वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे भगरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील कवडगाव येथे भगर सेवन केल्यानंतर 60 ते 70 जणांना उलटी व जुलाबाचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात धाव घ्यावी लागली.बीड जिल्ह्यात आषाढी एकादशी निमित्त लोक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत असताना कवडगाव येथे हा प्रकार घडला गावातील लोकांनी एका किराणा दुकानातून ही भगर आणल्याची माहिती समोर येत आहे.
आज आषाढी एकादशी असून आषाढी एकादशीनिमित्त जवळपास सर्वच घरात उपवास केला जातो. यासाठी साधारणपणे भगर, शाबूदाण्याचा वापर होत असतो. मात्र भगरीमुळे अनेकदा विषबाधेचा प्रकार घडलेले आहेत. वडवणी तालुक्यातील मौजे कवडगाव येथे रविवारी 50 ते 60 जणांना भगर सेवण केल्यामुळे उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला. दुपारी 4 च्या सुमारास वडवणी शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली.
कवडगाव येथील नागरिकांनी उपवासाचा फराळ केल्यानंतर उलटी, मळमळ होऊ लागल्याने नागरिकानी तातडीने उपचारार्थ शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले. याबाबत खाजगी डाॅ. शंकर वाघ म्हणाले की, कवडगाव येथील नागरिकांना एकाच वेळेस उपवासाच्या फराळातून विषबाधा झाल्याचे दिसत असून उपचार सुरू आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.