिक या जिल्ह्यातील काही भागात देखील भगवान गडांवरील सभेचा परिणाम होत आला आहे.
विधान परिषद
विनायक मेटे - विधान परिषद
सुरेश धस - विधान परिषद
महादेव जानकर - विधान परिषद
अलिकडे भगवान गडावरील राजकीय सभावरुन वाद पेटलेला असताना गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला गडावर राजकीय सभा घेता येणार नाही, असे जाहीर केले. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. फुलचंद कराड, धनंजय मुंडे या नेत्यांवर दगडफेक सुद्धा झाली आहे. त्यानंतर दसरा मेळाव्याला सभा बंदी झाल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकारणावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात असताना पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा थेट भगवान गडावरून हलवून सावरगाव घाट येथे नेण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे गडाच्या धर्मसत्तेचं राजसत्तेसाठी विकेंद्रीकरण झालं. भगवान बाबा आणि राजकारण हे समीकरण राखण्यात पंकजा मुंडे यशस्वी झाल्या.
अवघ्या काही दिवसांवर२०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. २०१४ च्या निवडणुकांपेक्षा २०१९ ची स्थिती निश्चित वेगळी असणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ज्या व्यक्तीकडे १० ते १५ आमदारांचे बळ असेल तो व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी प्रबळ दावेदार असू शकेल.त्यातच पंकजा मुंडेंची प्रतिमा हीओबीसी नेत्या अशी आहे, त्यामुळे त्यांना ओबीसी आमदारांचा पाठींबा मिळू शकतो. तसंच शिवसेना पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठींबा देखील देऊ शकते. शेवटी पंकजा यांच्या पाठीमागे भगवान बाबांना मानणारा राजकीय गट आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे यांची २०१९ ला राजकीय शक्ती वाढलेली असेल. या राजकीय शक्तीतूनच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू शकते.