विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, जिल्हा परिषदचे दुर्लक्ष
मॅक्स महाराष्ट्रने व्यक्त केलेली भीती ठरली खरी.... शाळांच्या धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात....बीड जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव;
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 264 शाळांच्या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचा ग्राऊंड रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्रने १ जुलै रोजी प्रसारित केला होता. यामध्ये बीडच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून, गोर गरीब चिमुकल्यांच्या जीवाशी कसा खेळ खेळला जात आहे, याचे धक्कादायक वास्तव आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी मांडले होते. तसेच या शाळांच्या दुरूस्तीचा निर्णय घेतला नाही तर दुर्घटना घडू शकते अशी शक्यताही व्यक्त केली होती.
पण गेल्या १५ दिवसात प्रशासनाने यावर कोणतीही हालचाल केली नसल्याचे सिद्ध झाले आहे. पण त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. बीडच्या कामखेडा गावामधील शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीमधील भिंतीचा काही भाग पडल्याने कुंदन विजय ओव्हाळ या १० वर्षांच्या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. भिंत पडली तेव्हा वर्गात इतरही मुलं होती. सुदैवाने मोठी हानी झाली नाही. मात्र याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
"आम्ही आमच्या मुलांना शिकवायचं की नाही याच्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व आमची जिल्हा परिषद शाळा लवकरात लवकर दुरुस्त करावी" अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या काही शाळा ब्रिटीशकालीन आहेत. त्या जीर्ण झालेल्या आहेत. या शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळांच्या दुरूस्तीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते देखील करत आहेत.